विकलांग असूनही आंतरिक साधनेमुळे आनंद अनुभवणारी कु. विशाखा राजेंद्र आगावणे !
विकलांग असूनही आंतरिक साधनेमुळे आनंद अनुभवणारी बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. विशाखा राजेंद्र आगावणे (वय २३ वर्षे) !
बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील कु. विशाखा राजेंद्र आगावणे विकलांग असूनही आनंदावस्थेत असते. ती सतत देवाच्या अनुसंधानात असते. कु. विशाखाची आई सौ. राजश्री आगावणे यांनी ‘हरे कृष्ण’ संप्रदायानुसार साधना करणारे विशाखाचे मामा श्री. संतोष परहार यांनी सांगितलेली सूत्रे, तसेच सौ. राजश्री यांना विशाखामध्ये जाणवलेले पालट आणि त्यांना आलेल्या अनुभूती यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
१. विशाखाच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी विशाखाचे मामा श्री. संतोष परहार यांनी सांगितलेली सूत्रे
१ अ. ‘मुलगी’ म्हणून विशाखाला मायेत न अडकवता ‘उन्नत’ म्हणून तिची सेवा करण्यास श्री. संतोष यांनी सांगणे : श्री. संतोष आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही तिला स्वतःची मुलगी समजून आतापर्यंत मायेत अडकवले आहे. संत किंवा उन्नत समजून तिची सेवा केली असती, तर ती केव्हाच मुक्त झाली असती !’’ तेव्हा मला खंत वाटली. मी विशाखाला म्हणाले, ‘‘आता तू माझ्यात अडकू नकोस.’’ तेव्हा ती रडवेली झाली. त्या वेळी मलाही गुरुचरणी नेण्याची तिची ओढ माझ्या लक्षात आली.
१ आ. ‘विशाखाचा देह ऋषींसारखा वाटत असून तिची साधना चांगली चालू असल्याने ती अनेक वर्षे या स्थितीत राहू शकत आहे’, असे श्री. संतोष यांनी सांगणे : श्री. संतोष यांनी सांगितले, ‘‘विशाखामध्ये गोपीभाव जागृत झाला आहे. तिची काहीतरी उच्च कोटीची साधना झाली आहे. त्यामुळे तिचा देह स्त्रीचा किंवा पुरुषाचा न वाटता ऋषींसारखा वाटतो. तिच्यामध्ये मायेचा लवलेश नाही. ती केवळ इतरांना आनंद देते आणि ‘इतरांना काही त्रास होऊ नये’, यासाठी अखंड प्रयत्नरत असते. सर्वसामान्य माणूस या अवस्थेत इतकी वर्षे अशा चांगल्या स्थितीत राहू शकत नाही. केवळ तिची साधना आहे; म्हणून ती इतक्या सुस्थितीत आहे.’’
१ इ. ‘विशाखाजवळ बसून नामजप केला, तर साधना चांगली होत असून ‘तिच्या सहवासातील ४ – ५ दिवसांत एक मासाची साधना झाली’, असे श्री. संतोष यांनी सांगणे : विशाखाविषयी सांगतांना श्री. संतोष यांची भावजागृती होते आणि त्यांना तिचे अखंड स्मरण होते. तिच्या स्मरणाने त्यांची चांगली साधना होते. ते म्हणाले, ‘‘या ४ – ५ दिवसांत तिच्या कृपेने माझी एक मासाची साधना झाली. तिच्या तोंडवळ्याकडे पाहिले आणि तिच्याजवळ बसून नामजप केला, तरी साधना चांगली होते.
१ ई. कृष्णाचे अखंड स्मरण होत असल्याने विशाखाच्या भुवयांभोवती निळसर पांढरा प्रकाश दिसणे आणि तिची प्रत्येक कृती आध्यात्मिक स्तरावरील असणे : कृष्णाच्या अष्टसख्यांमध्ये ‘विशाखा’ नावाची एक सखी आहे.
कु. विशाखाचा भावही तेवढाच उच्च आहे. श्रीकृष्णाचे अखंड स्मरण होत असल्याने तिच्या भुवयांभोवती निळसर पांढरा प्रकाश दिसतो. तिची प्रत्येक कृती, तिचे हसणेसुद्धा आध्यात्मिक स्तरावरील आहे. तिच्यात पुष्कळ क्षात्रतेज आहे. ती सध्या कृष्णाची होण्यासाठी आणि त्याच्या चरणी लीन होण्यासाठी आतुर झाली आहे.’’
२ . परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सव सोहळ्यानंतर विशाखाविषयी जाणवलेली आणि श्री. संतोष परहार यांनी सांगितलेली सूत्रे
२ अ. जन्मोत्सव सोहळा पहातांना विशाखाच्या तोंडवळ्यावर अखंड शरणागत आणि कृतज्ञता भाव जाणवणे : विशाखाने भ्रमणभाषवर परात्पर गुरु डॉक्टरांचा जन्मोत्सव सोहळा अगदी मनापासून पाहिला. झोपलेल्या स्थितीत सर्व व्यवस्थित दिसत नसूनही ती एकटक पहात होती. त्या वेळी तिच्या तोंडवळ्यावर वेगळा भाव जाणवत होता. तिच्या तोंडवळ्यावर अखंड शरणागत आणि कृतज्ञता भाव जाणवला. ती मधूनच गंभीर होत होती.
२ आ. सोहळ्यानंतर विशाखा झोपली. तेव्हा ‘ती झोपली आहे’, असे वाटत नव्हते, तर ‘ती ध्यानावस्थेत आहे’, असे मला जाणवले.
२ इ. सोहळ्यानंतर उच्च लोकातील सत्संग आणि दैवी नाद ऐकू आल्यामुळे विशाखाचे शरीर कंपन पावणे अन् त्या कालावधीत ती पुष्कळ आनंदी असणे : जन्मोत्सव सोहळ्यानंतर २ दिवस मोठ्या प्रमाणात आणि ३ दिवस अल्प प्रमाणात तिच्या शरिराचे कंपन होत होते. त्या वेळी श्री. संतोष यांनी सांगितले, ‘‘तिला उच्च लोकातून सत्संग आणि दैवी नाद ऐकायला येत होते. त्यामुळे आनंदाने तिचे शरीर कंपन पावत होते.’’ त्या काळात ती पुष्कळ आनंदी होती. सोहळ्यानंतर तिच्यात बरेच पालट जाणवले. एरव्ही शरिराचे कंपन होत असल्यास तिच्या तोंडवळ्यावरचे भाव वेगळे असायचे; पण या वेळी ती आनंदावस्थेत होती.
२ ई. ‘विशाखाच्या शरिराचे कंपन थांबवण्याचा प्रयत्न करणे’, म्हणजे तिला उच्च अवस्थेतून खाली आणण्यासारखे आहे’, असे श्री. संतोष यांनी सांगणे : श्री. संतोष यांनी ‘तिची ती अवस्था कशामुळे झाली आहे ?’, हे त्यांच्या स्तरावर अनुभवण्याचा प्रयत्न केला आणि ‘‘उच्च लोकातून दैवी नाद ऐकू येणे, तसेच सूसूक्ष्मक्ष्म ज्ञान प्राप्त होणे’, याची ही प्रक्रिया आहे’’, असे त्यांनी सांगितले. त्यांनी विशाखाला प्रार्थना केली, ‘‘तू कंपन थांबव. त्यामुळे तुझ्या आई-बाबांना काळजी वाटते.’’ तेव्हा तिने ते थांबवले; पण तिची अवस्था अनुभवल्यावर त्यांच्या लक्षात आले की, हे दैवी आहे. ते म्हणाले, ‘‘तिला आपण उच्च अवस्थेतून खाली आणत आहोत’, याचे मला वाईट वाटले. तिच्याकडून मला पुष्कळ काही मिळाले आहे, जे मला सांगता येणार नाही. या काळात तुम्ही इतर गोष्टींपेक्षा तिची भावपूर्ण सेवा आणि तिच्याजवळ बसून नामजप करा. त्याने तुमची प्रगती लवकर होईल !’’
३. सोहळ्यानंतर विशाखाच्या आईला विशाखामध्ये जाणवलेले पालट
अ. ‘विशाखा सतत नामजप करते’, असे वाटते.
आ. ‘तिची त्वचा निळसर झाली आहे’, असे वाटते. ‘तिच्या भुवयांमधून निळसर पांढरा प्रकाश बाहेर पडत आहे’, असे मला जाणवते.
इ. तिचा आहार न्यून झाला आहे, तरी ती उत्साही असते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सवाचा सोहळा झाल्यावर विशाखात झालेले हे पालट पाहून ‘आतापर्यंत मी तिची आई म्हणून काळजी घेत होते; पण आता तीच माझी ‘आध्यात्मिक आई’ झाली असून माझा सांभाळ करत आहे. मीच तिला ओळखू शकले नाही’, असे मला जाणवले.
४. विशाखासाठी नामजप करतांना रात्री जागरण होऊनही पहाटे ५ वाजता जाग येणे आणि त्या वेळी उत्साह जाणवून शारीरिक त्रास न होणे
एकदा मी रात्री २ ते २.३० पर्यंत विशाखासाठी नामजप करत होते. मधेच मला ग्लानीही येत होती. मधून जाग आल्यावर मी तिला मर्दन करायचे. मला पहाटे ५ वाजता जाग आली. त्या वेळी मला ‘उठून नामजप करावा’, असे वाटत होते. खरेतर २ दिवसांपासून मला कंबरदुखीचा त्रास होत होता; पण रात्री जागरण होऊनसुद्धा मला सकाळी उत्साही वाटले आणि कोणताही शारीरिक त्रास झाला नाही.
५. १८.५.२०२० या दिवशी कु. विशाखाने आईच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर तिला स्वतःत जाणवलेले पालट आणि आलेली अनुभूती
५ अ. निळसर प्रकाश दिसून डोके आणि डोळे दुखणे : विशाखाने माझ्या सहस्रारावर हात ठेवल्यावर मला निळसर प्रकाश दिसला आणि क्षणभर नाग वेटोळे घालून बसलेला दिसला. नंतर संध्याकाळपासून माझे डोके आणि डोळे दुखायला लागले. ते दुसर्या दिवसापर्यंत दुखत होते.
५ आ. प्रतिदिन वेगवेगळ्या प्रार्थना होणे : माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टर आणि श्रीकृष्ण यांना प्रतिदिन वेगवेगळ्या प्रार्थना होऊ लागल्या अन् त्या प्रार्थनेप्रमाणे कृतीही होऊ लागल्या.
५ इ. विशाखाचे भाव ओळखता येऊ लागणे : मला विशाखाचे भाव ओळखता येऊ लागले. ‘तिला त्या त्या क्षणी काय हवे ?’, हे माझ्या लक्षात येऊ लागले. हे ओळखण्यासाठी मला माझे मामेभाऊ श्री. संतोष परहार यांचे पुष्कळ साहाय्य झाले.
६. सध्या विशाखामध्ये जाणवत असलेले पालट
१. विशाखा पूर्वी दूरचित्रवाणीकडे बघायची; पण आता तिचे तिकडे लक्ष जात नाही. ती सतत अंतर्मुख असते. ‘सतत भजने, नामजप किंवा सत्संग ऐकणे’, असे तिचे चाललेले असते.
२. तिची झोप न्यून झाली आहे. ती उशिरा झोपते आणि लवकर उठते. झोपलेली असली, तरी ‘ती ध्यानावस्थेत आहे’, असे जाणवते.
३. तिचा आनंद पूर्वीपेक्षा वाढला आहे. ती सतत हसत असते.’
– सौ. राजश्री आगावणे (कु. विशाखाची आई), बार्शी, जिल्हा सोलापूर. (२५.८.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |