न्यायालयाने ५ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली !
अमरावती येथे आयुक्तांच्या अंगावर शाई फेकल्याचे प्रकरण
अमरावती – शहरातील राजापेठ अंडरपास येथे ९ फेब्रुवारी या दिवशी येथील महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या ५ आरोपींना ३ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर १५ फेब्रुवारी या दिवशी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
राजापूर उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या प्रकरणावरून उफाळून आलेल्या वादानंतर येथील आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांना राजापेठ भुयारी मार्गाची पहाणी करण्यासाठी बोलावले होते. तेथे आयुक्त आष्टीकर आल्यानंतर युवा स्वाभिमान संघटनेच्या ३ महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाई फेकली होती. या प्रकरणात आमदार रवी राणा यांच्यासह एकूण ११ जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
या प्रकरणात पोलिसांनी एकूण ५ जणांना अटक केली होती. यामध्ये अजय बोबडे, संदीप गुल्हाने, सुरज मिश्रा, महेश फुलचंद आणि विनोद येवतीकर यांचा समावेश आहे. या प्रकरणात बडनेरा येथील आमदार रवी राणा यांनाही पोलिसांनी आरोपी केले आहे; मात्र आमदार रवी राणा यांनी या प्रकरणात अद्याप अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाहीत, अशी माहिती त्यांचे अधिवक्ता दीप मिश्रा यांनी दिली आहे.