बलुचींचा संघर्ष !

संपादकीय 

बलुचींना त्यांचे हक्क मिळण्यासाठी भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक !

सर्मसार हिदायतुल्ला नावाचा बलुचिस्तानचा युवा नेता पाक सैनिकांनी हेलिकॉप्टरमधून मारलेल्या गोळ्यांमध्ये १५ फेब्रुवारीला मारला गेला. त्याच्या भावाने त्याचे सैनिकी वेशातील छायाचित्र ट्वीट करून म्हटले आहे, ‘त्याने स्वतःला नवरदेवाप्रमाणे नटवले आहे !’ त्याने तेथील आकाशवाणीवर ‘माझ्या भावाविषयी मला अभिमान आहे’, असे म्हटले आहे आणि त्याच्या गुणांचे कौतुकही केले आहे. एवढेच नव्हे, तर या लढ्यात समर्पित होण्यासाठी सर्वांनी सिद्ध रहाण्याचे आवाहनही त्याने केले आहे. मागील आठवड्यात बलुची क्रांतीकारकांनी पाकच्या १०० सैनिकांना कंठस्नान घातले. बलुची लोकांना पाकपासून वेगळे व्हायचे आहे आणि त्यांनी ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ स्थापन केली आहे. ते अलीकडे सतत पाक सैन्यावर आणि सैन्यतळावर आक्रमण वा बाँबस्फोट करून पाकच्या सैनिकांची हत्या करत आहेत. या दोन मासांत त्यांनी अशी ४ आक्रमणे केली आहेत. गेल्या ७३ वर्षांपासून बलुचींचा हा लढा चालू आहे. बलुचिस्तान वाळवंटी आणि डोंगराळ असला, तरी यातील काही भाग अत्यंत सुपीक आहे. येथे मोठ्या प्रमाणात खनिजे आणि वायू यांचा साठा आहे. पाक येथील वायूचा व्यापार करतो; परंतु त्याने बलुचिस्तानचा यत्किंचित्ही विकास केलेला नाही. रस्ते, पाणी अन्य सुविधा आदी काहीच येथे नाही. बलुचिस्तानची लोकसंख्याही अल्प आहे आणि पाकच्या संसदेत त्यांना काही विशेष प्रतिनिधित्वही नाही. थोडक्यात पाक बलुचिस्तान हा स्वतःचा प्रदेश म्हणतो खरा; पण प्रत्यक्षात त्या प्रदेशासाठी काहीही करत नाही. बलुचींनी संयुक्त राष्ट्रांकडे ‘बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा होण्यासाठी जनमत घेतले जावे’, अशीही मागणी केली आहे.

बलुचिस्तानचा इतिहास

प्रामुख्याने पाकच्या पश्चिम भागात येणार्‍या या मोठ्या प्रदेशात इराण आणि अफगाणिस्तान यांच्या सीमांवरील काही प्रदेशही येतो. या तिन्ही भागांत मिळून बलुची भाषा बोलणारे लोक रहातात. जेव्हा अलेक्झांडर भारताच्या सीमेवर धडकला, तेव्हा त्याला सर्वप्रथम लढवय्यै म्हणून प्रसिद्ध असलेल्या बलुचींनी गलितगात्र केले होते. त्यानंतर त्याला पुरु राजाने हरवले. ब्रिटीश सैन्यातही बलूच रेजिमेंट होती. प्राचीन काळी हा चीन, अफगाण, इराण यांच्या सीमेवरील भारताचा प्रदेश असल्यामुळे व्यापारी केंद्र होते. ७ व्या शतकात येथे अरबांनी आक्रमण केले आणि १० व्या शतकापर्यंत ते इथे होते. या काळात त्यांनी येथील हिंदूंना इस्लामी बनवले. फाळणीच्या वेळीच बलुचींना पाकमध्ये जाण्याची मुळीच इच्छा नव्हती. त्यांना स्वतंत्र रहायचे होते; परंतु येथील नवाबांनी जनतेचे मत विचारात न घेता बलुचिस्तानला पाकमध्ये समाविष्ट केले.

पाकचे अत्याचार

वर्ष १९४७ च्या जीनांच्या कार्यकाळात, वर्ष १९७० च्या भुट्टो यांच्या काळात आणि २१ व्या शतकात मुशर्रफ यांच्या कार्यकाळात पाकने येथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले आणि अजूनही येथील जनतेचे हाल संपण्याचे नाव घेत नाहीत. येथील जनतेचे अपहरण करणे, हा तर पाकचा इतिहासच आहे. गेल्या अनेक वर्षांतही पाकचे सैन्य येथील जनतेचे अपहरण करून काही काळानंतर त्यांचे मृतदेह रस्त्यावर टाकून देते. आताही हे अपहरणाचे सत्र असेच चालू आहे. तेथील महाविद्यालयात साध्या वेशातील पाकचे पोलीस विद्यार्थ्यांची चौकशी करतात. बलूच आणि पश्तून येथील विद्यार्थ्यांना पाकमधील पंजाब प्रांतातील गुजरात विश्वविद्यालयात त्रास दिला जात आहे. इस्लामाबाद विद्यापिठातूनही बलुची विद्यार्थ्यांना पाक सैन्याने उचलून नेऊन गायब केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानवाधिकाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांचे बळजोरीने अपहरण केले जात आहे. गेल्या काही दिवसांत बलुचिस्तानमधील ४८ लोक बेपत्ता असून त्यांना पाक सैनिकांनी उचलले असल्याचा संशय आहे. पाक सैन्याकडून बलुचींवर एवढया मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत की, ‘इंटरनॅशनल फोरम ऑफ राईट्स अँड सिक्युरिटी’ या संघटनेने म्हटले आहे, ‘पाक सरकारला अपहरणाच्या सूत्राविषयी कितीही सांगितले, तरी त्यांचे अंतःकरण हेलावत नाही.’ लोकांचे अपहरण करण्याविषयी संयुक्त राष्ट्रांनी लक्ष घातल्यावर पाकने त्यांचा उपहास करून त्यांना उडवून लावले आहे. येथील नागरी हक्कांसाठी लढणारे मामा कादीर हे येथील जनतेसाठी अमेरिकेत निधी आणण्यासाठी जात असतांना त्यांना विमानात चढूच देण्यात आले नव्हते. बलुचींनी स्वातंत्र्यासाठी आतापर्यंत उभ्या केलेल्या सर्व चळवळी पाकने लष्करी दमनाने मोडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पाक सैन्याने ‘बलोच नॅशनल मुव्हमेंट’ या बलुचिस्तानच्या सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचे महासचिव डॉ. मन्नन बलोच यांची हत्या केली. काश्मिरींच्या मानवाधिकारावरून गळे काढणारे मानवाधिकारवाले बलुचींविषयी मात्र गप्प आहेत.

भारताची भूमिका !

केवळ पाक आपला शत्रू आहे आणि बलुचींनाही पाक शत्रूसमान आहे; म्हणून भारताने बलुचिस्तानमध्ये रस घेतला पाहिजे, असे नव्हे, तर प्राचीन काळापासून ही हिंदूंची वसाहत आहे. स्वातंत्र्याच्या वेळी ५३ सहस्र हिंदू असलेल्या बलुचिस्तानमध्ये पाकच्या अत्याचारामुळे आता केवळ ३ सहस्र हिंदू शेष आहेत. जसे बांगलादेशला पाकपासून स्वतंत्र करण्यासाठी भारताने मोठे साहाय्य केले, तसे भारताने बलुचिस्तानला साहाय्य केले पाहिजे, अशी त्याची अपेक्षा आहे. त्यासाठी बलुची मोदी सरकारकडे अतिशय आशेने पहात आहेत. पाकची ४७ टक्के भूमी बलुचिस्तानने व्यापली आहे. बलुचिस्तान पाकपासून वेगळा झाल्यावर निम्मा पाक तुटल्याप्रमाणेच होणार आहे. सध्या सामाजिक माध्यमातूनही ‘भारताने बलुचिस्तान स्वतंत्र करण्यात रस घ्यावा’, अशी मते आंतरराष्ट्रीय स्तरातूनही व्यक्त होत आहेत. चीनचाही हस्तक्षेप यात होणार असल्याने अर्थात् भारतासाठी हे सहज सोपे नाही; पण जशा अनेक समस्या भारत हिंदु राष्ट्र झाले, तर आपोआपच सुटायला आरंभ होणार आहे; तद्वत्च त्याचा बलुचींनाही त्यांच्या लढ्यासाठी मोठा लाभ होईल !