परात्पर गुरु डॉक्टरांच्या महामृत्यूयोगाविषयी श्री. निमिष म्हात्रे यांना स्वप्नातून पूर्वसूचना मिळणे
१. स्वप्नात परात्पर गुरु डॉक्टरांवर उपचार चालू असतांना त्यांना अस्वस्थ वाटल्यावर काही साधक त्यांना त्यांच्या खोलीत नेतांना आणि साधकांनी त्यांच्यावर केलेल्या उपचारांचा प्रभाव अल्प होत असतांना दिसणे
‘२८.१०.२०२० या दिवशी रात्री झोपलेलो असतांना मला पुढील स्वप्न पडले. ‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात अनेक साधकांना वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत होते. काही जण रुग्णाईत होते, तर काही जणांचा अकस्मात् तोल जात होता. परात्पर गुरु डॉक्टरांनाही बरे नसून आश्रमातील एका कक्षामध्ये त्यांच्यावर उपचार चालू होते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांना अस्वस्थ वाटू लागले; म्हणून त्यांना त्यांच्या खोलीत घेऊन जायचे होते. परात्पर गुरु डॉक्टरांना खोलीत नेतांना वाटेत अडथळा येऊ नये; म्हणून एक साधिका सर्वांना एका बाजूला थांबायला सांगत होत्या. परात्पर गुरु डॉक्टरांना त्यांच्या खोलीत नेतांना साधकांना त्यांचा भार पेलवेनासा झाल्यामुळे काही क्षण परात्पर गुरु डॉक्टरांना खाली ठेवावे लागले. ‘ही चूक आहे. त्यांच्यासाठी पुरेशा साधकांचा अंदाज घेऊन सोय ठेवायला हवी होती’, असे ती साधिका स्वतःशीच बोलली. त्यानंतर परात्पर गुरु डॉक्टरांना परत उचलून त्यांच्या खोलीत पलंगावर नेले. परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत असणारे साधक वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर उपचार करत होते; पण त्यांचे आजारपण या उपचारांपेक्षा अधिक प्रमाणात होते. त्यामुळे उपचारांचा ०.२ ते ०.५ टक्के इतकाच प्रभाव पडत होता.
२. परात्पर गुरु डॉक्टर ध्यानावस्थेत असून त्यांचे नेत्र शून्याकडे असल्याचे भासणे
हे सर्व घडतांना परात्पर गुरु डॉक्टर काही प्रतिसाद देत नव्हते. ‘काय घडत आहे ?’, ते सर्व त्यांना कळत होते; पण त्यांना प्रतिसाद देता येत नव्हता. त्यांची अशी स्थिती थोड्या वेळासाठी होती. त्यानंतर ते ध्यानावस्थेत असून त्यांचे नेत्र शून्याकडे असल्याचे भासत होते. त्यांचे प्राण त्यांच्या देहात असूनही त्यांचे अस्तित्व देहात नसल्याचे मला जाणवले. त्या स्थितीत ते कुणालाही प्रतिसाद देत नव्हते. ते अत्यवस्थ स्थितीत नसून असंवादी स्थितीत (कुणाशीही संभाषण करू शकत नाही, अशी स्थिती) असल्याचे माझ्या लक्षात आले. आश्रमातील वैद्यही काही कालावधीच्या अंतरावर येऊन त्यांच्या स्थितीचा अंदाज घेत होते. त्याच वेळी आश्रमातील एका मार्गिकेच्या शेजारील जिन्यावरून एक साधक चालता चालता घरंगळत खालच्या मजल्यावर पडला. त्यांना धरायला आणि उठवायला ४ ते ५ साधक धावत गेले. आश्रमात असे ३ ते ४ ठिकाणी झाल्याचे इतर साधकांकडून कळले. हे स्वप्न पहातांना मनात कोणताच ताण किंवा निराशा नव्हती. ‘सर्व ईश्वरेच्छेने घडत आहे’, याची जाणीव होती.’
(‘अशी जाणीव होणे, हे प्रगतीचे लक्षण आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले)
३. सकाळी सेवेला नेहमीच्या वेळेत उठण्यास त्रास होणे
सकाळी जाग आल्यावर मला उठता येत नव्हते. मी नेहमी सेवेसाठी सकाळी ५.३० वाजता उठतो; परंतु त्या दिवशी कोणतेही कारण नसतांना मला सकाळी ११.३० वाजेपर्यंत उठता आले नाही. ‘हा कदाचित् त्या स्वप्नाचा परिणाम असावा’, असे मला वाटले.
४. परात्पर गुरु डॉक्टरांची सर्वज्ञता
दुसर्या दिवशी परात्पर गुरु डॉक्टरांच्या सेवेत असणार्या एका साधकाला त्यांनी माझ्याविषयी विचारले असता साधकाने इतकेच सांगितले, ‘‘निमिषला एक स्वप्न पडले. त्यामुळे त्याला सकाळी उठता आले नाही.’’ तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘त्याला माझ्या महामृत्यूयोगाची पूर्वसूचना मिळाली का ? ’’
– श्री. निमिष म्हात्रे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१९.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |