सेवेचा ध्यास असलेल्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती कृतज्ञताभाव असलेल्या चिंचवड, पुणे येथील कै. (सौ.) स्मिता विष्णु साळुंखे (वय ५५ वर्षे) !

कै. (सौ.) स्मिता विष्णु साळुंखे

‘३.१०.२०२१ या दिवशी चिंचवड, पुणे येथील सौ. स्मिता विष्णु साळुंखे यांचे निधन झाले. त्यांना कर्करोग झाला होता. त्या रुग्णाईत असतांना त्यांचे यजमान आणि साधक यांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्या निधनानंतर त्यांच्या यजमानांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

श्री. विष्णु साळुंखे

१. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि साधक यांच्या मार्गदर्शनामुळे सौ. स्मिता साळुंखे यांचा नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे झालेला प्रवास : ‘साधनेत येण्यापूर्वी सौ. स्मिता हिचा स्वभाव ‘भौतिक सुखांचा उपभोग घेणे’, अशा स्वरूपाचा होता. वर्ष १९९८ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांची चिंचवड येथे जाहीर सभा झाली. त्यानंतर आम्हाला श्री. सुधाकर पाध्ये, डॉ. नरेंद्र दाते (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) आणि आधुनिक वैद्य मंगलकुमार कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे नास्तिक असलेली स्मिता आस्तिक बनली. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करता करता परात्पर गुरु डॉ. आठवले तिच्या जीवनाचे केंद्रबिंदू झाले. त्यानंतर तिच्यातील ‘सहनशीलता, प्रेमभाव आणि त्याग’ हे गुण विकसित झाले.

२. सेवेची ओढ लागल्याने संसारापेक्षा साधनेत मन रमणे : ती साधनेत येण्यापूर्वी अतिशय भित्री होती. त्यामुळे ती कधी कुठे बाहेर जात नसे. साधनेत आल्यावर ती दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांचे वितरण करू लागली. तिच्यात हा पालट केवळ परात्पर गुरु डॉक्टरांमुळे झाला होता. नातेवाइकांनाही ‘तिच्यात एवढा पालट कसा झाला ?’, असे वाटत होते. त्यानंतर तिचे मन संसारापेक्षा साधनेतच अधिक रमू लागले.

३. रुग्णाईत स्थिती

३ अ. वर्ष २०१७ नंतर तिला कर्करोग (कॅन्सर) झाल्याचे निदान झाले. त्यानंतर तिला सेवा करणे जमत नव्हते. त्यामुळे ती नामजपादी उपाय करू लागली. ‘सेवेसाठी बाहेर पडता येत नाही’, याची तिला खंत वाटत असे.

३ आ. साधकांप्रतीच्या भावामुळे वेदनांचा विसर पडणे

१. स्मिता रुग्णाईत असतांना एक दिवस श्री. अशोक संकपाळ (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि सौ. वंदना संकपाळ तिला भेटायला आले होते. त्या वेळी ती म्हणाली, ‘‘आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सगळ्यात चांगला दिवस आहे. मला ६ मासांपासून जो त्रास जाणवत आहे, तो आता जराही जाणवत नाही.’’

२. तिला साधकांचा भ्रमणभाष आल्यावर तिला ‘परात्पर गुरु डॉक्टर भेटले’, असे वाटत असे. तिच्यातील या भावामुळे तिला तिच्या वेदनांचा विसर पडत असल्याचे माझ्या लक्षात आले.

३ इ. रुग्णालयात अतीदक्षता विभागात असूनही ‘जिज्ञासूंना दैनिक ‘सनातन प्रभात’ वेळेत मिळायला हवेत’, याची तळमळ असणे : २९.९.२०२१ या दिवशी स्मिताला रुग्णालयात भरती केले. ३०.९.२०२१ या दिवशी तिला त्रास होत असल्याने तिला अतीदक्षता विभागात ठेवले. अशा स्थितीतही तिने मला विचारले, ‘‘दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची व्यवस्था केली आहे ना ?’’ ती मला म्हणाली, ‘‘जिज्ञासूंना दैनिक ‘सनातन प्रभात’ वेळेत मिळायला हवेत. परात्पर गुरु डॉक्टरांनी दिलेली ही सेवा आहे. त्यात खंड पडू देऊ नका.’’ मी तिला सांगितले, ‘‘आठ दिवस ही सेवा अन्य साधक पहाणार आहेत.’’ तेव्हा तिला बरे वाटले.

३ ई. भाव

१. ‘साधकांनी संतांकडून माझ्यासाठी नामजप विचारून घेतला. देव माझ्यासाठी किती करत आहे !’, यासाठी तिला कृतज्ञता वाटायची.

२. ‘परात्पर गुरु डॉक्टर माझ्यासाठी एवढे करतात आणि मी काहीच करू शकत नाही’, असे वाटून तिला अपराधी वाटत असे. ‘मी बरी व्हावी’, यासाठी परात्पर गुरु डॉक्टर पुष्कळ कष्ट घेत आहेत’, असे वाटून ती त्यांची क्षमाही मागत होती.

३. शेवटच्या काळात तिला पुष्कळ वेदना होत होत्या. त्या स्थितीतही तिचा ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’ असा नामजप चालू होता.

४. अखेरचे क्षण : २.१०.२०२१ या दिवशी ती अतीदक्षता विभागात असतांना तिने माझे बोट घट्ट धरून ठेवले होते. त्या वेळी मी तिला म्हणालो, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर तुला बोलावत आहेत. तू मायेत अडकू नकोस. परात्पर गुरु डॉक्टर तुझ्याजवळ असतांना तू कशाला घाबरतेस ?’’ ती अतीदक्षता विभागात असल्याने मला तिथे अधिक वेळ थांबू देत नव्हते. त्यामुळे मी बाहेर आलो. त्यानंतर तिला ‘व्हेंटिलेटर’वर (रुग्णाला कृत्रिम श्वासोच्छवास करण्यास साहाय्य करणारे साधन) ठेवले. तेव्हा तिला बोलता येत नव्हते. त्यानंतर बारा घंट्यांनी तिने देह सोडला. त्यानंतर आम्ही तिचा मृतदेह घेऊन गावी गेलो.

५. सौ. स्मिता यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे

अ. तिच्याकडे आठ घंट्यांनी पाहिल्यावरही तिच्या तोंडवळ्यावर पुष्कळ तेज जाणवत होते.

आ. तिचे दफन केल्यावर मला थंडावा जाणवला. ‘ती आनंदी आणि समाधानी आहे’, असे मला जाणवले.

इ. त्या वेळी वातावरणात कोणताही दाब जाणवत नव्हता. वातावरण पुष्कळ आल्हाददायक होते. ‘काही अनिष्ट झाले आहे’, असे वाटत नव्हते.’

– श्री. विष्णु साळुंखे ( कै. (सौ.) स्मिता साळुंखे यांचे यजमान), चिंचवड, पुणे. (१४.१२.२०२१)


 चिंचवड, पुणे येथील साधकांना कै. (सौ.) स्मिता साळुंखे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

सौ. शालिनी चिंचोलकर

१. प्रेमभाव : ‘सौ. स्मिता विष्णु साळुंखे आणि मी अनेक वर्षांपासून सत्संगामुळे संपर्कात होतो. त्यांचा स्वभाव मनमिळाऊ आणि प्रेमळ होता. मी त्यांच्या तोंडवळ्यावर कधीच राग किंवा द्वेष पाहिला नाही. त्यांच्या मनात कुटुंबीय आणि साधक यांच्याप्रती प्रेमभाव होता. त्या कधीही कोणाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करत नसत.

२. त्या ग्रंथप्रदर्शनच्या ठिकाणी मनापासून सेवा करायच्या.

३. त्यांच्या मनात गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञताभाव होता.’


सौ. वंदना संकपाळ

१. रुग्णाईत असूनही तोंडवळा तेजस्वी दिसणे : साळुंखेकाकू पुष्कळ रुग्णाईत असल्याचे समजल्यावर आम्ही (मी आणि माझे यजमान श्री. अशोक) त्यांना भेटायला गेलो होतो. त्या वेळी त्या पुष्कळ कृश झाल्या होत्या. त्यांना पुष्कळ अशक्तपणा असल्याने त्या चालू शकत नव्हत्या. असे असूनही त्यांचा तोंडवळा तेजस्वी दिसत होता.

२. रुग्णालयात असतांना ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’, असा नामजप करणे : काकूंचे निधन झाल्याचे समजल्यानंतर आम्ही साळुंखेकाकांना रुग्णालयात भेटायला गेलो. त्या वेळी काकांनी सांगितले, ‘‘काकूंना या रुग्णालयात भरती करण्यापूर्वी अन्य एका रुग्णालयात भरती केले होते. त्या वेळी काकूंना असह्य वेदना होत होत्या. त्या वेळी काकू ‘प.पू. डॉक्टर, प.पू. डॉक्टर’, असे म्हणत होत्या; परंतु ते आधुनिक वैद्यांना समजले नाही.’’ ‘काकू वेदनांमुळे काहीतरी बोलत आहेत’, हे पाहून तेथील आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘यांची मनःस्थिती ठीक नाही. त्यांना तुम्ही अन्य मोठ्या रुग्णालयात घेऊन जा.’’ ‘काकूंची गुरुदेवांवर किती श्रद्धा आहे’, हे पाहून माझीही गुरुदेवांवरील श्रद्धाही वाढली. ‘गुरुदेव सांगतात त्याप्रमाणे ‘गुरुदेवांचा प्रत्येक साधक किती अनमोल आहे !’, याची मला जाणीव होऊन माझा कृतज्ञताभाव जागृत झाला.’


सौ. सुरेखा वाघ (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)

१. वेळेचे पालन करणे : ‘काकूंची प्रकृती चांगली असतांना त्या माझ्या समवेत सेवेला येत असत. त्या ठरवलेल्या वेळेच्या आधी १० मिनिटे सेवेच्या ठिकाणी यायच्या.

२. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्याप्रती श्रद्धा : त्यांचा आजार वाढल्यानंतरही त्या नामजपादी उपाय श्रद्धेने करत होत्या. त्यांना भेटायला गेल्यावर त्या म्हणायच्या ‘‘प.पू. डॉक्टर माझा नामजप करवून घेत आहेत.’’

३. काकूंच्या आजारपणात आणि मृत्यूसमयी त्यांचा तोंडवळा पुष्कळ उजळला होता. त्या कृश झाल्या असल्या, तरी त्या आनंदी दिसत होत्या.’

(लेखातील सर्व सूत्रांचा १४.१२.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक