प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’चे सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

‘२०.१२.२०२१ या दिवशी ‘गौतमारण्य’ आश्रम, बांदा, पानवळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’ पार पडला. धर्मशास्त्रानुसार या विधीचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.

सहस्रचंद्रदर्शन विधीचे महत्त्व

‘व्यक्तीच्या आयुष्याची ८० वर्षे पूर्ण होतात, तेव्हा तिला जीवनात एकूण १००० वेळा चंद्राचे दर्शन झालेले असते. व्यक्तीच्या उतारवयात शरिराची इंद्रिये क्षीण होतात. हा विधी केल्याने देवतांचा आशीर्वाद प्राप्त होऊन विधी करणार्‍या व्यक्तीच्या इंद्रियांना पुष्टी, म्हणजे बळ आणि आरोग्य प्राप्त होते.’

या सोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण देवाच्या कृपेमुळे मला करता आले. ते पुढे दिले आहे. १६.२.२०२२ या दिवशी या सूक्ष्म परीक्षणाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.

मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ः https://sanatanprabhat.org/marathi/553327.html

प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक

६. यज्ञातील प्रधान देवता ‘चंद्र’

६ अ. यज्ञातील प्रधान देवता ‘चंद्र’ याला आहुती देणे : या विधीत प्रधान देवता ‘चंद्र’ आहे. त्याला १००० वेळा तुपाची आहुती दिली जाते. असे घडत असतांना काही स्त्री दैवी शक्ती हा प्रसंग स्वर्गलोकातून कौतुकाने पहात असल्याचे दृश्य सूक्ष्मातून मला दिसले. चंद्रदेवाला आहुती चालू असतांना त्याच्या शरिराची रचना प्रारंभी मनुष्याप्रमाणे दिसली; परंतु थोड्या वेळाने ‘चंद्रदेवाच्या दोन्ही हाताला गरुडाप्रमाणे पंख आहेत’, असे मला दृश्य दिसले. त्याला ‘गरुड चंद्र’, असे म्हणतात.

६ आ. ‘गरुड चंद्र’ याचे वैशिष्ट्य : चंद्राची अनेक रूपे आहेत. त्यांपैकी एक ‘गरुड चंद्र’ आहे. गरुडाचे पंख हे प्रबळ आणि गतीमान असतात. चंद्राची शक्ती मोठ्या प्रमाणात आणि गतीमान स्वरूपात कार्य करते. तेव्हा त्या चंद्राचे रूप गरुड रूपात असते. त्यामुळे त्याला ‘गरुड चंद्र’, असे म्हणतात.

६ इ. यज्ञात दिलेल्या आहुतीने चंद्रदेव संतुष्ट झाल्याचे जाणवणे आणि त्याच वेळी पुरोहितांकडून चंद्रासाठीच्या आहुती पूर्ण झाल्याचे समजणे : यज्ञात चंद्राला १००० आहुती द्यायच्या होत्या. या आहुती चालू असतांना काही वेळाने मला चंद्रदेव आहुतीने प्रसन्न झाल्याचे दृश्य दिसले आणि त्याच वेळी पुरोहितांनी ‘चंद्राला द्यावयाच्या आहुती पूर्ण झाल्या आहेत’, असे उपस्थितांना सांगितले.

७. यज्ञात काही ‘अतिथी देवता’ यज्ञातील दैवी ऊर्जा प्राप्त करण्यासाठी येणे

यज्ञ चालू असतांना मला सूक्ष्मातून नवग्रह देवता आणि त्यांच्या उपशक्ती दिसत होत्या; परंतु त्या व्यतिरिक्त मला काही क्षणांसाठी काही नवीन आणि अपरिचित देवता यज्ञाच्या ठिकाणी येऊन यज्ञातील दैवी ऊर्जा प्राप्त करून निघून जातांना दिसल्या. त्या देवतांना ‘अतिथी देवता’, असे म्हणतात. नवग्रहदेवता मात्र यज्ञाला पूर्णवेळ उपस्थित असतात.

८. यज्ञात पूर्णाहुती देणे

यज्ञात पूर्णाहुती चालू झाल्यावर मला अग्निदेवतेचे दर्शन झाले. त्या वेळी त्याचा उजवा हात आशीर्वादाच्या मुद्रेत होता आणि डाव्या हातात लाल रंगाचे कमळ होते. कमळ हे शुभ आणि कल्याणतेचे प्रतीक आहे.

९. प.पू. दास महाराज सुक्तांचे श्रवण करत असतांना सूक्ष्मातून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले उपस्थित आहेत’, असे दिसणे

यज्ञ संपल्यानंतर पुरोहितांनी काही सुक्तांचे पठण केले. त्याचे प.पू. दास महाराजांनी श्रवण केले. प.पू. दास महाराज सुक्तांचे श्रवण करत असतांना त्यांच्या बाजूला सूक्ष्मातून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले उपस्थित आहेत’, असे दृश्य मला दिसले.

श्री. राम होनप

१०. तुलादान विधीच्या वेळी धर्मदेवाचे दर्शन होणे

या विधीत प.पू. दास महाराज यांची तुला गुळाने करण्यात आली. त्या वेळी वजनकाट्याच्या मध्यभागी मला ‘धर्मदेव’ आशीर्वादाच्या मुद्रेत उभा असल्याचे दृश्य सूक्ष्मातून दिसले. त्याच्या तोंडवळ्यावर कुठलेच भाव नव्हते. ‘तो सर्वत्र तटस्थपणे पहात आहे’, असे माझ्या लक्षात आले.

१० अ. धर्मदेवाच्या तोंडवळ्यावर कुठलेच भाव नसण्यामागील कारण : धर्मदेवाचे कार्य ‘धर्म-अधर्म यांनुसार विविध विषयांचा न्यायनिवाडा करणे’, हे आहे. हे कार्य तो धर्माच्या विशिष्ट नियमांनुसार आणि आपपर भाव न ठेवता तटस्थपणे करत असतो. त्यामुळे त्याच्या तोंडवळ्यावर ‘सुख, दुःख आणि प्रसन्नता’, असे भाव दिसत नाहीत.

११. तुलादान विधी केल्याचा तुलादान करणार्‍या व्यक्तीला होणारा लाभ

या विधीत ज्या व्यक्तीसाठी विधी चालू आहे तिच्या वजनाइतके अन्न अथवा वस्तू यांचे ब्राह्मणाला दान केले जाते. त्यामुळे होणारा लाभ पुढीलप्रमाणे आहे. ‘व्यक्तीचे पूर्वी अनेक जन्म-मृत्यू झालेले असतात. त्यांत काही अयोग्य कर्मांमुळे तिच्यात काही दोष उत्पन्न झालेले असतात. त्याचा विपरित परिणाम चालू जन्मात ‘व्यक्तीचे शरीर, मन आणि आध्यात्मिक जीवन’ यांवर होत असतो. तुलादानामुळे त्या व्यक्तीच्या कर्मदोषांचा भार न्यून होण्यास साहाय्य होते, तिच्यात त्याग करण्याचा भाव वृद्धींगत होतो आणि तिला देवतांची कृपादृष्टी प्राप्त होत असते.’

१२. सहस्रचंद्रदर्शन शांती विधीचा प.पू. दास महाराज यांना स्वतःला आणि समष्टीला झालेला लाभ अन् त्यांचे प्रमाण

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१२.२०२१) (समाप्त)


श्री. दामोदर विष्णु वझे

प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’ करतांना सनातन पुरोहित पाठशाळेचे संचालक श्री. दामोदर विष्णु वझे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि प.पू. दास महाराज यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यापलीकडे माझ्याकडे शब्द नाहीत. कर्ता आणि करविता श्री सद्गुरुच असतात. ‘त्यांच्या इच्छेनेच संत आणि साधक यांच्या जीवनात कोणते विधी करायचे ?’, याचे नियोजन झालेले असते. आपण केवळ निमित्तमात्रच असतो. या विधीच्या वेळी मला जाणवलेली सूत्रे पुढे देत आहे.

१. प.पू. दास महाराज यांची प्रकृती लक्षात घेऊन विधी दोन दिवस विभागून केल्याने विधी करतांना आनंद मिळणे

ईश्वरीकृपेने प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’ करण्याची सेवा मला मिळाली. मार्गशीर्ष कृष्ण पक्ष प्रतिपदा या एकाच दिवशी शांती करायची, तर ते पुष्कळ कठीण होते. त्यामुळे मी आदल्या दिवशी प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांच्याकडून संकल्प, गणपतिपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदीश्राद्ध हे विधी त्यांच्या अनुमतीनेच केले. त्यामुळे मला या विधींतील आनंद मिळाला; कारण ‘एकाच दिवसात सर्व विधी करणे’ प.पू. दास महाराज यांच्या शरीर अस्वास्थ्यामुळे शक्य नव्हते.

२. देवाने दिलेल्या विचाराप्रमाणे कृती केल्याने विधी चैतन्याच्या स्तरावर होणे

देवाने दिलेल्या विचाराप्रमाणे मी कृती करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक कृती देवानेच करवून घेतली. धार्मिक विधीत कोणती कृती प.पू. दास महाराज यांनी करायची याविषयी मला देव आतूनच सुचवत होता आणि त्याप्रमाणे कृती करवून घेत होता. संपूर्ण विधी चैतन्याच्या स्तरावर संपन्न झाला.

परात्पर गुरु डॉक्टर, प.पू. दास महाराज आणि पू. (सौ.) माई यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’

– गुरुचरण सेवक,

श्री. दामोदर विष्णु वझे (सनातन पुरोहित पाठशाळेचे संचालक), फोंडा, गोवा. (१२.१.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक