जमावबंदीचा आदेश झुगारून हिजाबच्या समर्थनार्थ मोर्चे !
|
मुंबई, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी राज्यात जमावबंदीचा आदेश असतांनाही तो झुगारून हिजाबच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात येत आहेत. या मोर्च्यांमध्ये कोरोनाविषयक सामाजिक अंतर राखण्याचा नियमही धाब्यावर बसण्यात येत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथे ‘युथ ऑफ कौसा गाव’ आणि ‘रियाज एज्युकेशन वेलफेअर ट्रस्ट’ या संघटनांनी १३ फेब्रुवारी या दिवशी कौसा येथील जामा मशिदीपासून दारूल फलाह मशिदीपर्यंत मोर्चा काढला. या मोर्च्यात शेकडो मुसलमान महिला सहभागी झाल्या होत्या. राज्यातील जमावबंदीचा नियम धाब्यावर बसवून हा मोर्चा काढण्यात आला असतांनाही पोलिसांनी अद्याप संबंधितांविरुद्ध कोणतीही कारवाई केलेली नाही. यापूर्वी ठाणे जिल्ह्यातील कल्याण, तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथेही जमावबंदीचा आदेश झुगारून हिजाबच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये मालेगाव येथे जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी पोलिसांनी आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.