राणा अय्युब यांची चोरी !
संपादकीय
|
वादग्रस्त पत्रकार राणा अय्युब यांची चोरी अंमलबजावणी संचालनालयाने पकडली आहे. स्वत: सामाजिक कार्यकर्त्या असल्याचा आव आणत सामाजिक गुन्हेगारी करणार्या टोळीमधील राणा अय्युब या एक आहेत. राणा अय्युब यांच्यावर कोरोना महामारीच्या काळात कोरोना पीडितांना साहाय्य करण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा करून (‘क्राऊड फंडिग’ करून) त्यांचा वापर स्वत:साठी करण्याचा आरोप आहे. त्यांनी कोरोना पीडितांच्या साहाय्यासाठी ‘केट्टो’ या सामाजिक माध्यमाचा उपयोग करून लोकांकडून २ कोटी ७० लाख रुपये गोळा केले. या पैशांपैकी राणा अय्युब यांनी १ कोटी ६० लाख रुपये त्यांचे वडील महंमद अय्युब वकीफ यांच्या खात्यात, ३७ लाख १५ सहस्र रुपये बहिणीच्या खात्यात, तर ७२ लाख रुपये स्वत:च्या खात्यात वळवले. सामाजिक माध्यमांवर लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्याच्या मोहिमेची कुणकुण उत्तरप्रदेश पोलिसांना लागताच त्यांनी राणा अय्युब यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. यामुळे अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई होईल, याची चाहुल राणा अय्युब यांना लागताच त्यांनी त्वरित ७४ लाख ५० सहस्र रुपये पंतप्रधान साहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधी येथे वळवले. असे करून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न अय्युब यांनी केला; मात्र त्यांची चोरी अंमलबजावणी संचालनालयाने पकडलीच.
भारतात समाजद्रोही घटकांकडून ‘सामाजिक कार्यकर्त्या’ची झूल पांघरून समाजद्रोही कामे केली जातात. असे लोक आणि त्यांच्या संघटना यांच्याकडून मोठे सामाजिक कार्य करत असल्याचा आव आणला जातो आणि तसे करतांना ज्या विषयांचा गंधही नाही त्याविषयी टीकाटीप्पणी करून प्रसिद्धी मिळवली जाते. भारतातील अल्पसंख्यांकांवरील तथाकथित अन्यायाविरुद्ध विदेशात आवाज उठवून त्यासाठी विदेशातूनही पैसे देण्याचे आवाहन केले जाते. ‘त्यांच्या या ‘सामाजिक’ कार्यासाठी किती निधी परदेशातून मिळाला ?’, ‘किती भारतातून गोळा केला ?’, याचा कोणताही हिशोब देण्याचे दायित्व या व्यक्ती आणि संस्था घेत नाहीत. ‘हा मिळालेला पैसा कुठे खर्च केला ?’, याचीही माहिती दिली जात नाही. सरकारने अथवा प्रशासनाने ही माहिती मागितली, तर त्वरित ‘आमच्या सामाजिक कार्यावर सरकार नियंत्रण आणू पहात आहे’, अशी ओरड केली जाते. मोदी शासनाने एफ्.सी.आर्.ए. (परदेशी निधी नियंत्रण) कायद्यात सुधारणा करून विदेशातून निधी गोळा करण्यावर बंधने आणल्यामुळे सर्वांत अधिक आकांडतांडव या बिगर शासकीय संस्थांनीच (एन्.जी.ओ.) केला होता. ‘या सुधारणांमुळे विदेशातून मिळणारा निधी हडपण्यास मिळत नसल्याने आता तथाकथित सामाजिक कार्य करणारे पैसे खाण्यासाठी देशांतर्गत वेगळे मार्ग अवलंबत आहेत का ?’, हा प्रश्न आहे. अशा व्यक्ती आणि संस्था यांना केंद्रशासनाने शोधून काढून त्यांच्यावर कठोर कारवाई केल्यासच लोकांची फसवणूक टळू शकेल.
सौदी अरेबियाच्या नागरिकांकडून चपराक !
भारतातील समाजवादी आणि हिंदुद्वेषी पत्रकारांच्या साखळीत राणा अय्युब यांचे नाव कायम असते. आतंकवाद्यांविषयी प्रेम दर्शवण्यात आणि हिंदूंना ‘जुलमी’, ‘आतंकवादी’ संबोधून त्यांची सदैव अपकीर्ती करत रहाण्यात त्या अग्रेसर आहेत. हिंदुद्वेषाची कावीळ झाल्यामुळे धर्मांध मनाने आणि दृष्टीने हिंदूंकडे पहाणार्या अशा पत्रकारांना हिंदूंवरील अत्याचारांविषयी यत्किंचितही काहीच वाटत नसते. शोध पत्रकारितेच्या नावाखाली लिहिलेले वर्ष २००० च्या दशकातील गुजरातमधील पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यावरील ‘गुजरात फाईल्स’सारखे त्यांचे पुस्तक अशा एकांगी मानसिकतेतूनच बाहेर येते. अधिक धमक्या येणार्या पत्रकारांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. ‘करावे तसे भरावे’, तशी ही क्रियेला प्रतिक्रिया आहे, हे यावरून लक्षात येते. मोदीद्वेषाने पछाडलेल्या अय्युब यांच्यासारख्या पत्रकारांचे मग पाकिस्तानकडूनही ‘धैर्यवान पत्रकार’ म्हणून तोंड भरून कौतुक केले जाते. वर्ष २०२० मध्ये पाकच्या ‘इन्फर्मेशन ऑफ ब्रॉडकास्ट’च्या महिला अधिकार्याने अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावरून म्हटले होते, ‘मोदींचा मूलतत्त्ववादी हेतू (फॅसिस्ट अजेंडा) या (राणा अय्युब) मुसलमान पत्रकाराने उघडा पाडला आहे.’ बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतात राहून देशाबाहेरील मुसलमानांशी जवळीक दाखवण्याचे तंत्र अय्युब यांना मात्र आता चांगलेच महागात पडले आहे. या प्रसंगात अय्युब यांचे आतंकवाद्यांविषयीचे प्रेम इतके उफाळून आले आणि प्रसिद्धीसाठी इतक्या उतावळेपणाने त्यांनी प्रतिक्रिया दिली की, सौदी नागरिकांनीच त्यांना डाफरले. येमेन या देशात ‘हौती’ या नावाचे आतंकवादी रहातात. त्यांनी सौदी अरेबियावर ड्रोन आक्रमणे करणे, लहान मुलांना आतंकवादी बनवणे असे उद्योग चालू केले. त्यानंतर येमेन देशाने सौदी अरेबियाला सांगितले, ‘तुम्ही येऊन या आतंकवाद्यांवर कारवाई करू शकता.’ त्यानुसार सौदी अरेबियाने येमेन देशातील हौती या आतंकवादी संघटनेच्या स्थळांवर आक्रमणे केली. या घटनेनंतर अय्युब यांनी सौदीला ‘खून का प्यासा’ म्हणत सौदीने नरसंहार केल्याची गरळकओक करणारे ‘ट्वीट’ केले. पत्रकार असूनही अय्युब यांनी अबूधाबी विमानतळावर आक्रमण केल्याचे ध्यानात घेतले नाही. अय्युब यांच्या सौदीवरील टिपणीनंतर सौदीतील जनता संतप्त झाली. भारतात अशा प्रकारे धर्मांधांच्या बाजूने एकांगी वक्तव्ये करून हिंदुद्वेषी टिपण्या करण्याची सवय झालेल्या अय्युब यांना सौदी जनतेने समाजमाध्यमातून फटकारून त्यांचा चांगलाच समाचार घेतला. सौदीतील एका नागरिकाने ट्वीट करत अय्युब यांच्या पत्रकारितेच्या ज्ञानात भर घालत सांगितले, ‘‘आतंकवादाविरोधात १० देशांच्या संघटनाने येमेन देशाच्या सरकारशी मिळूनच आतंकवाद्यांविरोधात ही कारवाई केली असतांना तुम्ही आतंकवाद्यांना साथ देत आहात !’’ आतंकवाद्यांची बाजू घेणारे अय्युब यांचे खरे रूप यामुळे आता अधिक उघड झाले आहे ! भारतियांनीही पत्रकारितेच्या नावाखाली आतंकवाद पोसणार्या अशा पत्रकारांना आता त्यांची जागा दाखवली पाहिजे, हेच खरे !