पुणे येथील दगडूशेठ गणपतीला ‘सूर्यकिरणांचा महाभिषेक’ !
पुणे – येथील दगडूशेठ गणपति मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या चौथ्या दिवशी म्हणजेच ११ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ८ वाजून २५ मिनिटे ते ८ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ‘श्रीं’च्या मूर्तीवर पडलेला किरणोत्सव भाविकांना अनुभवता आला. प्रतिवर्षी माघ गणेशजन्माच्या उत्तरायणामध्ये ही सूर्यकिरणे ‘श्रीं’च्या मूर्तीवर पडतात. श्रींच्या उत्सवमूर्तीसमोर असलेल्या चांदीच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडली होती. त्यासह देवी सिद्धी आणि देवी बुद्धी यांच्या चांदीच्या मूर्तींनाही सूर्यकिरणांनी स्पर्श केला.
ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, ‘‘गेली २ ते ३ दिवस प्रतिदिन सकाळी सूर्यकिरणे ‘श्रीं’च्या मूर्तीवर पडत आहेत. मंदिराची रचना पूर्वाभिमुख असल्याने गाभार्यात सूर्यकिरणांचा प्रवेश होतो. हा किरणोत्सव सोहळा भाविकांना आणखी एक-दोन दिवस अनुभवता येईल.’’