विवाहाच्या वाढदिवसानिमित्त ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली स्वतःची छायाचित्रे पाहून साधकांची झालेली विचारप्रक्रिया आणि अनुभूती
फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनिरुद्ध राजंदेकर आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मानसी राजंदेकर यांच्या विवाहाच्या वाढदिवसानिमित्त ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली स्वतःची छायाचित्रे पाहून त्यांची झालेली विचारप्रक्रिया आणि त्यांना आलेली अनुभूती
७.२.२०२२ या दिवशी फोंडा (गोवा) येथील श्री. अनिरुद्ध (वय ३८ वर्षे) आणि सौ. मानसी राजंदेकर (वय ३८ वर्षे) यांच्या विवाहाचा १५ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्या दिवशी ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर त्यांची छायाचित्रे प्रसिद्ध झाली होती. ती छायाचित्रे पाहून त्यांना जाणवलेले सूत्र, त्यांची झालेली विचारप्रक्रिया आणि आलेली अनुभूती येथे दिली आहे.
१. जाणवलेले सूत्र
‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली आमची छायाचित्रे बघितल्यावर ‘ती आपली आहेत’, असे आम्हाला वाटले नाही. त्यामुळे आम्हाला त्याविषयी कौतुक वाटले नाही किंवा स्वतःविषयी कोणताही विचार आमच्या मनात आला नाही.
२. झालेली विचारप्रक्रिया
अ. ‘छायाचित्राची खालची बाजू, म्हणजे आमचे छायाचित्र असलेली बाजू ही सगुण असून त्याची निळ्या रंगाची पार्श्वभूमी असलेली वरची बाजू, म्हणजे निर्गुण पोकळी आहे आणि ती पोकळी, म्हणजे प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) आहेत’, असे आम्हाला जाणवले. त्यामुळे ‘त्या छायाचित्रातील या निर्गुणाला खरे महत्त्व असून आमचे अस्तित्व असून नसल्याप्रमाणे आहे’, असे आम्हाला वाटले.
आ. हे छायाचित्र नीट बघितल्यावर लक्षात येते, ‘या छायाचित्रामध्ये निळी पार्श्वभूमी अधिक आहे. त्या तुलनेत आमचे छायाचित्र आकाराने लहान वाटते.’ यावरून ‘देवाला हे लक्षात आणून द्यायचे आहे की, आमच्या जीवनात प.पू. गुरुदेवांचे स्थान अधिक महत्त्वाचे आहे’, असे आम्हाला जाणवले.
३. अनुभूती
ही छायाचित्रे पाहून आमचा भाव जागृत झाला.
देवाच्या अगाध कृपेचा हा वर्षावच आहे. आमच्याकडे प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दच नाहीत. ‘हे गुरुदेव, आपली अशीच अखंड कृपादृष्टी आमच्यावर असू द्या’, हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री. अनिरुद्ध आणि सौ. मानसी राजंदेकर, फोंडा, गोवा. (७.२.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |