पेण (जिल्हा रायगड) येथे सह्याद्री प्रतिष्ठान आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात १९० रक्तदात्यांनी केले रक्तदान !
पेण (जिल्हा रायगड) ११ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढीमधील साठा अल्प पडू लागला आहे. हीच निकड लक्षात घेता पेण येथील शिवप्रेमी आणि सामाजिक संघटना यांच्यावतीने पेण येथील गांधी मंदिर वाचनालयाच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी सह्याद्री प्रतिष्ठान पेण, शिवप्रेमी संघटना, मैत्री ग्रुप, स्वराज्य प्रतिष्ठान, जगदंब संघटना रावे, शब्दभेदि सामाजिक संस्था भाल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवभक्त मित्र मंडळ या संघटनांच्या १९० कार्यकर्त्यांनी रक्तदान करून त्यांचे सामाजिक कर्तव्य पार पाडले.
रक्त संकलनासाठी ‘श्री साई ब्लड बँक’ यांनी साहाय्य केले. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रचे उपाध्यक्ष श्री. समीर म्हात्रे, तसेच सह्याद्री प्रतिष्ठान पेणचे अध्यक्ष श्री. रोशन टेमघरे, त्यांचे सहकारी आणि अन्य संघटनेतील शिवभक्त यांनी उत्स्फूर्तपणे प्रयत्न केले.