सनातनच्या साधिकेला उत्तर भारतातील प्रसार दौर्याच्या वेळी आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव !
सनातनच्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका श्रीमती स्मिता नवलकर यांना उत्तर भारतातील प्रसार दौर्याच्या वेळी आलेले वैशिष्ट्यपूर्ण अनुभव !
‘जुलै २०१९ मध्ये मी विज्ञापने आणि प्रसार यांसाठी उत्तर भारतात दौर्याला गेले होते. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करून ‘माझ्या या दौर्यात गुरुदेवांच्या कृपेमुळे झालेली वैशिष्ट्यपूर्ण सेवा, संपर्क, तसेच शिकायला मिळालेली सूत्रे यांविषयी तुम्हीच माझ्याकडून लिहून घ्या’, अशी प्रार्थना करते !
१. उत्तरप्रदेश
वाराणसी, भदोही, सैदपूर, अयोध्या आणि लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील संपर्क चांगले होऊन तसा प्रतिसादही मिळाला.
१ अ. वाराणसी येथे मिळालेला प्रतिसाद
१. येथील संपर्कात साधनेविषयी सांगण्याची संधी मिळाली. बहुतेक ठिकाणी कुटुंबात ८ – १० व्यक्ती असायच्या. त्यांना साधनेविषयी सांगतांना आनंद मिळाला. त्या सर्वांना आपली हिंदु संस्कृती, धर्माचरण आणि मुलांसाठी आवश्यक असलेले संस्कार यांविषयी ऐकण्यात आनंद मिळत होता. बहुतेकांना आपल्या संस्कृतीविषयी फारसे ठाऊक नव्हते. त्यांना सनातन संस्थेने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांची माहिती सांगितली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
२. नामस्मरण, प्रार्थना, धर्माचरण आदींचे महत्त्व सांगितल्यावर जिज्ञासूंनी त्यानुसार कृती करणार असल्याचे सांगितले.
३. काही जण इंग्रजी आणि हिंदी पाक्षिक यांचे वर्गणीदार झाले, तर काहींनी वितरणासाठी पंचांगांची मागणीही केली.
४. वाराणसी येथील धर्मप्रेमी उद्योजकांकडूनही उत्तम प्रतिसाद लाभला. ग्रंथ आणि उत्पादने यांचे वितरण, तसेच हिंदी पाक्षिकासाठी विज्ञापने मिळाली. काही जण ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचे वर्गणीदार झाले, तसेच ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’साठी अर्पणही मिळाले.
१ आ. भदोही येथे मिळालेला प्रतिसाद : या शहरात अन्य पंथियांचे प्राबल्य असूनही तेथे अनेक धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, उद्योजक, आधुनिक वैद्य, तसेच शाळेचे संस्थापक अशा समाजातील अनेक स्तरांतून ग्रंथ, पंचांग, सनातनची नियतकालिके, उत्पादने यांसाठी उत्तम प्रतिसाद लाभला. काही जण हिंदी पाक्षिकाचे वर्गणीदार झाले.
१ आ १. धर्मप्रेमी उद्योजकांचा लाभलेला प्रतिसाद
अ. एका धर्मनिष्ठाने १० धर्माभिमान्यांना एकत्र बोलावले होते. त्यांना सनातन संस्थेचे कार्य आणि धर्माचरण यांविषयी सांगितल्यावर ते सर्वजण प्रोत्साहित झाले.
आ. एका उद्योजकाने त्यांच्या कुटुंबियांनाही बोलावले. त्यांना आपले कार्य फारच आवडले. त्यांनी ‘आम्ही स्वभावदोष निर्मूलनासाठी प्रयत्न करू’, असे सांगितले. त्यांनी मुलांसाठी ग्रंथ घेतले आणि अर्पण दिले.
इ. एका रुग्णालयातील ६ आधुनिक वैद्य एकत्र आले. त्यांना विषय सांगितल्यावर तो आवडला. त्यांना आरोग्यविषयक मोहीम फार आवडली. त्या सर्वांनी सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने घेतली. ३ जण पाक्षिकाचे वर्गणीदार झाले.
एकंदरीत भदोही येथे अन्य धर्मियांचे प्राबल्य असूनही हिंदु समाजातील अनेक लोक पुढे आले. त्यांनी सनातनच्या कार्यात सहभागी होण्याची सिद्धताही दर्शवली.
१ इ. आयरगाव, सैदपूर, अयोध्या, जयपूरीया आणि नोएडा : येथेही चांगला प्रतिसाद लाभला. उत्पादने आणि ग्रंथ यांचे वितरण चांगले झाले. क्रांतीकारकांची माहिती सांगणार्या ‘फ्लेक्स’ची मागणी, तसेच ‘सनातन प्रभात’ पाक्षिकासाठी विज्ञापने मिळाली. एका ठिकाणी कार्यालयातील कर्मचार्यांसाठी सनातनच्या ग्रंथांचे वाचनालय चालू करण्यास सांगितले.
२. बिहार
मुजफ्फरपूर, समस्तीपूर येथे चांगले संपर्क झाले. ग्रंथ आणि उत्पादने यांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. काही जण हिंदी पाक्षिकाचे वर्गणीदार झाले आणि विज्ञापनेही मिळाली. धर्मशिक्षण आणि क्रांतीकारक यांच्याविषयीच्या ‘फ्लेक्स’ची मागणी मिळाली, तसेच ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’साठी अर्पण मिळाले. एका व्यावसायिक व्यक्तीला हिंदु धर्माविषयी पुष्कळ शंका होत्या. त्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले आणि नंतर उद्योजक कार्यशाळेला येण्याची उत्सुकता दाखवली.
३. हरियाणा
चरखी-दादरी, फरिदाबाद येथेही चांगला प्रतिसाद लाभला. एका मंदिरात धर्मशिक्षणविषयक फलक लावण्याचे नियोजन केले. तेथे ग्रंथ-वितरण झाले आणि काही जण ‘सनातन प्रभात’ नियतकालिकाचे वर्गणीदार झाले.
३ अ. एका धर्मप्रेमी दुकानमालकाने दाखवलेली जिज्ञासा आणि तत्परतेने केलेली कृती : येथील एका दुकानाच्या मालकाने त्यांच्या दुकानाचे नूतनीकरण केले आहे. त्यांनी दुकानातच वरच्या बाजूला एक ध्यानमंदिर केले असून ‘तेथे देवतांची कोणती चित्रे कशी लावू ?’, असे विचारले. तेव्हा त्यांना ‘अष्टदेवतांची चित्रे ठेवू शकतो’, असे मी सुचवले. त्यांना ही संकल्पना आवडली. त्यांनी लगेच अष्टदेवतांच्या ‘फ्रेम’ची मागणी केली. त्यांना संपूर्ण दुकानाला वास्तूछत लावायला सांगितले आणि त्याचसमवेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रही लावण्यास सुचवले. त्यांनी त्याप्रमाणे गुरुदेवांचे छायाचित्र लावलेही. त्यांनी हिंदी धर्मशिक्षण फलकाच्या ग्रंथाला विज्ञापन दिले.
४. देहली येथेही ग्रंथवितरण झाले.
५. मध्यप्रदेश
भोपाळ, इंदूर, उज्जैन येथे समाजाकडून आणि तेथील शाळांमधून प्रवचनांना चांगला प्रतिसाद मिळाला. येथे ग्रंथसंच आणि ‘फ्लेक्स’ यांसाठी चांगला प्रतिसाद मिळाला. आम्ही ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’विषयी सांगितल्यावर लोकांनी त्याचे स्वागत केले आणि ‘आम्ही या कार्याला सहकार्य करणार’, असे आश्वासनही दिले.
६. झारखंड
६ अ. जमशेदपूर : येथील एका मंदिराच्या ५ – ६ भिंतींवर सनातनच्या ग्रंथांच्या मुखपृष्ठाचे ‘फ्लेक्स’ लावण्याची अनुमती मिळाली. ग्रंथप्रसारासाठी ही नवीन संकल्पना सुचली. येथे ग्रंथवितरण चांगले झाले, तसेच अर्पणही मिळाले.
६ आ. कतरास : येथे सनातनचे संत पू. खेमका यांचे काही मित्र आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांना भेटण्याचा योग आला. त्यांच्यासाठी नियमित धर्मसत्संग चालू झाला आहे. तेथील एका शाळेने ग्रंथसंचाची मागणी केली आहे.
६ इ. धनबाद
६ इ १. एका धर्मप्रेमीची दिसून आलेली धर्मावरील अढळ निष्ठा !
६ इ १ अ. एका धर्मप्रेमींना सनातनचे सर्व कार्य आवडल्यामुळे त्यांनी शाळेसाठी सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ, वह्या इत्यादी घेणे : येथील एका धर्मप्रेमींची १० वर्षांपूर्वी भेट झाली होती. ते शाळेत शिक्षक आहेत आणि ‘सनातन प्रभात’चे वाचक आहेत. त्या वेळी त्यांनी त्यांच्या शाळेसाठी सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ आणि वह्या घेतल्या होत्या. त्यांनी सनातन-निर्मित अष्टदेवतांची चित्रे, तसेच परात्पर गुरु डॉक्टर आणि प.पू. भक्तराज महाराज यांची छायाचित्रे घेऊन त्यांच्या शाळेतील यज्ञकुंडाजवळ लावली होती. त्यांनी त्यांच्या शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ ‘राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज यांचे महत्त्व’ यांविषयीचा सनातन संस्थेचा ‘फ्लेक्स’ फलकही लावला होता.
६ इ १ आ. धर्मप्रेमीच्या कृतीविषयी शाळेतील सहकार्यांनी विश्वस्तांकडे गार्हाणे करणे, त्यामुळे धर्मप्रेमी शिक्षकांना शाळेतून निलंबित केले जाणे : त्या धर्मप्रेमीच्या शाळेतील सहकार्यांना हे आवडले नव्हते. त्या सहकार्यांनी शाळेच्या विश्वस्तांकडे गार्हाणे केल्यामुळे धर्मप्रेमीना २ वर्षांसाठी शाळेतून निलंबित केले गेले. याविषयी त्यांनी न्यायालयात दावा केला. न्यायालयाचा निकाल धर्मप्रेमीच्या बाजूने लागल्यामुळे त्यांना शाळेत पुन्हा बोलावण्यात आले.
६ इ १ इ. कठीण प्रसंग येऊनही तत्त्वापासून न ढळणारे धर्मप्रेमी ! : या मधल्या अतिशय कठीण काळात त्यांनी नामजप चालूच ठेवला होता. त्यांनी सनातनला याविषयी काही कळवलेही नाही. यावरून त्यांची परात्पर गुरु डॉक्टरांवरील अपार श्रद्धा लक्षात आली. या वेळी झालेल्या भेटीत त्यांनी हे सर्व मला सांगितले.
६ इ २. हिंदु धर्मियांमधील निष्क्रीयतेचा लाभ घेणारे अन्य पंथीय !
६ इ २ अ. वनौषधींची चांगली जाण असलेल्या एका हिंदु व्यक्तीकडून ते ज्ञान एका ‘नन’ने शिकून घेणे आणि नंतर त्या हिंदु व्यक्तीचे धर्मांतर केले जाणे : त्या धर्मप्रेमीने मला एक धक्कादायक वार्ता सांगितली. दुग्धा, धनबाद येथील एका व्यक्तीच्या वडिलांना वनौषधींची चांगली माहिती आहे. ते सर्व प्रकारच्या दुखण्यांवर वनौषधी देतात. अगदी ‘कोब्रा’ हा अती विषारी नाग चावल्यावरही ते उपचार करून त्या रुग्णास वाचवतात. त्यांचे हे ज्ञान पाहून केरळ येथील एका ‘नन’ने त्यांच्याशी जवळीक साधली आणि त्यांच्याकडील सर्व विद्या शिकून घेतली. आता तिने त्यांचे धर्मांतर केले असून त्यांना ‘फादर’ बनवण्यासाठी केरळ येथे पाठवण्यात आले आहे.
६ इ २ आ. गुडघेदुखीवर उपचार करणार्या आदिवासी व्यक्तीचे धर्मांतर केले जाणे : त्या धर्मप्रेमीने आणखी एक उदाहरण सांगितले. ‘संथाल’ नावाच्या आदिवासी जमातीतील एक शिक्षक गुडघेदुखीवर उपचार करतात. त्यांनी मर्दन केल्यावर २ घंट्यांत रुग्ण बरा होतो. धर्मप्रेमीने स्वतः त्यांच्या उपचारांचा लाभ घेतला आहे. त्यांचेही धर्मांतर केले असून ते आता चर्चमध्ये जातात.
या घटनांवरून लक्षात आले की, अन्य पंथीय धर्मप्रसारक आदिवासी भागात जाऊन त्यांच्याकडील दुर्मिळ विद्या शिकून घेतात आणि स्वतःचा व्यवसाय चालू करतात. नंतर त्यांचे अन् तेथील सर्वांचे धर्मांतरही करतात. अशा प्रकारे हे अन्य पंथीय भारतियांचे ‘वनौषधी आणि बिंदूदाबन’ यांविषयीचे ज्ञान शिकून घेऊन ते स्वतःचे ज्ञान असल्याचे भासवत आहेत.
७. बंगालमध्ये आलेला एक अनुभव
येथील एक व्यावसायिक प्रतिदिन सकाळी ५० गरिबांना बिस्किटे आणि टोस्टची पाकिटे वाटतात. त्यांना विचारले, ‘‘आपण प्रतिदिन ५० लोकांना असे खाद्यपदार्थ देता; पण ‘हे लोक कोण असतात ?’, हे आपण जाणता का ?’’ ते म्हणाले, ‘‘मी नोकरमाणसे, झाडूवाले, तसेच रिक्शावाले यांना ते देतो.’’ त्या वेळी त्यांना ‘सत्पात्रे दाना’चे महत्त्व सांगितले; परंतु त्यांचे याविषयीचे विचार पक्के असल्याचे लक्षात आले.
८. प्रसारदौर्यात लक्षात आलेल्या गोष्टी
८ अ. स्वधर्माविषयी अज्ञान आणि उदासीनता : समाजात धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. ‘सर्वधर्मसमभाव’ या नावाखाली लोक धर्माचरण करायला विसरत आहेत. हिंदूंची मंदिरे आहेत; पण लोक मंदिरात जातांना ‘जणू एखादे प्रेक्षणीय स्थळ पहायला जात आहेत’, असे दृश्य दिसते. गंगेच्या काठी सायंकाळी अपरंपार गर्दी असते; पण लोक गंगेच्या आरतीपेक्षा ‘सेल्फी’ काढण्यात गुंग असतात. लोक पायात चपला घालून गंगेत दिवे सोडतात. गंगेच्या काठावर लावलेल्या दुकानांत खरेदीसाठी प्रचंड गर्दी असते.
८ आ १. धड दोन वाक्येही व्यवस्थित लिहिता न येणारे शाळेतील शिक्षक ! : उत्तर भारतातील दौर्यात काही ठिकाणी शाळांमधून शिक्षकांसाठी उपक्रम केले. नंतर त्यांच्याकडून त्याविषयी अभिप्राय घेतले. तेव्हा एक आश्चर्याची गोष्ट समोर आली. काही शिक्षकांना धड दोन वाक्येही व्यवस्थित लिहिता आली नव्हती. त्यांचे हस्ताक्षर अतिशय वाईट होते. भारताचे भावी नागरिक घडवणार्या अशा शिक्षकांच्या हाती असलेले भारताचे भवितव्य पाहिल्यावर मनाला अतिशय खेद वाटला.
८ आ २. विद्यार्थ्यांवर सकारात्मक विचारांचा संस्कार न करता स्वतःही नकारात्मकतेत रहाणारा शिक्षकवर्ग ! : एका शाळेत ‘मुलांवर सुसंस्कार होण्यासाठी आणि त्यांचा व्यक्तीमत्त्व विकास होण्यासाठी सनातन संस्था करत असलेल्या उपक्रमांविषयी सांगितले. त्यांना राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी चालवलेले अभियान अन् त्याला मिळत असलेला उत्तम प्रतिसाद यांविषयीही सांगितले. त्या वेळी त्यांची ऐकण्याची स्थिती अल्प होती. त्यांचा ‘हे अशक्य आहे. तुमचा वेळ फुकट जात आहे’, असाच बोलण्याचा सूर होता. त्यांचे नकारात्मक आणि निराशाजनक विचार ऐकल्यावर मी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही असे का बोलता ? सकारात्मक राहिल्याने लाभच होणार आहे.’’ शेवटी त्यांनी वाचनालयासाठी ग्रंथांची मागणी केली.
८ आ ३. शाळेपेक्षा खासगी शिकवणीला आलेले महत्त्व : एकूणच उत्तरप्रदेश आणि बिहार येथील शाळांचा अनुभव फारच वेगळा होता. येथे शाळांपेक्षा खासगी शिकवणीला अधिक महत्त्व असल्याचे दिसून आले. येथे खासगी शिकवण्यांना गणवेश आहेत. तेथील विद्यार्थ्यांची संख्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत अधिक आहे. विद्यार्थी केवळ शाळेचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी परीक्षेपुरते शाळेत जात असल्याचे लक्षात आले.
९. कृतज्ञता
‘हे गुरुदेव, या दौर्यात लहान-मोठे अनेक संपर्क झाले. या प्रत्येक भेटीतून मला समाजाच्या स्थितीची, धर्मकार्याच्या आवश्यकतेची आणि ‘आपण श्री गुरूंच्या धर्मकार्यात किती अल्प पडतो ?’, याची तीव्रतेने जाणीव झाली. हे सर्व पाहिल्यावर या संपूर्ण दौर्यात देवाने मला भरपूर अनुभूती दिल्या. सर्व ठिकाणी तापमान ३८ ते ४२ अंश सेल्सिअस इतके होते, तरीही गुरुदेवांनी माझी आणि समवेत असलेल्या सर्व साधकांची काळजी घेतली अन् सेवा करून घेतली. याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्रीमती स्मिता नवलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.१.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |