५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला उरण, पनवेल येथील चि. तेज वितुल ठाकूर (वय ५ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील  चि. तेज वितुल ठाकूर हा एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या ! 

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

चि. तेज ठाकूर

 १. गर्भारपण

सौ. विद्या ठाकूर

अ. तिसर्‍या मासात मला १५ दिवस ताप आला होता. तेव्हा मला जेवण जात नव्हते. काही खाल्ले, तर उलटी व्हायची. थोडेसे खाऊनही बाळाची वाढ व्यवस्थित झाली.

आ. मी सातव्या मासापर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा आणि प्रासंगिक सेवा करत होते. ९ मास पूर्ण होईपर्यंत सर्व कामे करूनही मला थकवा जाणवत नव्हता.

इ. सातव्या मासात माझी ‘सोनोग्राफी’ करतांना आधुनिक वैद्यांना प्रथम बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत नव्हते. ते पुष्कळ वेळ प्रयत्न करत होते आणि थोडे काळजीतही होते. त्या वेळी माझा नामजप चालू होता आणि मी प्रार्थना करत होते. तेव्हा ‘माझ्यासमवेत बाळही नामजप करत आहे’, असे मला जाणवत होते. थोड्या वेळानंतर वैद्यांना बाळाच्या हृदयाचे ठोके जाणवले. नंतर मी यजमानांना वरील प्रसंग सांगितला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘त्या वेळेत माझाही नामजप चालू होता.’’

ई. नवव्या मासात मी संध्याकाळी नामजप करत बसले असतांना माझ्या मनात विचार आला, ‘वैद्यांनी मला प्रसुतीचा दिनांक दिला आहे, त्याला अजून २२ दिवस आहेत; पण हे बाळ लवकर जन्माला येईल.’ मला त्याच दिवशी अस्वस्थ वाटायला लागले. बाळ पोटात वेगाने हालचाल करत होते. तेव्हा मी पटकन म्हणाले, ‘आता तू लवकर जन्म घे. मला त्रास होत आहे.’ त्याच रात्री ३ वाजता मला रुग्णालयात नेले आणि बाळाचा जन्म २२ दिवस आधीच झाला.

२. जन्मानंतर

अ. बाळाच्या जन्मानंतर मला पुष्कळ उत्साह जाणवत होता. मला भेटायला येणारे म्हणायचे, ‘‘तुझी प्रसुती होऊनही तू किती उत्साही आणि आनंदी दिसते आहेस !’’

आ. मला मुलगी हवी होती; म्हणून बाळाच्या (तेजच्या) जन्मानंतर मी नाराज होते; पण बाळाकडे पाहिल्यावर ‘तो देवाचा प्रसाद आहे.’ तेव्हा ‘आपण मुलगीच हवी’, असा विचार करणे अयोग्य आहे’, याची जाणीव झाली.

 ३. जन्म ते २ वर्षे

अ. जन्मानंतर पूर्ण एक मास तेज सकाळपासून संध्याकाळपर्यंत शांत रहात असे; पण संध्याकाळी ७ ते रात्री १० या वेळेत पुष्कळ रडत असे. त्यासाठी आम्ही उपाय केले आणि इतरही प्रयत्न करून बघितले. एक मासानंतर गुरुदेवांच्या कृपेने तो शांत राहू लागला.

आ. आमच्या घरात आणि बाहेर सनातन-निर्मित आकाशकंदील होता. त्याकडे तो नेहमी पहात असे आणि ‘ॐ’ म्हणण्याचा प्रयत्न करत असे.

इ. तेज ८ मासांचा असतांना आम्ही सर्व जण रामनाथी आश्रमात गेलो होतो. तेव्हा पूर्ण प्रवासात आणि आश्रमात गेल्यावरही त्याने कसलाच त्रास दिला नाही.

ई. तेज लहानपणापासून धीट आणि चपळ आहे.

उ. त्याला काही शिकवले, तर तो लगेच आत्मसात करतो. त्याची स्मरणशक्ती फार चांगली आहे.

४. २ ते ३ वर्षे

४ अ. धर्माचरण करणे : तो एक वर्षाचा असल्यापासून कुंकू लावून घेतो. त्याला प्रार्थना आणि जयघोष करायला फार आवडते. तो न चुकता जेवणापूर्वी श्लोक म्हणतो.

४ आ. शांत आणि प्रेमळ : तेज ३ वर्षांचा झाल्यावर बालवाडीत जाऊ लागला. तो शांतपणे शाळेत जायचा. बाई जे शिकवतात, ते प्रतिदिन घरी म्हणून दाखवायचा. तो शाळेत आणि समाजात सर्वांशी प्रेमाने वागतो.

४ ई. जिज्ञासू वृत्ती : तेजला शिकवतांना किंवा इतर वेळेस तो अनेक प्रश्न विचारतो. त्याला योग्य उत्तर मिळेपर्यंत तो शांत रहात नाही.

४ उ. आई सेवेला गेल्यावर भावासमवेत खेळणे : तेजला दाटी आणि गोंधळ आवडत नाही. त्याला घरी राहून त्याच्या भावासमवेत खेळणे फार आवडते. मी सेवेला जातांना त्याला त्याच्या भावासमवेत ठेवून जाते. तेव्हा तो न रडता खेळतो. मी सेवेला जातांना तो म्हणतो, ‘‘आई, तू सेवेला जा. मी घरी राहीन.’’

४ ऊ. मी किंवा तेजचे बाबा त्याला कितीही ओरडले किंवा त्यांनी मारले, तरी तो मनात राग धरत नाही. लगेच जवळ येतो.

४ ए. ‘संत’ होण्याचे ध्येय ठेवणारा बाल वितुल ! : तेज सनातन-निर्मित देवतांच्या चित्रांमधील गणपति, श्रीराम, श्रीकृष्ण, शिव आणि हनुमान या देवतांप्रमाणे  पुष्कळ वेळ एकटा बसून रहातो. एक दिवस मी त्याला विचारले, ‘‘तुला कोण व्हायचे आहे ?’’ तेव्हा तो पटकन म्हणाला, ‘‘मला कृष्णबाप्पासारखे व्हायचे आहे.’’ त्याने एकदा मला विचारले, ‘‘आई मला संत व्हायचे आहे. मी काय करू ?’’ या प्रश्नाने मी अचंबित झाले.

५. तेजकडे पाहून मला पुष्कळ आनंद वाटतो. श्रीकृष्णाची सतत आठवण होते. त्याच्या वागण्यात मला कृष्णाच्या लीला जाणवतात.

६. स्वभावदोष 

हट्टीपणा आणि आळशीपणा

गुरुदेवांच्या कृपेनेच आम्हाला हे कृष्णरूपी बाळ मिळाले, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. विद्या वितुल ठाकूर (चि. तेजची आई), उरण, पनवेल. (२१.११.२०१९)

बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. 
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक