मथुरेतील श्री बांके बिहारी मंदिरामधील गर्दीमध्ये गुदमरून वृद्ध भाविकाचा मृत्यू
मंदिरात गर्दी होणार नाही, याची दक्षता मंदिर व्यवस्थापनाने घेणे आवश्यक आहे ! – संपादक
मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्री बांके बिहारी मंदिरात १२ फेब्रुवारी या एकादशीच्या दिवशी लक्ष्मण नावाच्या ६५ वर्षीय व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला. तथापि मंदिर व्यवस्थापनाने मात्र ‘सध्या आमच्याकडे कोणत्याही भाविकाचा मृत्यू झाल्याची माहिती नाही’, असे सांगितले. श्री बांके बिहारी मंदिरात भाविकांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत, ज्यामध्ये गर्दीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मंदिरात प्रचंड गर्दी असल्याने आणि योग्य व्यवस्था नसल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. एकादशीच्या दिवशी मथुरेतूनच नव्हे, तर दूरवरूनही मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
A 65-year-old man died of suffocation in Banke Bihari Mandir in #UttarPradesh’s #Mathura yesterday.https://t.co/kjU6pApdF2
— IndiaToday (@IndiaToday) February 13, 2022
मृतांच्या नातेवाइकांनी सांगितले की, जेव्हा ते प्रार्थना करण्यासाठी मंदिरात पोचले, तेव्हा तेथे मोठी गर्दी होती. त्यामुळे लक्ष्मण यांचा श्वास गुदमरला. त्यांना तात्काळ तेथून बाहेर काढण्यात आले; परंतु मंदिराबाहेर पोचत असतांनाच ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.