वणवा लागूच नये; म्हणून प्रयत्न व्हायला हवेत ! – आमदार शेखर निकम

चिपळूण येथे ‘वणवामुक्त कोकण समिती’च्या वतीने जनजागृती आणि पुरस्कार सोहळा

चिपळूण, १४ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘वणवामुक्त कोकण समिती’च्या वतीने चालू असलेले प्रयत्न सामाजिक बांधीलकीचा भाग आहे. हे अभिनंदनीय कार्य होत असतांना गावातल्या लोकांनीही या कार्यात स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा आहे. वणवा लागूच नये; म्हणून प्रयत्न व्हायला हवेत, असे मत येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले.

‘सह्याद्री निसर्ग मित्र’च्या ‘वणवामुक्त कोकण समिती’च्या वतीने येथील पंचायत समितीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात वणव्याविषयी जनजागृती आणि पुरस्कार सोहोळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते.

या वेळी व्यासपिठावर पंचायत समितीच्या सभापती रिया कांबळे, उपसभापती प्रतापराव शिंदे, पंचायत समितीचे सदस्य, वन अधिकारी श्रीमती कीर, वणवा मुक्त कोकण समितीचे अध्यक्ष श्रीराम रेडीज, सचिव भाऊ काटदरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वणवा मुक्त कोकण समितीचे कार्याध्यक्ष प्रकाश (बापू) काणे यांनी केले. पुरस्कार सोहोळ्याचे सूत्रसंचालन विलास महाडिक यांनी केले.

आमदार शेखर निकम पुढे म्हणाले की, वणवा लागल्यानंतर त्याचे होणारे दुष्परिणाम कोकणात अनेकांनी भोगलेले आहेत. पूर्वी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयामध्ये शिकणारे पश्‍चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी वणवा विझवण्यासाठी योगदान द्यायचे. ‘वीजवाहिनीमुळेही वणवा लागत असतो’, असा आमचा अनुभव आहे. वणव्याची आग ही सुमारे तीसेक फूट जीभ टाकून पुढे जात असते. त्यामुळे वणवे लावणार्‍यांवर गुन्हे नोंद होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, त्याचसमवेत ‘कोकणातील एवढ्या गवताचा उपयोग कसा करता येईल ?’, हेही पहायला हवे.

उपसभापती प्रतापराव शिंदे म्हणाले, ‘‘पर्यावरणाच्या या गंभीर प्रश्‍नावर उपाययोजना शासनाने सांगायला हव्यात. लाकूडतोड कोण थांबवणार आहे ? आपल्या पूर्वजांनी दारिद्य्र सहन करूनही स्वत:च्या लाभासाठी झाडे तोडली नाहीत. मग आम्ही का ती तोडत आहोत?’’

मान्यवरांचा सत्कार

या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रमांक कळवंडे, द्वितीय क्रमांक पाचाड आणि तृतीय क्रमांक रेहेळ या ग्रामपंचायतींना सन्मानपत्र, मानचिन्ह, निसर्गग्रंथ, ‘सिलिंग फॅन’ यांसह आदर्श गाव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

वणवा मुक्तीच्या कामात योगदान देणार्‍या खेर्डी, धामणवणे, टेरव, कामथे, कापसाळ, कळंबस्ते, वालोपे, पेढे, परशराम, कालुस्ते, मिरजोळी, शिरळ, धामणदेवी ग्रामपंचायती, वणवा मुक्त समिती पाचाड, तसेच बाळ महादेव खेडेकर, शुभम् दीपक खेडेकर, कृषिरत्न पुरस्कार प्राप्त दिनेश दळवी (वालोटी), मंदार ठसाळे (धामेली), अमित महाडिक (कापसाळ) आदींना सन्मानित करण्यात आले.

वणवा मुक्तीसाठी वन विभागाने पुरस्कार घोषित करावा, वणव्याची चौकशी व्हावी, वणवा लावणार्‍यांना कठोर शिक्षा व्हावी, वणव्याची पहिली माहिती देणार्‍या व्यक्तीचा सन्मान केला जावा, अशा मागण्या या वेळी ग्रामस्थांकडून करण्यात आल्या.