आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणातील आरोपी कह्यात !
प्रत्येकच परीक्षेमध्ये घोटाळे उघडकीस येत आहेत. गुन्हा सिद्ध होण्यासाठी लागणारा वेळ आणि शिक्षेचे स्वरूप यांमुळे अशी चुकीची कामे करणार्यांना कोणाचाच धाक राहिलेला नाही. शिक्षेचे स्वरूप पालटून कठोर आणि तात्काळ शिक्षा केल्यास या प्रकारांना आळा बसू शकेल. – संपादक
पुणे – आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणातील बीड येथील दलाल अतुल याला पोलिसांनी कह्यात घेतले आहे. पुणे पोलिसांच्या सायबर पथकाने ही कारवाई केली. आरोपी हा भाजपचे पाटोदा युवा मोर्चाचे अध्यक्ष संजय सानप यांचे नातलग असल्याचे समोर आले आहे. आरोपीने परीक्षेपूर्वी बीडमधील उमेदवारांना एकत्रित करून प्रश्न-उत्तरे पाठ करून घेतली होती, तसेच परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी फरार आरोपी जीवन सानप यांच्या वतीने आलेल्या विद्यार्थ्यांना एकत्रित करण्याचे त्याच्यावर दायित्व होते. आरोग्य भरती मधील घटक ‘क’ आणि ‘ड’ अशा दोन्ही परीक्षांचे पेपर फुटले होते. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी पाटोदा येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष संजय सानप यांना कह्यात घेतले होते, त्यांचा भाऊ जीवन सानप हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता आणि त्यांचे सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके आणि त्यांच्या सहकार्यांनी केली.