संभाजीनगर येथील वेरूळ लेणीजवळील कीर्तीस्तंभ हटवला जाणार नाही ! – केंद्रीय संस्कृती मंत्री जी. किशन रेड्डी यांचे आश्वासन
संभाजीनगर – वेरूळ लेणीच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारासमोर जैन धर्माचा कीर्तीस्तंभ आहे. वेरूळ लेणीमध्ये बौद्ध, हिंदु आणि जैन धर्माच्या लेणी असतांना केवळ एकाच धर्माचे प्रतीक असणारा स्तंभ चुकीचा वाटतो. यामुळे तो स्थलांतरित करून त्या जागी ‘वर्ल्ड हेरिटेज स्टोन’ हा नामफलक बसवण्यात येणार आहे, असे भारतीय पुरातत्व खात्याने सांगितले होते. त्यानंतर या विरोधात देशभरातील जैन समाजामध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर जैन कीर्तीस्तंभ हटवण्यात येणार नाही, असे आश्वासन केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांना दिले.
यासंबंधी ‘अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघाचे’ राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली जैन समाजाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांची भाग्यनगर येथे भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेनंतर जी. किशन रेड्डी यांनी जैन समाजाचे राष्ट्रनिर्माण कार्यात असलेले योगदान आणि भगवान महावीर यांचा विश्वशांतीचा संदेश देशातील सर्वांसाठीच सन्माननीय आहे, त्यामुळे जैन समाजाच्या भावना दुखावतील, असा कोणताही निर्णय पुरातत्व विभागाच्या वतीने घेतला जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिले, तसेच या संदर्भात संबंधित वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. यासंबंधी केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी एक व्हिडिओ संदेश प्रसारित केला आहे.