३ ते २५ मार्च या कालावधीत होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन !
११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार !
मुंबई – महाराष्ट्र विधीमंडळाचे वर्ष २०२२ चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे ३ मार्चपासून चालू होणार आहे. २५ मार्चपर्यंत अधिवेशनाचे कामकाज चालू रहाणार आहे, असा निर्णय विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत १५ फेब्रुवारी या दिवशी घेण्यात आला आहे.
विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरि झिरवळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाईन उपस्थित), उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री अनिल परब आदी उपस्थित होते. वर्ष २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प ११ मार्च या दिवशी सादर करण्यात येणार आहे.
अधिवेशनाच्या प्रारंभी कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून सर्वांनी ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ची चाचणी करणे बंधकारक असणार आहे, तसेच कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, असेही या वेळी सांगण्यात आले.