सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांना न्यायालयीन कोठडी
शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील आक्रमणाचे प्रकरण
कणकवली – शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे कार्यकर्ते संदेश उपाख्य गोट्या सावंत यांना येथील न्यायालयाने न्यायालयीन कोठडी बजावली आहे. या प्रकरणी सावंत यांना जामीन मिळावा, यासाठी आता जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज प्रविष्ट करणार असल्याचे सावंत यांचे अधिवक्ता राजेंद्र रावराणे यांनी सांगितले.
शिवसैनिक परब यांच्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी संदेश सावंत यांनी प्रारंभी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय येथे प्रयत्न केले; मात्र या तीनही ठिकाणी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे सावंत १४ फेब्रुवारीला येथील न्यायालयात शरण आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना येथील न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने सावंत यांना २ दिवसांची पोलीस कोठडी बजावली होती. त्याचा कालावधी संपल्याने पोलिसांनी सावंत यांना १६ फेब्रुवारीला येथील न्यायालयात उपस्थित केले.