आजच्या युवकांनी महापुरुषांचा आदर्श घेऊन राष्ट्र आणि संस्कृती यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

मार्गदर्शन करतांना श्री. किरण दुसे आणि उपस्थित शिक्षकवृंद

निपाणी (कर्नाटक) – आपण नेहमी कृती करतांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कृती केली पाहिजे. स्वत:सह कुटुंब आणि समाज यांच्याकडून अवास्तव अपेक्षा न ठेवता त्यांच्यातील गुण-दोषांसहित स्वीकारल्यास आपणही आनंदी राहू. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, संग्रोळी रायण्णा यांनी त्यांचे जीवन जगतांना राष्ट्र आणि संस्कृती यांच्या प्रतीची कर्तव्ये पार पाडली. त्याच महापुरुषांचा आदर्श घेऊन आजच्या युवकांनीही राष्ट्र आणि संस्कृती संवर्धनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. विद्या संवर्धक मंडळ संचलित ‘श्री सोमशेखर कोठीवाले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ यांच्या वतीने अभियांत्रिकी महाविद्यालयातील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. या वेळी श्री. किरण दुसे यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. शिल्पा घस्ती यांनी केले, तर प्राचार्य डॉ. उमेश पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी ‘डीन’ (अधिष्ठाता) सुनील संगोळी, प्राचार्य डॉ. उमेश पाटील, प्राध्यापक टी.जी. हडकर, डॉ. एम्.सी. सरसंबा, प्राध्यापक महेश मरिगेरी, प्राध्यापक बी.आय. कट्टीमनी, प्राध्यापक प्रशांत हेब्बाळे, प्राध्यापक के.जी. वसेदार उपस्थित होते. या व्याख्यानाचा लाभ १५० विद्यार्थी, १३ शिक्षक आणि प्राध्यापक यांनी घेतला.

क्षणचित्रे

१. पर्यावरण रक्षणाचा संदेश म्हणून कार्यक्रमाच्या प्रारंभी झाडाला पाणी घालण्यात आले.

२. या कार्यक्रमाच्या आयोजनात प्राध्यापक संतोष कोळकी यांचा पुढाकार होता.

३. श्री. किरण दुसे यांनी मार्गदर्शनात ‘व्हॅलेंटाईन डे’ची वास्तविकता सांगून तो साजरा न करण्याविषयी प्रबोधन केले.

विशेष : मार्गदर्शन ऐकल्यावर ‘डीन’ सुनील संगोळी यांनी जिज्ञासूपणाने स्वभावदोष निर्मूलन विषयाच्या संदर्भात करावयाचे प्रयत्न जिज्ञासेने जाणून घेतले.