मुंबईत विनयभंगाच्या गुन्ह्यातील क्रीडा शिक्षकाची निर्दोष सुटका !

मुंबई – येथील एका शाळेतील इयत्ता ७ वीत शिकणार्‍या अल्पवयीन मुलीने ४१ वर्षीय क्रीडा शिक्षकाने वाईट हेतूने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी क्रीडा शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. बोरिवली येथील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने या क्रीडा शिक्षकाची निर्दोष सुटका केली आहे.

हा निकाल देतांना झालेले निरीक्षण नोंदवतांना न्यायालय म्हणाले, ‘‘चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श, यांमध्ये केसाइतके अंतर आहे. त्यामुळे केवळ स्पर्श केल्याच्या कारणावरून कुणाविरोधात विनयभंगाचा आरोप सिद्ध होऊ शकत नाही. प्रत्येक स्पर्श हा वाईट नसतो. आरोपीने वाईट हेतूने पीडितेला स्पर्श केल्याचे ठोस पुरावे न्यायालयात जोपर्यंत सादर केले जात नाहीत, तोपर्यंत संबंधित स्पर्शाला असभ्य भावनेने केलेला हल्ला म्हणता येणार नाही किंवा तक्रारदार मुलगी वा महिलेच्या विनयशीलतेचा अपमान झाला असेही म्हटले जाऊ शकत नाही.’’