सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी कोरोना महामारीच्या काळात सांगितलेला नामजप केल्याने श्रीमती सुहासिनी पुरोहित (वय ७४ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती

‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला !

प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप शोधतांना सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

१. साधिकेच्या आईने (श्रीमती सुहासिनी पुरोहित यांनी) कोरोनाच्या संदर्भात दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सांगितल्याप्रमाणे वैद्यकीय उपचारांसमवेत प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी नामजप अन् आध्यात्मिक स्तरावरील उपायही करणे

श्रीमती सुहासिनी पुरोहित

‘वर्ष २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढायला लागल्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची ‘वैद्यकीय उपचारांसमवेत स्वतःची प्रतिकारक्षमता आणि आध्यात्मिक बळ वाढण्यासाठी ‘श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री गुरुदेव दत्त । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । श्री दुर्गादेव्यै नमः । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप प्रतिदिन १ माळ (१०८ वेळा) करावा’, अशी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झाली होती. ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून माझी आई श्रीमती सुहासिनी पुरोहित (वय ७४ वर्षे) हा नामजप प्रतिदिन करत आहे. त्याच्याच जोडीला ती प्रार्थना, अत्तर आणि कापूर यांचे आध्यात्मिक स्तरावरील उपायही नियमित करते.

२. बहिणीच्या कुटुंबातील सर्वांना कोरोनाची लागण होणे; परंतु आई तेथेच रहात असूनही तिला कोरोनाची लागण न होणे

सौ. स्नेहल गांधी

माझी आई चिपळूण येथे माझ्या लहान बहिणीकडे (सौ. भाग्यश्री काटदरे हिच्याकडे) वास्तव्याला होती. वर्ष २०२१ मध्ये होळीपौर्णिमेनंतर बहिणीच्या कुटुंबातील सर्वांना (माझी बहीण, तिचे यजमान श्री. बाळकृष्ण काटदरे आणि त्यांची दोन्ही मुले यांना) कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निदान झाले होते. बहिणीच्या यजमानांना आठवडाभर रुग्णालयात भरती करावे लागले होते. त्या वेळी आईची कोरोनाची चाचणी केली असता तिला कोरानाचा संसर्ग झाला नसल्याचे लक्षात आले. बहिणीच्या घरातील सर्वजण कोरोनाबाधित असल्याने आणि तिचे घरही लहान असल्याने ‘आईने अन्यत्र कुठेतरी रहावे’, असे शासकीय आरोग्य कर्मचारी सांगत होते; पण तसे करणे शक्य झाले नाही. नियमांचे पालन करून आई तेथेच राहिली. त्यानंतरही तिला काहीच त्रास झाला नाही.

३. आईने नामजप केल्याने तिला कोरोनाचा संसर्ग न झाल्याने इतर नातेवाईक आणि परिचित यांनाही नामजपाचे महत्त्व पटणे अन् त्यांनीही या कालावधीत आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठीचा नामजप चालू करणे

कोरोनाबाधित व्यक्तींसमवेत राहूनही आईला कोराना झाला नाही, याचे सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. आई नामजप करते, हे सर्वांनाच ठाऊक असल्याने सर्वांनी ‘तुमच्या जपामुळेच तुम्हाला कोरोनाची बाधा झाली नाही’, असे तिला म्हटले. त्यामुळे इतर नातेवाईक अन् परिचित यांनाही नामजपाचे महत्त्व पटले आणि आता त्यांनीही सनातन संस्थेने कोरोना महामारीच्या कालावधीत प्रतिकारक्षमता अन् आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी करावयास सांगितलेला नामजप चालू केला.

४. ‘परात्पर गुरु डॉक्टर केवळ साधकांचीच नव्हे, तर साधकांच्या कुटुंबियांचीही काळजी घेतात’, हे अनुभवून कृतज्ञता वाटणे

साधकांना प्रत्येक संकटातून वाचवणार्‍या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे. ‘परात्पर गुरुदेव केवळ साधकांचीच नव्हे, तर साधकांच्या कुटुंबियांचीही काळजी घेतात’, हे या वेळी मला अनुभवायला मिळाले.

‘परात्पर गुरु डॉक्टर, आपण आम्हाला सतत आपल्या कृपावर्षावाखाली ठेवत आहात, याविषयी मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. स्नेहल संतोष गांधी (श्रीमती सुहासिनी पुरोहित यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.६.२०२१)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक