तलाठ्याच्या सख्ख्या भावावर वाळूचोरीची कारवाई !

माण तालुक्यात महसूल विभागाचा वाळू तस्करांना पाठिंबा असल्याचे उघड !

तलाठ्याचे नातलगच वाळूतस्करीत सहभागी असणे प्रशासनाला लज्जास्पद ! – संपादक 

वाळूतस्करीत वापरण्यात आलेला ट्रक

सातारा, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – माण तालुक्यातील हिंगणी गावचे तलाठी मालोजी अंकुश भोसले यांचे सख्खे भाऊ तानाजी अंकुश भोसले यांच्यावर अनधिकृत वाळूउपसा करत असल्याविषयी कारवाई करण्यात आली आहे.

माण-खटावचे उपविभागीय अधिकारी शैलेश सूर्यवंशी आणि माणचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार हेमंत दीक्षित यांनी वाळू तस्करांच्या विरोधात मोहीम उघडली आहे. १३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री दीक्षित यांच्या पथकाने अवैध वाळूउपसा आणि गौण खनिज उत्खननाच्या ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडीमध्ये एक ट्रक आढळून आला. हा ट्रक हिंगणी गावचे तलाठी मालोजी अंकुश भोसले यांचे सख्खे भाऊ तानाजी अंकुश भोसले यांचा असल्याचा तपासाअंती उघड झाले. त्यामुळे माण तालुक्यात वाळू उपशाला महसूल विभागाचे पाठबळ असल्याचे सिद्ध झाले आहे.