वयस्कर असूनही ईश्वरप्राप्तीचे ध्येय उराशी बाळगून सतत सेवारत असणारे देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील वयस्कर साधक !
‘देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वयस्कर साधकांची संख्या अधिक आहे. सर्व साधक घरदार सोडून पूर्णवेळ साधना, म्हणजे ईश्वरप्राप्ती करण्यासाठी आश्रमात येऊन राहिले आहेत. यात ६० वर्षे वयाच्या पुढील आणि ८७ वर्षे वयापर्यंतचे अनुमाने ७० ते ७५ साधक आहेत. यांच्यापैकी कुणालाच सेवा केल्याविना चैन पडत नाही. त्यांचा ‘दिवसभर अधिकाधिक सेवा कशी करता येईल ?’, असाच विचार असतो. या वयात हे साधक प्रतिदिन किमान ५ घंटे सेवा करतात. काही जण ८ ते १० घंटेही सेवा करतात. व्यवहारात पाहिल्यास वयाच्या साठीनंतर ‘आता शारीरिक कष्ट करू शकत नाही. आता निवृत्त जीवन जगायचे’, अशी लोकांची मानसिकता असते; परंतु ‘ईश्वरप्राप्ती’ हे ध्येय उराशी बाळगून वयाचा विचार न करता ईश्वरासाठी तन, मन आणि धन यांचा त्याग करून हे वयस्कर साधक झोकून देऊन सेवा करत आहेत. यातून त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि अन्य सूत्रे येथे दिली आहेत.
१. चिकाटी
हे सर्व वयस्कर साधक प्रतिदिन पहाटे उठतात आणि योगासने अन् नामजप करतात. यात कधी खंड पडत नाही. हे सर्व जण त्यांच्या नियोजनानुसार सर्व कामे करतात.
२. सेवेची तळमळ
२ अ. अतिरिक्त सेवाही आनंदाने करणे : या साधकांपैकी बहुतांश जण सात्त्विक उत्पादनाशी संबंधित सेवा करतात. त्यांना ही सेवा करतांना कधी कधी अतिरिक्त सेवा कराव्या लागल्या किंवा त्यांना दुपारच्या विश्रांतीच्या वेळेत ‘सेवा करणार का ?’, असे विचारल्यावर ते तीही सेवा आनंदाने करतात. एरव्ही ते दुपारच्या आणि रात्रीच्या महाप्रसादानंतर विश्रांतीसाठी जातात; पण काही कारणास्तव सेवा अधिक असली, तर ते सकाळी लवकर येऊन, तसेच रात्री महाप्रसाद घेतल्यानंतरही सेवा करतात.
२ आ. वेळेचा पुरेपूर वापर करणे : एखादी सेवा झाल्यानंतर थोडा वेळ राहिला असेल, तर ते लगेचच दुसरी सेवा विचारून घेतात. ‘सेवेसाठी दिलेला वेळ वाया जाऊ नये’, याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असते.
२ इ. स्वच्छतेपासून ते स्वयंपाकघरातील सर्व सेवा सहजतेने करणे : पूर्वी उच्च पदावर नोकरी करत असलेले साधक आश्रमात पटल पुसणे, स्वयंपाकघरात कांदा चिरणे, भाजी निवडणे, अशा सेवा आनंदाने करतात. ते आश्रमातील स्वच्छतेच्या सेवेपासून स्वयंपाक घरातील सेवाही सेवाभावाने करतात. त्यांना घरी कधी काही करण्याची सवय नव्हती; परंतु ‘ईश्वरप्राप्तीसाठी त्यांनी अशा प्रकारचा पालट स्वतःत करणे’, हे केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.
३. दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्यासाठी संगणक हाताळायला शिकणे
कोरोनाच्या संसर्गामुळे दळणवळण बंदीच्या काळात दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण बंद होते. त्यामुळे त्यांना संगणकातच दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘पी.डी.एफ्’चे वाचन करावे लागत होते. त्या वेळी अनेक जण संगणक चालू करून दिल्यानंतर दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करायचे. यातील काही वयस्कर महिलांनी कधीच संगणक हाताळला नसूनही गुरुदेवांचा प्रसाद म्हणून येणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचण्यासाठी त्या संगणक हाताळायला शिकल्या. ‘वयस्कर साधकांनी संगणकात दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचणे’, हे केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच होऊ शकते.
४. घरातील सर्व सोयी-सुविधांचा त्याग करून आश्रमात रहायला आल्यानंतर सर्वांसमवेत सहजतेने रहाणे
काही वयस्कर साधक त्यांच्या पूर्वायुष्यात उच्च पदावर नोकरी करत होते. काही जण ‘इंजिनीयर’ असून सरकारी नोकरीतून चांगल्या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. एक साधक ‘आयटी’ (माहिती आणि तंत्रज्ञान) क्षेत्रातील चांगल्या पदावरील नोकरी सोडून ‘ईश्वरप्राप्ती करायची’, असा निश्चय करून आश्रमात रहायला आले आहेत. काही जण उच्च शिक्षित असून त्यांची आर्थिक स्थितीही चांगली आहे. घरातील सर्व सोयी-सुविधांचा त्याग करून आश्रमात रहायला आल्यानंतर ते सर्वांच्या समवेत प्रेमाने रहातात. त्यांच्या वागण्यातून ‘ते उच्चपदस्थ आहेत किंवा उच्चभ्रू कुटुंबातून आले आहेत’, हे जाणवतही नाही.
५. वयस्कर साधकांनी आध्यात्मिक उन्नती करण्याचा वेग अधिक असणे
वयस्कर साधकांनी त्यांच्यातील अनेक गुणांमुळे ६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठली आहे, तर काही जण संत झाले आहेत.
६. वयस्कर साधकांना सेवा करतांना आलेल्या अनुभूती
अ. साधकांना सेवा केल्यानंतर आनंद मिळतो. त्यांचे एवढे वय झाले असूनही ‘सेवा करायची नाही’, असा विचार कुणाच्याच मनात येत नाही.
आ. दळणवळण बंदीच्या कालावधीत सेवा अल्प असायची. त्या वेळी ते ‘सेवा आहे का ?’, असे विचारायचे. त्यांच्यासाठी प्रतिदिन सेवा काढून ठेवावी लागत होती.
इ. ‘सेवा करतांना नामजप आपोआप चालू होतो’, असे ते सांगतात.
वयस्कर साधकांची सेवा करण्याची तळमळ आणि त्यांच्यातील भाव पाहिल्यावर ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे आम्हाला हे अनुभवायला मिळत आहे’, याची जाणीव होते आणि आमची गुरुदेवांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त होते. ‘गुरुदेवा, तुम्हीच आम्हा सर्वांना वयस्कर साधकांना जवळून पहाण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी दिली. त्यांच्याप्रमाणे आम्हा सर्वांमध्ये ‘गुरुकार्य आणि ईश्वरप्राप्ती यांची तळमळ, चिकाटी आणि गुरूंप्रती भाव हे गुण येऊ देत’, अशी मी आपल्या कोमल चरणी शरणागत भावाने प्रार्थना करते.’
– आधुनिक वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२३.११.२०२१)