ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचे निधन !

ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज

पुणे – बजाज उद्योग समुहाचे माजी अध्यक्ष प्रसिद्ध उद्योजक राहुल बजाज (वय ८३ वर्षे) यांचे १२ फेब्रुवारी या दिवशी दुपारी २.३० वाजता वयोमान आणि हृदयाचा विकार यांमुळे निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांच्यावर शासकीय सन्मानानुसार त्यांच्या पार्थिवार अंत्यसंस्कार करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

कोलकता येथील एका उद्योजक कुटुंबामध्ये १० जून १९३८ या दिवशी राहुल बजाज यांचा जन्म झाला. त्यांनी अर्थशास्त्राची आणि कायद्याची पदवी संपादन केली होती. ‘हॉवर्ड’ विद्यापिठातून त्यांनी ‘एम्.बी.ए.’ चे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या कार्यकाळात बजाज आस्थापनाच्या ऑटोने नेत्रदीपक प्रगती केली. ४० वर्षे त्यांनी बजाज आस्थापनाची यशस्वीपणे धुरा सांभाळली. काही कालावधी ते काँग्रेसचे राज्यसभा सदस्य होते.

तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच नव्हे, तर सामाजिक भान असलेला आणि देशापुढील समस्यांवर निर्भिडपणे स्वत:ची मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला. त्यांनी केवळ स्वत:च्या ‘उद्योगाचा विकास’, असा संकुचित विचार न करता देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणार्‍या अडचणी यांवर स्पष्ट अन् निग्रही भूमिका घेतली. एक खरा देशभक्त उद्योजक म्हणून देशापुढील काही समस्यांवरही त्यांनी भाष्य करून जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. उद्योजकांनी सामाजिक दायित्व कसे पार पाडावे ? यांचे पाठ त्यांनी सामाजिक कार्यातून घालून दिला.