भारताला ‘उर्दूस्तान’ करण्याची चाचपणी !

संपादकीय 

  • ‘कान्व्हेंट’ शाळेत हिंदु मुलींच्या धर्माचरणाला विरोध होतो, तेव्हा निधर्मीवाले कुठे असतात ?
  • मुसलमानांच्या मतांसाठी देशहितविरोधी भूमिका घेणार्‍या काँग्रेसचे खरे स्वरूप जाणा !
‘सिख फॉर जस्टीस’ या संघटनेचा नेता गुरपतवंत सिंह पन्नू

कर्नाटक राज्यात हिजाबवरून निर्माण झालेल्या वादाच्या माध्यमातून भारतविरोधी शक्तींनी देशात अराजकता निर्माण करण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. ‘पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने खलिस्तानवाद्यांना हाताशी धरून हिजाबवरून भारतातील धर्मांधांना चेतवण्याचे प्रयत्न चालू केले आहेत’, अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणेने दिली आहे. ‘सिख फॉर जस्टीस’ या खलिस्तानवादी संघटनेचा नेता गुरपतवंत सिंह पन्नू याने याविषयीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला आहे. त्यामध्ये त्याने भारताला ‘उर्दूस्तान’ करण्याचे उघडपणे आवाहन केले आहे. या व्हिडिओसह गुरपतवंत याने कर्नाटकात हिजाब परिधान करून ‘अल्ला हू अकबर’ ची घोषणा देणार्‍या मुस्कान खान या विद्यार्थिनीची छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. देहली, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, बंगाल आदी राज्यांमध्ये ‘हिजाब जनमत एजन्सी’ निर्माण करण्यात आल्या असून भारतातील मुसलमानांच्या मतांची चाचपणी चालू करण्यात आली आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेने याविषयी दक्षतेची सूचना दिली आहे. पाकिस्तानच्या इशार्‍यावर चालणार्‍या खलिस्तानवाद्यांनी ‘उर्दूस्तान’ची उघडपणे घोषणा करणे, हा निश्चितच इस्लामिक कट्टरवाद्यांचाच अजेंडा असू शकतो आणि याची चाचपणी हिजाबच्या माध्यमातून चालू करण्यात आली आहे. भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न चालू असून देशातील धर्मांधांना त्यामध्ये सहभागी करून घेण्याचा भागही चालू आहे.

मुळात भारतात सार्वजनिक ठिकाणी हिजाबवर बंदी नाही. असे असतांना शैक्षणिक ठिकाणी हिजाब परिधानाचा अट्टहास करून त्याचा जाणीवपूर्वक प्रपोगंडा केला जात आहे. मुसलमान अल्पसंख्य असतांना जर भारताची अशी स्थिती असेल, तर भविष्यात हेच अल्पसंख्य बहुसंख्य झाल्यास ते न्यायालयाच्या निर्णयाची तरी वाट पहातील का ? हा धोका ओळखून जगातील फ्रान्स, बेल्जियम, नेदरलँड, इटली, जर्मनी, ऑस्ट्रिया, नॉर्वे, स्पेन, ब्रिटेन, आफ्रिका, रुस आदी अनेक देशांमध्ये बुरखा, तसेच सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी घातली आहे. बेल्जियम देशात बुरखा, हिजाब यांवर बंदी घातल्याच्या विरोधात मानवाधिकारचे उल्लंघन होत असल्याची ओरड धर्मांधांनी केली. हा प्रश्न जेव्हा युरोपीय मानवाधिकार न्यायालयात गेला, त्या वेळी बुरखा किंवा हिजाब यांवर बंदी घातल्यामुळे कोणत्याही प्रकारे मानवाधिकाराचे उल्लंघन होत नसल्याचे मानवाधिकार आयोगाने स्पष्ट करत सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले. या देशांचे सुदैव की तेथे भारतासारखी पुरोगामी मंडळी किंवा देशहितामध्ये तडजोड करणारे राजकीय पक्ष नाहीत.

धर्मांतरातून राष्ट्रांतर होण्याचे उदाहरण

भारत हिंदूबहुल असल्यामुळेच प्रजासत्ताक आहे, हे पुरोगामी मंडळींनी लक्षात घ्यावे. भारत जेव्हा इस्लामधार्जिणा होईल, तेव्हा त्याचे ‘उर्दूस्तान’ होईल, हे गुरपतवंत सिंह याला चांगले ठाऊक आहे. त्यामुळेच त्याने हिजाबविषयी जनमताची चाचपणी करतांना भारताला ‘उर्दूस्तान’ करण्याची घोषणा केली आहे. अल्पसंख्यांक उद्या बहुसंख्य झाल्यास ते भारताची राज्यघटना मानतील का ? तिरंग्याला राष्ट्रध्वज म्हणून वंदन करतील का ? भारताची धर्मनिरपेक्षता टिकून राहील का ? भारत इस्लामबहुल झाल्यास तो कुराणनुसार चालेल, त्या वेळी त्याचे उर्दूस्तान होईल, हे गुरपतवंत याला ठाऊक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘धर्मांतर हे राष्ट्रांतर’ असल्याचा जो सिद्धांत सांगितला होता, त्याचे हे उदाहरण आहे.

मतांसाठी कट्टरतावादाला प्रोत्साहन देणारे काँग्रेसी !

तुर्कस्तानच्या खलिफाचे पद रहित करण्यात येऊ नये, यासाठी गांधीजींनी हिंदूंना खिलाफत चळवळीच्या दावणीला बांधले. शहाबानो पोटगी प्रकरणात सर्वाेच्च न्यायालयाने पोटगी देण्याच्या बाजूने दिलेला निर्णय तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी कायदा करून तो निर्णयच पालटला. अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनासाठी देशहिताला फाटा देण्याची काँग्रेसची ही जुनी परंपरा आहे. आताही महाविद्यालयात हिजाबचा अट्टहासाच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन काँग्रेसने देशहिताला फाटा दिला आहे. ‘एम्आय्एम्’ पक्षाचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘भविष्यात हिजाबी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान होतील’, अशा वक्तव्याचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. यातून केवळ महाविद्यालयातच नव्हे, तर भविष्यात शासकीय नोकरीमध्येही हिजाब परिधान केला जाईल, हे त्यांनी सूचित केले आहे, म्हणजेच एक प्रकारे भारताला इस्लामिक राष्ट्र करण्याची गर्भित चेतावणीच त्यांनी अप्रत्यक्षपणे दिली आहे. मातृभूमीला वंदन करण्यासही नकार देणारे असे इस्लामिक कट्टरतावादी भविष्यात भारतात शरीयत लागू करण्याची मागणी करतील.

हिजाबसाठी आंदोलन करणारे काँग्रेसी हे या इस्लामी कट्टरतावादालाच प्रोत्साहन देत आहेत. या आंदोलनात काँग्रेससह पुरोगामी, डावे पक्ष हेही सहभागी झाले आहेत; मात्र भारतातील अनेक कॉन्व्हेंट स्कूलमध्ये हिंदु मुलींना कुंकू लावण्यावर बंदी घालण्यात येते, या विरोधात यांतील कुणीही आवाज उठवलेला नाही. हिजाबसाठी ‘फतवा’ काढला जातो; मात्र कपाळाला कुंकू लावण्यास मनाई केल्यानंतरही हिंदु पालक स्वत:च्या पाल्यांना ‘कॉन्व्हेंट’ मध्ये पाठवतात. हिंदूंनी स्वधर्माविषयी अशीच अनास्था दाखवल्यास ओवैसी यांच्या म्हणण्याप्रमाणे हिजाबी पंतप्रधान झाल्यास हिंदूंच्या मुलींनाही हिजाब घालावा लागेल, हे मात्र निश्चित ! त्यामुळे स्वत:च्या अस्तित्वासाठी तरी ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेसाठी योगदान देणे हिंदूंसाठी अपरिहार्य आहे.