माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘श्री साई शिक्षण संस्थे’चे काम पहाणारे सनदी लेखापाल विशाल खतवानी यांच्या घरावर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेची धाड !

केंद्रीय अन्वेषण यंत्रणा

नागपूर – शहरातील कोराडी परिसरातील लेवरेज ग्रीन सोसायटीमध्ये ‘रो हाऊस २९’ येथे रहाणारे सनदी लेखापाल (सीए) विशाल खतवानी यांच्या निवासावर केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या पथकाने १२ फेब्रुवारी या दिवशी धाड घातली. खतवानी हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ‘श्री साई शिक्षण संस्थेचे कामकाज आणि हिशोब पहातात. या वेळी पथकातील अधिकार्‍यांनी ५ घंटे खतवानी यांची चौकशी केली. त्यांच्याकडून काही कागदपत्रे घेऊन हे पथक रवाना झाले.

‘श्री साई शिक्षण संस्थे’च्या माध्यमातून आर्थिक अपव्यवहार झाल्याची शंका आहे. त्यामुळे यासाठीच ही चौकशी करण्यासाठी हे पथक येथे आले होते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही त्यांचे नाव चर्चेत होते, अशी माहिती समोर येत आहे.

अनिल देशमुख यांच्या ‘मनी लाँडरिंग’ प्रकरणात येथे यापूर्वीही काही अन्वेषण यंत्रणांनी धाडी टाकल्या आहेत. अनिल देशमुख यांच्यावर मनी लाँडरिंग प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानंतर सीबीआय आणि ‘ईडी’नेही या प्रकरणात चौकशी करत अनिल देशमुख यांच्या निवासावर धाड टाकली होती. या वेळी घरातून कागदपत्रे जप्त करण्यात आली होती, तसेच येथील काही सनदी लेखापाल आणि व्यापारी यांच्या निवासांवरही धाडी टाकल्या होत्या.

अनिल देशमुख यांच्याशी संबंधित लोक वाझे यांना पैसे मागायचे ?

‘अनिल देशमुख यांच्या वैयक्तिक कर्मचार्‍यांनी किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही व्यक्तीने तुमच्याकडे कधीही पैशांची मागणी केली नाही’, असे म्हणणे योग्य ठरेल का ?’ असा प्रश्न चांदीवाल आयोगाने सचिन वाझे यांना विचारला होता. त्या वेळी वाझे यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले होते; परंतु आता त्यांना या जबाबामध्ये पालट करायचा आहे. ‘अनिल देशमुख यांच्याशी संबंधित लोक त्यांच्या वतीने माझ्याकडे पैसे मागायचे’, असे वाझे यांनी अर्जात म्हटले आहे.