‘एबीजी शिपयार्ड’ या आस्थापनाकडून २८ बँकांची २२ सहस्र ८४२ कोटी रुपयांची फसवणूक
देशातील सर्वांत मोठा बँक घोटाळा उघड
बंकांचे कर्ज बुडवले : गुन्हा नोंद
|
नवी देहली – देशातील बँक क्षेत्रामध्ये सर्वांत मोठा घोटाळ झाल्याचे सीबीआयने उघड केले आहे. ‘एबीजी शिपयार्ड’ या आस्थापनाने देशातील २८ बँकांची तब्बल २२ सहस्र ८४२ कोटी रुपयांची फसवणूक केली. एप्रिल २०१२ ते जुलै २०१७ या कालावधीत हा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी आस्थापनाच्या तत्कालीन ऋषी अग्रवाल, संथनम् मुथुस्वामी आणि अश्विनी अग्रवाल या तिघा संचालकांंसह आस्थापनाविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. ‘एबीजी शिपयार्ड’ हे ‘एबीजी’ समूहातील प्रमुख आस्थापन आहे. नौकांची बांधणी आणि दुरुस्ती, यांत हे आघाडीचे आस्थापन मानले जाते.
ABG Shipyard Limited has been booked by CBI for defrauding 28 banks to the tune of Rs 22,842 crore. (By @MunishPandeyy)https://t.co/15AUmFrt4S
— IndiaToday (@IndiaToday) February 12, 2022
१. स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या तक्रारीनंतर चौकशी केली असता हा घोटाळा उघडकीस आला. या आस्थापनाने स्टेट बँकेकडून २ सहस्र ९२५ कोटी रुपयांचे, आयसीआयसीआय बँकेकडून ७ सहस्र ८९ कोटी, आयडीबीआय बँकेकडून ३ सहस्र ६३४ कोटी, बँक ऑफ बडोदाकडून १ सहस्र ६१४ कोटी, पीएन्बीकडून १ सहस्र २४४ कोटी आणि आयओबीकडून १ सहस्र २२८ कोटी रुपयांचे कर्ज घेतले असून ते बुडवण्यात आले आहे.
२. ८ नोव्हेंबर २०१९ या दिवशी सर्वप्रथम तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर १२ मार्च २०२० ला सीबीआयने काही गोष्टींविषयी स्पष्टीकरण मागितले होते. त्याचवर्षी ऑगस्ट मासामध्ये नव्याने गुन्हा नोंदवून चौकशी करण्यात आली होती. जवळपास दीड वर्षे विविध पुराव्यांची पडताळणी केल्यांतर सीबीआयने आता संचालकांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. बँकांकडून ज्या कारणासाठी कर्ज घेण्यात आले, त्यासाठी त्याचा वापरच केला गेला नसल्याचे आणि ही रक्कम अन्यत्र वळवण्यात आल्याचे अन्वेषणात स्पष्ट झाले आहे.