ईश्वराकडे जायचे असल्यास साधकांनी ईश्वरेच्छेने वागायला शिकले पाहिजे ! – परात्पर गुरु डॉ. आठवले
‘गोवा येथील श्री. श्रीराम बाबूराव खेडेकर यांना पूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या सत्संगात झालेले संभाषण पुढे दिले आहे.
१. परात्पर गुरु डॉक्टरांचे सार्वजनिक प्रवचन ऐकल्यावर सनातनमय होऊन ‘विश्वशांतीसाठी ‘गुरुकृपायोगानुसार’ साधना करणे’, हाच योग्य मार्ग आहे’, याची निश्चिती होणे
मी : ‘वर्ष १९९७ मध्ये सावर्डे येथे तुमचे सार्वजनिक प्रवचन ऐकले आणि मी सनातनमय झालो.
परात्पर गुरु डॉक्टर : अरे वा ! वर्ष १९९७ मधील घटनेची कशी काय आठवण ठेवली ?
मी : मी तुमचे प्रवचन विसरूच शकत नाही. लहानपणापासून, म्हणजे वयाच्या १५ वर्षांपासून माझ्या मनात ‘आपण विश्वशांतीसाठी काहीतरी करणे आवश्यक आहे’, असे विचार सतत येत होते. यासाठी ‘मलाच त्याचा आरंभ करणे भाग आहे’, असे वाटायचे; परंतु ‘नेमका कुठून आणि कसा आरंभ करायचा ?’ याचा मार्ग मला सापडत नव्हता. जेव्हा सार्वजनिक सभेत साधनेविषयी तुमचे मार्गदर्शन लाभले, तेव्हा मला कळून आले की, विश्वशांतीसाठी योग्य मार्ग म्हणजे प्रत्येकाने ‘गुरुकृपायोगानुसार’ साधना करणे ! मी झोकून देऊन सेवा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात मला आनंदही मिळतो. आधी सेवा करतांना ताण यायचा; परंतु गेल्या २ वर्षांपासून ‘ताण येत नाही आणि देवच करवून घेतो’, याची अनुभूती येते.
परात्पर गुरु डॉक्टर : हे प्रगतीचे लक्षण आहे.
२. व्यष्टी साधनेकडे दुर्लक्ष होत असल्यास ‘शिक्षापद्धतीचा अवलंब करा’, असे सांगून परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘आरंभी परेच्छेने आणि नंतर ईश्वरेच्छेने वागायला हवे’, असे मार्गदर्शन करणे
मी : आधी मला घरून विरोध व्हायचा. आता तसे होत नाही.
परात्पर गुरु डॉक्टर : वादविवाद झाल्यास आपण बाजूला होऊन नामजप करत बसायचे आणि रागावर नियंत्रण आणायचे.
मी : व्यष्टी साधनेसंबंधी स्वयंसूचनांचे सत्र करण्यात माझा चालढकलपणा होतो. ‘केवळ भरपूर नामजप करून समष्टी सेवा करावी’, असे मला वाटते. माझ्याकडून चुकांकडे लक्ष देणे होत नाही.
परात्पर गुरु डॉक्टर : यासाठी शिक्षापद्धतीचा अवलंब करा आणि दैनंदिनी लिहित जा, तसेच स्वयंसूचनाही सिद्ध करा. त्याप्रमाणे स्वयंसूचना घेतल्या की, झाले. स्वतःला वाटते, तसे वागायचे नसते, तर आरंभी परेच्छेने आणि नंतर ईश्वरेच्छेने वागायचे असते. स्वेच्छेने वागणे, म्हणजे इतर प्राणी आणि जनावरे यांच्याप्रमाणे वागणे झाले. ईश्वराकडे जायचे असल्यास ईश्वरेच्छेने वागायला शिकले पाहिजे.’
परात्पर गुरु डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभल्याने मी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– श्री. श्रीराम बाबूराव खेडेकर, नागेशी, फोंडा, गोवा. (१२.७.२०१९)