संभाजीनगर येथे केंद्रीय अर्थमंत्री डॉ. कराड यांच्या घरासमोर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणार्‍या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले !

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काढलेला मोर्चा 

संभाजीनगर – देशातील वाढत्या कोरोनाला काँग्रेस उत्तरदायी आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. या विरोधात काँग्रेसच्या वतीने १२ फेब्रुवारी या दिवशी क्रांती चौकातून केंद्रीय अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या घरासमोर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र पोलिसांनी क्रांती चौकातून अवघ्या काही पावलांवरच मोर्चेकर्‍यांना अडवले. याला प्रतिउत्तर देण्यासाठी डॉ. कराड यांच्या घरासमोरच आंदोलनापूर्वी भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांहून दुपटीने उपस्थित होते. या वेळी पोलिसांनी ग्रामीण भागांतून येणार्‍या गाड्या अडवल्या आहेत, असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी केला आहे.

काँग्रेसने सकाळी ११ वाजता मोर्चा काढणार आहे, असे घोषित केले होते; मात्र प्रत्यक्षात सकाळी ११.३० वाजल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र येत होते; परंतु काँग्रेसचे कार्यकर्ते येणार असल्यामुळे सकाळी १०.३० वाजल्यापासून भाजपचे आमदार अतुल सावे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते डॉ. कराड यांच्या घरामोर उपस्थित होते. या वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.