ज्येष्ठ शिवसैनिक सुधीर जोशी यांचे निधन !

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी राहिलेले ज्येष्ठ शिवसैनिक सुधीर जोशी यांचे १७ फेब्रुवारी या दिवशी ८१ व्या वर्षी जसलोक रुग्णालयात निधन झाले. मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. ‘एक सुसंस्कृत राजकारणी’ आणि ‘निष्ठावंत शिवसैनिक’ अशी त्यांची ओळख होती.

शिवसेना बळकट करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. शिवसेनेच्या स्थापनेपासून ते बाळासाहेबांसमवेत काम करत होते. वर्ष १९६८ मध्ये शिवसेनेचे नगरसेवक म्हणून ते निवडून आले. त्यानंतर मुंबईचे महापौर, आमदार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, राज्याचे शिक्षणमंत्री अशी अनेक पदे त्यांनी भूषवली. यासह शिवसेनेच्या विविध संघटनांचीही पदे त्यांनी भूषवली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘शिवसेनेने एक अनमोल हिरा गमावला’, अशी प्रतिक्रिया त्यांच्या निधनाविषयी व्यक्त केली.