पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना पाठिंबा देण्यासाठी सामाजिक माध्यमांद्वारे मोहीम !
कोल्हापूर, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – काही मासांपूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव म्हणून शिवराज नाईकवाडे यांची जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नियुक्ती केली. नाईकवाडे यांच्याकडे साहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातीलही पदभार आहे. नाईकवाडे यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी समितीच्या कारभारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही जणांनी विधी आणि न्याय विभागाकडे पत्रव्यवहार करून देवस्थान समितीला पूर्णवेळ सचिव देण्याची मागणी केली. असे करून एकप्रकारे नाईकवाडे यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न चालू आहे.
असे असले तरी सामाजिक माध्यमांद्वारे शिवराज नाईकवाडे यांना पाठिंबा देण्यासाठी ‘वी स्टँड विथ शिवराज नाईकवाडे’ (आम्ही शिवराज नाईकवाडे यांच्या समवेत आहोत.) या ‘हॅशटॅग’द्वारे मोहीम चालू करण्यात आली आहे. याची नोंद घेत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ‘‘चांगले काम करणार्या अधिकार्यांवर अन्याय होऊ देणार नाही. वेळप्रसंगी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलू’’, असे पत्रकारांना सांगितले. नाईकवाडे यांनी देवस्थान समितीमधील काही अनियमित गोष्टींवर चाप लावण्याचा प्रयत्न केल्याने त्यांचे स्थानांतर करण्याचे प्रयत्न चालू आहेत, अशीही चर्चा नागरिकांमध्ये आहे.