कोरोना दीर्घकाळ रहाण्याची शक्यता ! – शास्त्रज्ञांचा दावा
वॉशिंग्टन – कोरोना महामारीच्या उद्रेकाचे हे तिसरे वर्ष आहे. ‘ओमिक्रॉन’ विषाणूमुळे निर्माण झालेली कोरोनाची तिसरी लाट ही शेवटची लाट आहे, या भ्रमात कुणीही राहू नये. कोरोना दीर्घकाळ रहाण्याची शक्यता आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
१. शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार, कोरोनाची तिसरी लाट अफाट होती; मात्र तिचा संसर्ग सौम्य होता. त्यामुळे बर्याच देशांनी कोरोनाविषयीचे निर्बंध शिथिल केले. ‘आपण कोरोना महामारीविरुद्ध यशस्वी लढा दिल्यामुळे कोरोना आता दूर होत आहे’, अशी काही देशांची समजूत झाली आहे; मात्र तसे असेलच, असे नाही. जोपर्यंत जगातील प्रत्येक भागातून ही महामारी समूळ नष्ट होत नाही, तोपर्यंत ती दूर झाली, असे म्हणता येणार नाही. येत्या काही मासांमध्ये लसीकरण न झालेल्या देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.
२. अमेरिकेच्या सीटल शहरातील ‘फ्रेड हचिन्सन कॅन्सर रीसर्च सेंटर’ मध्ये कार्यरत शास्त्रज्ञ टे्रवर बेडफोर्ड म्हणाले, ‘‘अमेरिकेतील ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या लोकांपैकी केवळ २० ते २५ टक्के लोकांनी त्याविषयीची माहिती घोषित केली आहे. जानेवारी मासाच्या मध्यात अमेरिकेत प्रतिदिन सरासरी ८ लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद आहे; मात्र सत्य आकडा त्याहीपेक्षा अधिक असेल.’’
३. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक संचालक हॅन्स क्लूझ यांनी युरोपमधील सध्याचा ओमिक्रॉनचा संसर्गाचे प्रमाण पहाता मार्च मासाच्या मध्यापर्यंत युरोपातील ५० टक्के लोकांना हा संसर्ग होण्याची शक्यता वर्तवली आहे.