बीड जिल्ह्यात मोर्चा, आंदोलने यांवर बंदी आदेश लागू !
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहाण्यासाठी जिल्हाधिकार्यांचे आदेश
बीड – जिल्ह्यामध्ये १० मार्चच्या मध्यरात्रीपासून २४ फेब्रुवारीपर्यंत मोर्चा काढणे, आंदोलन करणे यांवर बंदी असणार आहे. जिल्ह्यात ५ किंवा त्याहून अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास अनुमतीविना एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणूक काढता येणार नाही. सामाजिक शांतता अबाधित रहावी, यासाठी बीडचे जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी हा निर्णय घेतला आहे.
या काळात कोणतेही शस्त्र जवळ बाळगणे, दाहक पदार्थ जवळ बाळगणे, आंदोलन करणे, मोर्चे काढणे, भडकाऊ भाषण करणे यांवर बंदी घालण्यात आली आहे. बीडचे अपर जिल्हाधिकारी संतोष बनकर यांच्या स्वाक्षरीने हे आदेश देण्यात आले असून आदेश मोडणार्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.