पुरस्कार मिळाले नाहीत, तरी चालेल; परंतु कोरोना प्रतिबंधक लस घेणार नाही ! – टेनिसपटू नोवाक जोकोविच
लंडन (इंग्लंड) – टेनिस स्पर्धांमध्ये २० ‘ग्रँड स्लँम’ पुरस्कार मिळवलेले आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेले सर्बियाचे जगप्रसिद्ध टेनिसपटू नोवाक जोकोविच यांनी म्हटले आहे की, भविष्यात ‘विंबलडन’, ‘फ्रेंच ओपन’ यांसारख्या स्पर्धांमध्ये भाग घेता आला नाही आणि त्यामुळे त्यांतील पुरस्कार मिळाले नाहीत, तरी चालेल; परंतु मी कोरोना प्रतिबंधक लस घेणार नाही. मी ही किंमत मोजायला सिद्ध आहे. या वेळी त्यांनी हेसुद्धा स्पष्ट केले की, मी लसविरोधी नाही; परंतु प्रत्येकाला ‘लस घ्यावी कि घेऊ नये’, हे निवडण्याचा अधिकार आहे. ‘बीबीसी’ वृत्तवाहिनीने घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
जोकोविच यांनी कोरोनाची लस न घेतल्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने त्यांना गेल्या मासात झालेल्या ‘ऑस्ट्रेलियन ओपन’ स्पर्धेमध्ये भाग घेऊ दिला नव्हता. जोकोविच हे नुकतेच कोरोना संसर्गातून बरे झाल्याने त्यांना डॉक्टरांकडून ऑस्ट्रेलियामध्ये रहाण्याची अनुमती मिळाली होती; परंतु यामुळे ‘समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि लसविरोधी आंदोलनाला बळ मिळू शकते’, अशी शक्यता वर्तवत ऑस्ट्रेलिया सरकारने त्यांचा व्हिसा रहित करत त्यांना देश सोडण्यास सांगितले होते.
Novak Djokovic says he’s prepared to skip French Open, Wimbledon over vaccine mandatehttps://t.co/qJjM1cBLpL via @SInow
— SmartNews (@smartnews) February 15, 2022
जोकोविच पुढे म्हणाले की,
१. मला आशा आहे की, काही ठराविक स्पर्धांमध्ये लसीसंदर्भातील धोरणांमध्ये पालट झाले, तर मी आणखी अनेक वर्षे टेनिस खेळू शकीन. आतापर्यंत मी २० ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. ‘सर्वाधिक स्पर्धा जिंकणार्या पुरुष टेनिसपटूचा विश्वविक्रम माझ्या नावे असावा’, असे माझे स्वप्न आहे; पण मी त्यावरही पाणी सोडायला सिद्ध आहे.
२. याचे कारण म्हणजे लहानपणापासूनच मी काय घ्यावे आणि काय घेऊ नये ? हे ठरवण्याचा अधिकार माझा आहे. याचा मी पुरस्कार करत आलो आहे. ‘एक खेळाडू’ म्हणून मी नेहमीच स्वत:चा आहार, झोपायच्या सवयी आदींकडे बारकाईने लक्ष ठेवले आहे.