‘व्हॅलेंटाईन डे’ ही पाश्चात्त्य कुप्रथा बंद करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीची प्रबोधन मोहीम !
|
सोलापूर, ११ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करणे म्हणजे पाश्चात्त्यांच्या नीतीहीनतेचे अनुकरण करणे, म्हणजेच पर्यायाने हिंदु संस्कृतीचे अवमूल्यन करणे होय ! त्यामुळे हिंदूंच्या एक दिवसाच्या वैचारिक धर्मांतराला प्रोत्साहन मिळते. ही पाश्चात्त्य कुप्रथा बंद करण्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सोलापूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यांमध्ये पोलीस, प्रशासन, शाळा-महाविद्यालये येथे निवेदन देणे, शाळा-महाविद्यालयांत युवकांचे प्रबोधन करणे, हस्तपत्रकांद्वारे प्रबोधन करणे, फलकांद्वारे प्रबोधन करणे, असे विविध उपक्रम राबवण्यात आले. या उपक्रमाला प्रशासन, शाळा-महाविद्यालय येथे पुष्कळ मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद लाभला.
सोलापूर – येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूलचे नायब तहसीलदार संदीप लटके यांच्यासह पोलीस अधीक्षक कार्यालयाला निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संदीप ढगे, यश शीरसागर, रमेश आवार, उमाकांत नादरगी, दत्तात्रय पिसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. येथील २९ शाळा आणि २८ महाविद्यालय येथे धर्मप्रेमींनी निवेदन दिले.
अंबाजोगाई (जिल्हा बीड) – येथील तहसीलदार स्मिता बाहेती, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील लिपीक श्रीमती बनसोडे यांना निवेदन देण्यात आले, तसेच येथील २ शाळा आणि ७ महाविद्यालय येथेही निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री नवनाथ अप्रुपल्ले, बालाजी भारजकर, आकाश चौरे, अधिवक्ता अशोक मुंडे, मंगेश बारस्कर, श्रीमती सीमा पाटील, कु. रक्षंदा बलुतकर, सौ. शोभा चौधरी, सौ. सुनिता पंचाक्षरी, सौ. लता जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
कुर्डूवाडी (जिल्हा सोलापूर) – येथील प्रांत कार्यालय येथे नायब तहसीलदार आर्.आर्. कदम यांना निवेदन देण्यात आले, तसेच स्वरक्षण प्रशिक्षण वर्गातील धर्मप्रेमी सौ. ज्योती जाधव आणि कु. सिद्धी नेने यांनी येथील विविध ६ शाळा-महाविद्यालयांत निवेदन देऊन मुला-मुलींचे प्रबोधन केले. या वेळी ३०० विद्यार्थी उपस्थित होते.
धाराशिव – येथे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले, तसेच येथील १० शाळा आणि महाविद्यालय येथेही निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री अनिकेत गणेश, आदित्य पाटोळे, अविनाश चौगुले, कु. ऋतुजा ढगे, कु. भगवती बोचरे, कु. आरती पवार आणि कु. चारुशीला शिंदे आदी समितीचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी उपस्थित होते.
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – येथे नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे आणि पोलीस निरीक्षक आदीनाथ काशीद यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
माळशिरस (जिल्हा सोलापूर) – येथे समितीच्या कार्यकर्त्यांनी ४ शाळा-महाविद्यालये येथे निवेदन दिले.
विशेष
१. सोलापूर येथील छत्रपती शिवाजी पूर्वप्राथमिक शाळेतील शिक्षकांना निवेदन देऊन विषय सांगितल्यावर ते म्हणाले की, ‘व्हॅलेंटाईन डे’चे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम आहेत हे आम्हाला आजच समजले, त्यामुळे यापुढे आम्हीही ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करू नये याविषयी नातेवाईक, मित्रमंडळी यांचे प्रबोधन करू.
२. सोलापूर येथील रावजी सखाराम कॉमर्स कॉलेजचे मुख्याध्यापक श्री. ढोबळे सर म्हणाले की, ख्रिश्चन पंथीय लोक हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी घरोघरी फिरतात; मात्र तुम्ही आपली संस्कृती जपण्यासाठी प्रबोधन करत आहात, हे कौतुकास्पद आहे. तुम्ही पुष्कळ मोठे कार्य करत आहात.
हे पण वाचा –
♦ रत्नागिरीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस, प्रशासन, शाळा आणि महाविद्यालये येथे निवेदन
https://sanatanprabhat.org/marathi/549717.html
३. अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील प्राचार्य श्री. शिंदे सर म्हणाले की, हिंदु जनजागृती समितीचे उपक्रम चांगले आहेत. महाविद्यालयातील मुला-मुलींना स्वरक्षण प्रशिक्षण शिकवण्यासाठी आम्ही आपल्याला अवश्य संपर्क करू, तसेच नैतिक मूल्यांचे संवर्धन आणि मुलांना संस्कृतीचे महत्त्व कळावे, यासाठी कॉलेजमधील दिनविशेषाच्या दिवशी आवश्य निमंत्रित करू. आमचे तुम्हाला नियमित सहकार्य राहील. तुमचे कार्य चांगले आहे.
४. अंबाजोगाई येथील टी.बी. गिरवलकर पॉलिटेकनिक महाविद्यालयातील प्राचार्य शेट्टी सर यांनी सांगितले की, हे निवेदन आणि याविषयीचे प्रबोधन महाविद्यालयातील सूचनाफलकावर लावून मुलांचे प्रबोधन करू. या वेळी महाविद्यालयाच्या परिसरातील युवकांना ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा न करण्याविषयी प्रबोधन केल्यानंतर त्यांनी सांगितले की, आमच्या हॉस्टेलमधील मित्र मैत्रिणींनाही हा विषय समजून सांगू आणि आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न करू.