हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या अंतर्गत केलेल्या तक्रारीची नोंद

सानपाडा (नवी मुंबई) येथील दत्तमंदिर मार्गावरील अनधिकृत वाहनतळावर करावाई करण्याचे उपायुक्तांचा आदेश  

नवी मुंबई, १३ फेब्रुवारी (वार्ता.) – सानपाडा येथील दत्तमंदिर मार्गावर अनधिकृतपणे वाहने उभी करणार्‍यांवर कारवाई करण्याचा आदेश नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त जयदीप पवार यांनी वाहतूक पोलिसांना दिला. सुराज्य अभियानाच्या अंतर्गत अभियानाचे समन्वयक वैद्य उदय धुरी यांनी याविषयी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची नोंद घेऊन पवार यांनी त्वरित कारवाई करण्याचा आदेश दिला.


वैद्य धुरी यांनी या तक्ररीत म्हटले आहे की, सानपाडा सेक्टर ३० येथील दत्तमंदिर मार्गावर (शीव-पनवेल महामार्गाजवळील सर्व्हिस मार्गावर) गेल्या अनेक मासांपासून अनधिकृतपणे वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक आणि या परिसरात रहाणारे रहिवासी यांना वाहतूककोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरील ‘ऍक्सीस’ अधिकोषात येणारे कर्मचारी आणि ग्राहक यांच्याकडून मार्गाच्या दोन्ही बाजूंना गाड्या उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे हा मार्ग दुपदरी असतांनाही वाहने उभी केल्याने रस्त्यावरून गाड्यांना ये-जा करण्यास केवळ एकपदरी मार्ग उरला आहे. त्यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होत आहे.

प्रतिकात्मक चित्र

या प्रकरणी वैद्य धुरी यांनी नवी मुंबई महानगरपालिकचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे केलेली तक्रार बांगर यांनी संबंधित अधिकार्‍यांकडे पाठवली. त्यानंतर मालमत्ता आणि वाहनतळ विभागाचे उपायुक्त जयदीप पवार यांनी कनिष्ठ अधिकार्‍यांना पहाणी करून कारवाई करण्याचा आदेश दिला. या पहाणीमध्ये येथे वाहने अनधिकृतपणे उभी केली जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यावर पवार यांनी तुर्भे वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना येथे अनधिकृतपणे गाड्या उभ्या करणार्‍यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला.