पंजाबला वाचवण्याचे आव्हान !
संपादकीय
|
पाच राज्यांच्या निवडणुकांच्या मतदानाचे टप्पे हळूहळू पुढे सरकत असून २० फेब्रुवारीला पंजाबमध्ये मतदान होणार आहे. मतदानाच्या ४ दिवस अगोदर देहलीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचे एकेकाळचे सहकारी असलेले कुमार विश्वास यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले. ‘अरविंद केजरीवाल हे फुटीरतावाद्यांचे समर्थक असून पंजाबमध्ये हिंसा भडकावून त्यांना पंजाबचा मुख्यमंत्री व्हायचे होते. ‘एक तर मी पंजाबचा मुख्यमंत्री होईन किंवा एका स्वतंत्र देशाचा (खलिस्तानचा) पंतप्रधान बनेन’, असे केजरीवाल नेहमी म्हणत. त्यासाठी त्यांनी देहलीचे मुख्यमंत्रीपद मनीष सिसोदिया यांच्याकडे सोपवून पंजाबची सूत्रे हातात घेण्यासाठी ‘प्लॅन’ सिद्ध केला होता’, असे कुमार विश्वास यांनी सांगितले.
विश्वास यांचे हे आरोप अत्यंत गंभीर आहेत. जी व्यक्ती एका राज्याची मुख्यमंत्री आहे, तिचीच विचारसरणी जर फुटीरतावाद्यांच्या साहाय्याने भारतातील एका राज्याचा लचका तोडून स्वतंत्र राष्ट्र बनवण्याची असेल, तर हे देशासाठी चिंताजनक आहे. कुमार विश्वास यांनी केलेल्या गंभीर आरोपांना अरविंद केजरीवाल यांनी प्रत्युत्तर दिलेले नाही; मात्र आपचे नेते राघव चढ्ढा यांनी ‘कुमार विश्वास यांचा व्हिडिओ प्रसारित करून त्यांच्या बातम्यांना प्रसिद्धी दिल्यास प्रसारमाध्यमांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, असे ट्वीट केले आहे. आपने अशी भूमिका घेतली असली, तरी या आरोपांची सत्यता पडताळणे आवश्यक आहे. यास कारण म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही केजरीवाल यांच्यावर एका माजी खलिस्तानी आतंकवाद्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. हे आरोप राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित असल्यामुळे ‘केवळ निवडणुकीच्या काळात केलेले आरोप-प्रत्यारोप’, असे समजून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पाकिस्तान नेहमीच पंजाब अशांत कसे राहील ? हेच पहात आहे. त्यातही खलिस्तानी आतंकवादी पाकच्या तालावर नाचत आहेत. अशात भारतातील राजकारण्यांनी स्वतंत्र खलिस्तानला पाठिंबा दिल्यास पाकचे फावणार आहे. केजरीवाल आणि त्यांच्या ‘आप’ पक्षाने यापूर्वीही देहलीत दंगली करणार्यांची उघड बाजू घेतली होती. यावरून ‘आप’ची देशविघातक मानसिकता समोर येते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावर तात्काळ योग्य ती कृती करणे आवश्यक आहे !
खलिस्तानवादाला राजकारण्यांकडून विरोध नाही !
अमली पदार्थ, अवैध शस्त्रतस्करी, आतंकवाद, फुटीरतावाद यांसह अनेक गंभीर समस्या पंजाबमध्ये आहेत. स्वातंत्र्यानंतर वर्ष १९८०च्या दशकात पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळीने जोर धरला आणि कुठेही अस्तित्वात नसलेला ‘शीख विरुद्ध हिंदू’, असा संघर्ष उभा करण्यात आला. या चळवळीमुळे गेल्या ४ दशकांपेक्षा अधिक काळ पंजाब सतत अशांत आहे. यामुळे अनेक सामान्य नागरिक, पोलीस, सुरक्षादलाचे सैनिक यांनाही जीव गमवावा लागला आहे. देहली येथे झालेल्या शेतकरी आंदोलनात पंजाबमधील शेतकर्यांना भडकावण्यामागे खलिस्तानी आतंकवाद्यांचा हात होता. शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने ब्रिटन, कॅनडा आणि अमेरिका येथील भारतीय दूतावासासमोर काही मोजक्या लोकांनी भारतविरोधी घोषणा दिल्या.
या चळवळीला उघडे पाडण्यासाठी राजकीय, वैचारिक स्तरावर जो विरोध होणे अपेक्षित होता, तो राजकीय पक्षांकडून म्हणावा तितक्या प्रमाणात झाला नाही. नेहमीच मतपेटीच्या लालसेपोटी यावर बहुतांश राजकीय पक्षांनी मौन बाळगणेच पसंत केले.
अमली पदार्थांचा विळखा !
पंजाब राज्यात ‘चिट्टा’ अर्थात् हेरॉईन, ‘स्कॅम’ यांसारख्या अमली पदार्थांचा विळखा घट्ट होत आहे. एका उपलब्ध माहितीनुसार पंजाबमध्ये ९ लाख लोक अमली पदार्थ घेतात, तर साडेतीन लाख लोक ‘व्यसनाधीन’ या प्रकारात मोडतात. एकेकाळी भारतीय सैन्याला सर्वाधिक सैनिक देणारा पंजाब आज ५ व्या क्रमांकावर घसरला असून येथील तरुण शारीरिक क्षमतेत अपयशी ठरत आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाच्या अहवालानुसार वर्ष २००७ ते २०१८ या काळात देशात २५ सहस्र लोकांनी अमली पदार्थ न मिळाल्याने आत्महत्या केली. यात ७४ टक्के प्रकरणे पंजाबमधील आहेत. पंजाबमध्ये अमली पदार्थामुळे राज्यातील युवा पिढी पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत तेथील सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी ही समस्या मुळाकसट संपवण्यासाठी कधीच प्रयत्न केले नाहीत, हेही तितकेच खरे.
पंजाबी जनतेचे दायित्व मोठे
गेली अनेक वर्षे पंजाबवर काँग्रेस, अकाली दल यांचीच सत्ता आहे. राज्यात वाढलेली खलिस्तानवादी चळवळ मोडून काढण्यासाठी काँग्रेसने कठोर प्रयत्न केले नाहीत. उलट वेळोवेळी अनेक खलिस्तानी समर्थकांना काँग्रेस पक्षात मानाचे स्थान दिले गेले आणि अजूनही दिले जात आहे. सध्याच्या सरकारमध्ये खलिस्तानी आतंकवादी अवतारसिंह पन्नू याचा भाऊ बलविंदरसिंह कोटलाबामा याला काँग्रेस सरकारच्या अधिकारक्षेत्रात असलेल्या ‘पंजाब जैनको लिमिटेड’च्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले होते. यावरून ‘काँग्रेसचे खलिस्तानवादी चळवळीला उघड समर्थन आहे का ?’, असा प्रश्न निर्माण होता. आता हळूहळू ‘आप’ पक्षही पंजाबमध्ये पाय पसरत असून केजरीवाल यांच्यावरही ‘खलिस्तानवाद्यांचे समर्थक’ म्हणून आरोप होत आहेत.
‘केंद्र सरकार खलिस्तानी आतंकवाद्यांच्या मुसक्या कधी आवळणार ?’, हा प्रश्न आहेच. त्यासह फुटीरतावादी विचारसरणीला वरचढ होऊ न देण्याचे मोठे दायित्व पंजाबमधील जनतेचे आहे. हे लक्षात घेऊन कोणत्याही आमीषाला बळी न पडता अत्यंत सजग राहून राष्ट्रप्रेमी उमेदवारच निवडून आणण्याचे मोठे दायित्व आता पंजाबमधील जनतेवर आहे !