‘ईडी’च्या चौकशीला घाबरून नारायण राणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ! – विनायक राऊत, खासदार, शिवसेना
नारायण राणे यांची पंतप्रधान मोदी यांवरील टीका आणि किरीट सोमय्या यांचे राणे यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप यांविषयीचे व्हिडिओ केले पत्रकार परिषदेत सादर !
मुंबई – नारायण राणे यांच्यापाठी अंमलबजावणी संचालनालय लागले, तेव्हा त्यांनी भाजपपुढे शरणागती पत्करली. देहली येथे जाऊन चोरवाटेने भाजपमध्ये प्रवेश करून राणे यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कारवाईपासून स्वत:ची सुटका करून घेतली, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला. नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका आणि किरीट सोमय्या यांनी नारायण राणे यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप यांविषयीचे व्हिडिओ या पत्रकार परिषदेत सादर करण्यात आले. या वेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, ‘‘किरीट सोमय्या यांनी नारायण राणे यांच्यावर भ्रष्टाचाराचे जे आरोप केले होते, त्याचे पुरावे आम्ही येत्या १-२ दिवसांत अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात नेऊन देणार आहोत. ‘किरीट सोमय्या हेही पुन्हा ते पुरावे अंमलबजावणी संचालनालयाकडे देतील’, अशी आम्हाला आशा आहे.’’