प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील माघमेळ्यामध्ये शास्त्र धर्म प्रचार सभेचे अनुयायी आणि सनातन संस्था यांचे साधक अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांची झाली भावस्पर्शी भेट !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शास्त्र धर्म प्रचार सभेचे महासचिव पू. डॉ. शिवनारायण सेन यांचा करण्यात आला सन्मान !
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे नुकताच पार पडलेल्या माघमेळ्यात बंगाल येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना शास्त्र धर्म प्रचार सभेच्या आश्रमाला सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी भेट दिली. तसेच शास्त्र धर्म प्रचार सभेचे महासचिव पू. डॉ. शिवनारायण सेन यांचा समितीचे उत्तरप्रदेश अन् बिहार राज्य समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी पुष्पहार, शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला. या वेळी शास्त्र धर्म प्रचार सभेचे डॉ. कौशिकचंद्र मल्लिक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) उपस्थित होते.
सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी आश्रमाला भेट दिली, त्या वेळी आश्रमात सत्संग चालू होता. त्यामुळे पू. डॉ. शिवनारायण सेन यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची विनंती केली. या वेळी समितीचे ओडिशा आणि प्रयागराज समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी ‘साधनेत गुरुकृपेचे महत्त्व काय असते ?’, याविषयी, तर श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी ‘साधनेत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन यांचे महत्त्व’, याविषयीची माहिती उपस्थितांना सांगितली. या वेळी सनातनचे साधक श्री. गुरुराज प्रभु हेही उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण
१. सनातन संस्थेच्या साधकांशी बोलत असतांना डॉ. कौशिकचंद्र मल्लिक अखंड भावावस्थेत असल्याचे जाणवले. ते साधकांशी बोलता बोलता निःशब्द व्हायचे. डॉ. मल्लिक साधकांना काही वर्णन सांगत असतांनाही ते निःशब्द वाटत होते.
२. शास्त्र धर्म प्रचार सभेच्या आश्रमातून सनातनचे साधक परत जायला निघाले, त्या वेळी पू. डॉ. शिवनारायण सेन त्यांना सोडायला मुख्यद्वाराजवळ आले. त्या वेळी त्यांच्या डोळ्यात भावाश्रू आले, तसेच त्यांचा परात्पर गुरुदेवांप्रतीचा कृतज्ञताभाव दाटून आला होता.
३. यानंतर दुसर्या दिवशी शास्त्र धर्म प्रचार सभेच्या सर्व साधकांनी सनातन संस्थेच्या प्रयागराज येथे लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. त्या वेळी ते सर्वजण पुष्कळ आनंदावस्थेत होते. या वेळी शास्त्र धर्म प्रचार सभेचे श्री. सोवन सेनगुप्ता म्हणाले, ‘‘गेली २ वर्षे अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन न झाल्यामुळे आपल्या कुटुंबातील (सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना) सर्वांना भेटता आले नाही. ते अधिवेशन लवकरात लवकर गोव्यात व्हावे आणि आपण सर्वांनी एकत्रित भेटावे.’’
पू. डॉ. शिवनारायण सेन यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीचा भावया वेळी पू. डॉ. शिवनारायण सेन यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या वेळी संस्थेच्या साधकांनी ‘परात्पर गुरुदेवांची तब्येत ठीक नसते’, असे सांगितले. त्यावर पू. डॉ. सेन म्हणाले, ‘‘धर्मप्रसाराचे सर्व कार्य त्यांच्यामुळेच होत आहे. आपले सर्व त्रास ते घेत असल्यामुळे आपण सर्वजण ठीक आहोत.’’ पू. डॉ. सेन आणि डॉ. कौशिकचंद्र मल्लिक यांचा संतांबद्दलचा भावया प्रसंगी पू. डॉ. सेन आणि डॉ. कौशिकचंद्र मल्लिक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले अन् सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्यासमवेतचे पूर्वीचे प्रसंग सांगितले. त्या वेळी ते दोघेही भावावस्थेत होते, तसेच त्या दोघांचा परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याबद्दल असलेला उत्कट भाव प्रकर्षाने दिसून आला. |