अजित डोवाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणाला पकडले !

‘माझ्या शरिरात ‘चिप’ (इलेक्ट्रॉनिक यंत्र) असून मला रिमोटद्वारे नियंत्रित केले जात आहे !  – तरुणाचा दावा

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल

नवी देहली – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या येथील घरात एका अज्ञात तरुणाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या तरुणाने डोवाल यांच्या घरात चारचाकी गाडी घेऊन घुसण्याचा प्रयत्न केला; मात्र येथील सुरक्षा कर्मचार्‍यांनी योग्य वेळी या व्यक्तीला थांबवून कह्यात घेतले. पकडल्यानंतर तो विचित्र पद्धतीने बडबड करतांना दिसला आहे. तो ‘माझ्या शरिरात कुणीतरी ‘चिप’ (इलेक्ट्रॉनिक यंत्र) बसवले असून मला रिमोटद्वारे नियंत्रित केले जात आहे’, असा दावा त्याने केला.  पोलिसांनी त्याच्या संपूर्ण शरिराची तपासणी केली; मात्र पोलिसांना त्याच्याकडे कोणतीही चिप आढळली नाही. हा तरुण बेंगळुरू येथील रहाणारा आहे. त्याची देहली पोलिसांचे आतंकवादविरोधी पथक आणि विशेष शाखा यांच्याकडून चौकशी केली जात आहे.

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये जैश-ए-महंमदच्या एका आतंकवाद्याकडून डोवाल यांच्या कार्यालयाचे गोपनीयरित्या निरीक्षण करण्यात आले होते. याचा व्हिडिओही समोर आला होता. संबंधित आतंकवाद्याने हा व्हिडिओ पाकिस्तानी आतंकवाद्याला पाठवला होता. यानंतर डोवाल यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली.