युक्रेनकडून रशियाला बैठकीसाठी पाचारण

युक्रेन-रशिया सीमासंघर्ष

युक्रेनच्या सीमेजवळ १ लाख सैनिक तैनात केल्याविषयी द्यावे लागणार उत्तर !

प्रतिकात्मक छायाचित्र

किव (युक्रेन) – युक्रेनने ‘ऑर्गनायझेशन फॉर सेक्युरिटी अँड को-ऑपरेशन इन युरोप’ (युरोपातील सुरक्षा आणि साहाय्य संघटना) या संघटनेद्वारे रशियासमवेत पुढील ४८ घंट्यांत बैठक बोलावली आहे. रशियाने युक्रेनच्या सीमेजवळ १ लाख सैनिक तैनात केल्याच्या पार्श्‍वभूमीवर युक्रेनने यापूर्वी ‘रशियाने आम्हाला याविषयी सविस्तर उत्तर द्यावे’, या मागणीसाठी अधिकृतरित्या बैठक बोलावली होती; परंतु रशियाने युक्रेनची मागणी धुडकावून लावली होती. त्यामुळेच आता युक्रेनने युरोपातील संघटनेच्या माध्यमातून रशियाला बैठकीला उपस्थित रहाण्यास सांगितले आहे. दोन्ही देशांमधील तणाव अल्प करण्यासाठी रशियाने बैठकीला उपस्थित रहाणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.