पत्रकार राणा अय्युब यांच्या विरोधात अधिवक्ता आशुतोष दुबे यांची मुंबई पोलिसांकडे तक्रार !

कर्नाटकमध्ये महाविद्यालयात हिजाब परिधान करून येण्याला विरोध दर्शवणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांना ‘आतंकवादी’ म्हटल्याचे प्रकरण !

विद्यार्थ्यांना ‘आतंकवादी’ म्हणणार्‍या महिला पत्रकार राणा अय्युब

मुंबई, १७ फेब्रुवारी (वार्ता.) – कर्नाटकातील महाविद्यालयात हिजाब घालून येण्याला विरोध दर्शवण्यासाठी गळ्यात भगवे उपरणे परिधान करून येणार्‍या आणि भगवे झेंडे फडकवणार्‍या विद्यार्थ्यांना ‘आतंकवादी’ म्हणणार्‍या महिला पत्रकार राणा अय्युब यांच्या विरोधात अधिवक्ता आशुतोष दुबे यांनी वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली आहे. अधिवक्ता दुबे यांनी १६ फेब्रुवारी या दिवशी ‘ऑनलाईन’ तक्रार केली आहे.

कर्नाटकातील महाविद्यालयात हिजाब परिधान करून घेण्याचा अट्टहास करण्यात येत असल्याच्या प्रकरणाचे ‘बीबीसी’ या वृत्तवाहिनीवर वृत्त देतांना राणा अय्युब यांनी हिंदु विद्यार्थ्यांना ‘आतंकवादी’ संबोधले होते. राणा अय्युब यांचे हे वक्तव्य द्वेषपूर्ण आणि विखारी असल्याचे नमूद करत अधिवक्ता दुबे यांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

हिंदु विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्याचा हा प्रकार आहे ! – अधिवक्ता आशुतोष दुबे

अधिवक्ता आशुतोष दुबे

याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना अधिवक्ता आशुतोष दुबे म्हणाले, ‘‘महाविद्यालयात विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. शैक्षणिक ठिकाणी कोणत्या ठराविक धर्माऐवजी शाळेचा गणवेश परिधान करून यायला हवे. महाविद्यालयात हिजाब घालून येण्याचा अट्टहास करण्यात आल्यामुळेच या प्रकरणाला प्रारंभ झाला आहे. याला विरोध दर्शवण्यासाठी भगव्या रंगाचे उपरणे वापरणे यात आतंकवाद कोणता ? यामध्ये भगवे उपरणे परिधान करणार्‍या विद्यार्थ्यांना ‘आंतकवादी’ संबोधून त्यांना लक्ष्य केले जात आहे.