भाजपच्या शहराध्यक्षांसह ४०० कार्यकर्त्यांवर पुणे येथे गुन्हा नोंद !
पुणे – पुणे महापालिकेत किरीट सोमय्या आले असतांना झालेल्या गोंधळाच्या प्रकरणी पुणे पोलिसांकडून भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, बापू मानकर यांच्यासह ३५० ते ४०० कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेत शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्यावर आक्रमण केले होते. त्याच ठिकाणी त्यानंतर भाजपकडून किरीट सोमय्या यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. त्यामुळे या सार्याची दखल घेत पुणे महापालिकेच्या आवारात बंदी आदेशाचे उल्लंघन करणे, घोषणाबाजी करणे आणि अवैध जमाव जमवून गोंधळ करणे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला आहे.