प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’चे साधक श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण
प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’चे सूक्ष्मज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण
‘२०.१२.२०२१ या दिवशी ‘गौतमारण्य’ आश्रम, बांदा, पानवळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’ पार पडला. धर्मशास्त्रानुसार या विधीचे महत्त्व पुढीलप्रमाणे आहे.
सहस्रचंद्रदर्शन विधीचे महत्त्व‘व्यक्तीच्या आयुष्याची ८० वर्षे पूर्ण होतात, तेव्हा तिला जीवनात एकूण १००० वेळा चंद्राचे दर्शन झालेले असते. व्यक्तीच्या उतारवयात शरिराची इंद्रिये क्षीण होतात. हा विधी केल्याने देवतांचा आशीर्वाद प्राप्त होऊन विधी करणार्या व्यक्तीच्या इंद्रियांना पुष्टी, म्हणजे बळ आणि आरोग्य प्राप्त होते.’ |
या सोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण देवाच्या कृपेमुळे मला करता आले. ते पुढे दिले आहे.
१. सहस्रचंद्रदर्शन शांती विधी मांडणी
१ अ. नवग्रहांची मांडणी : विधीच्या आरंभी नवग्रह देवतांची मांडणी करण्यात आली. त्या वेळी प्रत्येक ग्रहाच्या मांडणीभोवती विशिष्ट रंगांच्या, म्हणजे लाल, पांढर्या, निळ्या इत्यादी दैवी रंगांच्या लहरी आकृष्ट होतांना दिसल्या.
१ आ. ब्रह्मादिमंडल देवतांची मांडणी : याचा अर्थ भद्रपीठ, म्हणजे देवतांसाठीचे आसन. काही सुपार्यांवर विशिष्ट देवतांचे आवाहन करून त्याच्यावर तांदळाची राशी घालून त्यावर कलश ठेवला जातो आणि त्यावर मुख्य देवतेचे आवाहन केले जाते. विधीतील मुख्य देवता, म्हणजे ‘चंद्र’ याचे हे आसन आहे. या ठिकाणी विविध रंगांच्या दैवी लहरी एकत्रित स्वरूपात आकृष्ट झालेल्या दिसल्या.
१ इ. कलशाची स्थापना : कलशावर विधीची प्रधान देवता ‘चंद्र’ याची स्थापना करण्यात आली. तेव्हा चंद्राच्या सुवर्णाच्या प्रतिमेतून उदबत्तीचा पांढरा धूर बाहेर पडतांना दिसतो, त्याप्रमाणे पांढर्या रंगाच्या ‘चंद्रलहरी’ वातावरणात प्रक्षेपित होत होत्या. कलशावरील मृत्यूंजय देवतेकडून जांभळ्या रंगाच्या आणि सूर्यदेवतेकडून पिवळ्या-पांढर्या दैवी लहरींचे प्रक्षेपण होत होते. या देवतांच्या समवेत कलशावर प.पू. दास महाराज यांच्या ‘स्वाती’ जन्मनक्षत्राची स्थापना करण्यात आली होती.
२. देवतांची पूजा आणि आवाहन
२ अ. कलशावरील देवतांची पूजा करणे : कलशावरील ‘चंद्र’, ‘मृत्युंजय’, ‘सूर्य’ आणि प.पू. दास महाराज यांचे जन्मनक्षत्र ‘स्वाती’ यांची पूजा करून त्यांना फुले वहाण्यात आली, तेव्हा या देवतांकडून प्रक्षेपित होत असलेल्या दैवी लहरी प्रथम फुलांमध्ये घनीभूत झाल्या आणि त्यानंतर त्यांचे वातावरणात प्रक्षेपण होऊ लागले. त्यामुळे वातावरणातील सात्त्विकतेच्या प्रमाणात आणखी वाढ झाली.
२ आ. यज्ञात ‘वरद’ अग्नीचे आवाहन करणे : यज्ञ आरंभ करतांना ‘वरद’ अग्नीचे आवाहन करण्यात आले, तेव्हा यज्ञकुंडात मला अग्निदेवाचे दर्शन झाले. त्या वेळी अग्निदेवाच्या उजव्या हाताची आशीर्वादाची मुद्रा होती आणि त्याच्या डाव्या हाताचे अंगठ्याचे टोक आणि तर्जनीचे टोक जुळलेले होते, म्हणजे त्याची ध्यानमुद्रा होती.
२ इ. यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित करणे : यज्ञकुंडात देवतांना आहुती देण्यासाठी अग्नी प्रज्वलित केल्यावर त्या ठिकाणी अनेक देवता सूक्ष्मातून उपस्थित झाल्याचे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले. एरव्ही विधीसाठी देवतांना उपस्थित रहाण्यासाठी त्यांना तळमळीने ‘आवाहन आणि प्रार्थना’ केल्यास त्या यज्ञाला सूक्ष्मातून उपस्थित रहातात; परंतु ‘हा विधी संतांसाठी असल्याने ‘पुरोहितांनी देवतांना यज्ञाला उपस्थित रहाण्याचे आवाहन करणे’, हे निमित्तमात्र असून विधीसाठी देवता स्वतःहून उपस्थित राहिल्या आहेत’, असे मला जाणवले.
३. प्रत्यक्ष यज्ञास आरंभ झाल्यावर दैवी शक्ती अन् देवता यांची उपस्थिती असणे
३ अ. यज्ञाला आरंभ झाल्यावर यज्ञकुंडाच्या वरून पहिल्या मेखलेवर कनिष्ठ स्वर्गलोकातील स्त्री दैवी शक्ती सूक्ष्मातून उपस्थित रहाणे आणि त्यांनी यज्ञात फुले अर्पण करणे : यज्ञकुंडाची वरून पहिली मेखला (टीप) पांढर्या रंगाची असते. यज्ञाला आरंभ झाल्यावर त्या मेखलेच्या चारही बाजूंवर थोड्या थोड्या अंतरांवर काही स्त्री दैवी शक्ती सूक्ष्मातून उभ्या होत्या. त्या स्त्री दैवी शक्ती कनिष्ठ स्वरूपाच्या होत्या. त्यामुळे यांना ‘कनिष्ठा’, असे म्हणतात. त्या स्त्री दैवी शक्तींनी कनिष्ठ स्वर्गलोकातून आणलेली दैवी फुले यज्ञकुंडात अर्पण केली.
(टीप – यज्ञकुंडाच्या भोवती पायर्यांप्रमाणे तीन टप्पे असतात. त्यांना यज्ञकुंडाच्या ‘मेखला’ म्हणतात.)
३ अ १. स्त्री दैवी शक्तींनी यज्ञकुंडात दैवी फुले अर्पण करण्यामागील कारण : ‘पृथ्वीवर चालत असलेल्या विविध यज्ञांमध्ये कधीकधी कनिष्ठ स्वर्गलोकातील स्त्री दैवी शक्ती सूक्ष्मातून उपस्थित रहातात आणि या संधीचा आध्यात्मिक लाभ करून घेतात.
यज्ञाच्या वेळी स्त्री दैवी शक्ती कनिष्ठ स्वर्गलोकातून आणलेली दैवी फुले यज्ञात अर्पण करतात. या त्यांच्या उपासनेमुळे त्यांना यज्ञातून दैवी ऊर्जा प्राप्त होते. परिणामी स्त्री दैवी शक्तींच्या आध्यात्मिक बळात वृद्धी होते. त्यामुळे कालांतराने त्यांना कनिष्ठ स्वर्गलोकातून उच्च स्वर्गलोकात लवकर स्थान प्राप्त होते.
३ आ. यज्ञात आहुतीच्या वेळी सूक्ष्मातून उपस्थित असलेल्या नवग्रह देवतांची वर्णने : यज्ञात नवग्रहांना आहुती देण्याची वेळ आली, तेव्हा मला त्या देवतांचे दर्शन झाले. त्यांची वेशभूषा पुढीलप्रमाणे होती. ‘देवतांच्या हातांत आणि गळ्यांत सुर्वणाच्या रंगाचे अलंकार होते, प्रत्येकाच्या डोक्यावर सुवर्ण अन् चंदेरी रंगांचा मुकूट होता. प्रत्येक देवतेने कमरेला पांढर्या, निळ्या आणि पिवळ्या रंगाचे सोवळे नेसले होते. प्रत्येक देव हात जोडून उभा होता.’ या देवतांची नावे मला ओळखता आली नाहीत.
४. यज्ञातील आहुती देवतांनी ग्रहण करणे
४ अ. नवग्रह देवतांनी यज्ञात आहुती ग्रहण करण्याची पद्धत : नवग्रहांना यज्ञात आहुती देण्याची वेळ आली, तेव्हा मला यज्ञकुंडात एका बाजूला सूक्ष्मातून नवग्र्रह देवता एकत्रित एका गटाने उभे असलेल्या दिसल्या. यज्ञाचे पुरोहित एका विशिष्ट ग्रहाच्या देवतेला आहुती देण्यास आरंभ करायचे, तेव्हा ती ग्रहदेवता अन्य ग्रहदेवतांतून पुढे, म्हणजे यज्ञाच्या मध्यभागी येऊन स्थिर व्हायची. पुरोहितांनी त्या देवतेला आहुती देण्यास आरंभ केल्यावर यज्ञकुंडातून दैवी ऊर्जेची निर्मिती व्हायची. ही दैवी ऊर्जा ती देवता ग्रहण करायची.
४ आ. ज्या ग्रहदेवतेसाठी आहुती दिली जाते, त्याच ग्रहदेवतेने दैवी ऊर्जा ग्रहण करणे : त्यानंतर पुरोहित त्यापुढील ग्रहदेवतेला आहुती देण्यास आरंभ करायचे. त्या आधी यज्ञाच्या मध्यभागी असलेली पूर्वीची ग्रहदेवता अन्य ग्रहदेवतांमध्ये जायची आणि पुरोहितांनी पुढील ग्रहदेवतेचे नाव उच्चारल्यावर ती ग्रहदेवता अन्य ग्रहदेवतांतून पुढे येऊन यज्ञकुंडाच्या मध्यभागी स्थिर व्हायची.
हीच प्रक्रिया यज्ञाला उपस्थित प्रत्येक ग्रहदेवतेच्या संदर्भात घडली. यात वैशिष्ट्य म्हणजे पुरोहित ज्या ग्रहदेवतेसाठी यज्ञात आहुती द्यायचे केवळ ती देवताच यज्ञातून निर्माण झालेली दैवी ऊर्जा ग्रहण करायची आणि त्या वेळी अन्य ग्रहदेवता तटस्थपणे उभ्या असायच्या. याचा अर्थ ज्या देवतेसाठी आहुती चालू आहे तिच्यासाठीची दैवी ऊर्जा अन्य ग्रहदेवता स्वतः ग्रहण करत नव्हत्या.
प.पू. दास महाराज यांच्या ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’च्या दिवशी साधक त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत असतांना ‘सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले पुष्पवृष्टी करत आहेत’, असे प.पू. दास महाराज यांना जाणवणे
‘२०.१२.२०२१ या दिवशी गौतमारण्य आश्रम, बांदा, पानवळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे प.पू. दास महाराज यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’ झाला. या सोहळ्याच्या निमित्ताने साधकांना प.पू. दास महाराज यांच्यावर पुष्पवृष्टी करण्याची संधी मिळाली. त्याविषयी प.पू. दास महाराज मला म्हणाले, ‘‘साधक माझ्यावर पुष्पवृष्टी करत असतांना मला त्यांच्या जागी सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले माझ्यावर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे मला जाणवत होते.’’ – श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.१.२०२२) |
५. यज्ञ चालू असतांना घडणार्या घटना, त्याचे परिणाम आणि कारणे
५ अ. यज्ञात देवतांना आहुती चालू असतांना यज्ञकुंडाच्या भोवती ईश्वराचे मोठे सुरक्षाकवच निर्माण होण्याचे कारण : पुरोहित यज्ञात नवग्रह देवतांना आहुती देत होते, त्या वेळी यज्ञकुंडाच्या भोवती सूक्ष्मातून पांढर्या रंगाचे मोठे संरक्षककवच निर्माण झालेले दिसले. त्यामागील कारण पुढीलप्रमाणे आहे. ‘यज्ञ चालू असतांना तेथे यज्ञातून निर्माण होणारी दैवी ऊर्जा ग्रहण करण्यासाठी देवता उपस्थित असतात. ही दैवी ऊर्जा चोरण्यासाठी यज्ञाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अनिष्ट शक्ती जमलेल्या असतात. ‘अनिष्ट शक्तींना यज्ञातील दैवी ऊर्जा मिळू नये’, यासाठी यज्ञाच्या भोवती ईश्वराचे संरक्षणकवच निर्माण झालेले असते.’
५ आ. यज्ञात पुरोहितांकडून होणारे मंत्रोच्चार किंवा आहुती यांत दोष निर्माण झाल्यास होणारा परिणाम : यज्ञात नवग्रहांपैकी एका ग्रहदेवतेला आहुती चालू असतांना ‘ती यज्ञकुंडाच्या मध्यभागी सूक्ष्मातून उपस्थित राहून आहुती ग्रहण करत आहे’, असे दृश्य मला दिसले. एका मंत्राच्या वेळी ‘काही कारणास्तव मनुष्य आपले पाय अकस्मात् मागे घेतो, त्याप्रमाणे ती देवता अकस्मात् यज्ञाच्या मध्यभागापासून थोडी मागे आली’, असे दृश्य मला सूक्ष्मातून दिसले. त्यामागील कारण पुढीलप्रमाणे होते. ‘मंत्र म्हणतांना पुरोहितांकडून मंत्रांचा उच्चार चुकल्यास किंवा आहुतीमध्ये काही दोष असल्यास देवता ती आहुती ग्रहण करत नाही. परिणामस्वरूप ती देवता तेवढ्या वेळापुरती आपल्या स्थानापासून मागे सरकते.’
त्यामुळे धर्मशास्त्रात सांगितल्यानुसार यज्ञाच्या शेवटी यज्ञात कळत अथवा नकळत झालेल्या चुकांसाठी यज्ञाचे यजमान आणि पुरोहित देवाची क्षमा मागतात. देवतांनी यज्ञ करणार्यांना क्षमा केल्याने यज्ञातून अपेक्षित अशी फलप्राप्ती होण्यास साहाय्य होते आणि देवताही संतुष्ट होतात.
५ इ. यज्ञात ग्रहदेवतेला आहुती चालू असतांना तिची समोर असलेली दृष्टी कधी कधी ऊर्ध्व दिशेने होण्यामागील कारण : यज्ञात नवग्रहांपैकी एका ग्रहदेवतेला आहुती चालू असतांना ती ग्रहदेवता यज्ञाच्या मध्यभागी उपस्थित होती. त्या वेळी त्या देवतेची समोर असलेली दृष्टी कधी कधी वरच्या दिशेने, म्हणजे ऊर्ध्व व्हायची. त्यामागील कारण आहे, ‘यज्ञात प्राप्त झालेली दैवी ऊर्जा ग्रहण करतांना कधीकधी त्या देवतेची दृष्टी ऊर्ध्व होते, तेव्हा त्या देवतेचा पृथ्वीवरील वातावरण आणि परिस्थिती यांच्याशी असलेला संपर्क तुटून तो केवळ ईश्वराशी रहातो. त्यामुळे यज्ञकुंडातून बाहेर पडणारी ऊर्जा त्या देवतेला जलद गतीने ग्रहण करता येते आणि ती लवकर संतुष्ट होते.’
५ ई. यज्ञात आहुती ग्रहण करतांना प्रथम देवतेची मुद्रा नमस्काराची अथवा शस्त्र धारण केल्याची असणे आणि आहुतीच्या शेवटी ती आशीर्वादाची होण्यामागील कारण : यज्ञात विशिष्ट देवतेसाठी आहुती चालू असतांना प्रथम तिची नमस्काराची अथवा हातात शस्त्र धारण केल्याची मुद्रा असते. यज्ञात त्या देवतेसाठी शेवटची आहुती चालू असते, तेव्हा ती देवता आशीर्वादाच्या मुद्रेत येते.
असे घडण्यामागील कारण पुढे दिले आहे. ‘यज्ञ करणार्या पुरोहितांचा भाव आणि यज्ञातून मिळणारी दैवी ऊर्जा’, यांमुळे ती देवता संतुष्ट होते आणि ती कल्याणकारी अथवा कृपास्वरूप अवस्थेत येते. परिणामस्वरूप देवतेच्या मुद्रेत पालट होतो.’
५ उ. यज्ञात आहुती ग्रहण करण्यासाठी नवग्रहदेवतांच्या समवेत त्यांच्या उपशक्तीही येणे : यज्ञाच्या आरंभापासून आहुती ग्रहण करण्यासाठी नवग्रहदेवता उपस्थित असल्याचे दृश्य मला दिसत होते; परंतु यज्ञाचा मध्य आल्यावर मला त्यांच्यासमवेत काही स्त्री दैवी शक्ती दिसू लागल्या, तेव्हा माझ्या मनात ‘या स्त्री दैवी शक्ती कोण आहेत ?’, असा प्रश्न आला.
त्याचे मला सूक्ष्मातून मिळालेले उत्तर पुढे दिले आहे. ‘नवग्रहांतील प्रत्येक ग्रहदेवतेला उपशक्ती आहेत आणि त्या शक्ती स्त्री रूपात असतात. यज्ञात विशिष्ट देवतेला आहुतीतून दैवी ऊर्जेतील मोठा भाग मिळतो आणि उर्वरित काही भाग त्या देवतेच्या उपशक्तींनाही मिळतात. त्यामुळे देवतेचे कार्य पूर्ण करण्यास तिला तिच्या उपशक्ती साहाय्य करतात, उदा. यज्ञात सूर्यदेवतेला आहुती दिल्यावर त्याचा काही भाग त्याच्या उपशक्तीला, म्हणजे ‘गायत्री’ शक्तीला मिळतो.’
(क्रमशः उद्याच्या अंकी)
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१२.२०२१)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |