६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनय पुंड (वय १८ वर्षे) यांना धनुर्विद्येच्या स्पर्धेच्या वेळी आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतांना गुरुकृपेने आलेल्या विविध अनुभूती
उद्या माघ शुक्ल पक्ष द्वादशी (१३.२.२०२२) या दिवशी अमरावती येथील श्री. अनय पुंड यांचा १८ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
श्री. अनय पुंड याला १८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धेत भाग घेतांना आलेल्या अडचणी आणि त्या वेळी अनुभवलेली गुरुकृपा
१ अ. धनुर्विद्येच्या साहित्यातील मौल्यवान भाग तुटणे आणि तो भाग विदेशातून उपलब्ध होण्यासाठी २ वर्षे लागणार असल्याने निराशा येणे : ‘मी धनुर्विद्या (धनुष्याने तीर (बाण) मारण्याची विद्या) (आर्चरी) शिकतो. २ वर्षांपूर्वी माझ्या साहित्यातील (‘किट’मधील) एक मूल्यवान भाग तुटला. त्या वेळी मला फार निराशा आली. साहित्यातील तुटलेला तो भाग विदेशातून मागवायचा असल्याने त्या प्रक्रियेला २ वर्षे लागणार होती. त्यामुळे मला चिंता वाटत होती, ‘माझी २ वर्षे वाया जातील. त्यानंतर मला आरंभीपासून सराव करावा लागेल.’
१ आ. गुरुकृपेने धनुर्विद्येच्या साहित्यातील तुटलेला भाग भारतातच उपलब्ध होणे : त्या वेळी माझ्या आईने (सौ. सविता राजेश पुंड यांनी) मला यावर स्वयंसूचना सत्रे करायला आणि मनातील विचार देवाला सांगण्यास सांगितले. मी नियमितपणे स्वयंसूचना सत्रे करत होतो आणि प्रतिदिन कृष्ण अन् प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) यांना माझ्या मनातील विचार सांगत होतो. नंतर देवाच्या कृपेने मला धनुर्विद्येच्या साहित्यातील तुटलेला भाग भारतात मिळाला. माझ्या वडिलांनी मला तो भाग विकत घेऊन दिला. तोपर्यंत मी स्थिर राहू शकलो.
१ इ. देवाला प्रार्थना केल्यावर अल्प सराव करूनही राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत कांस्य पदक मिळणे : त्या वेळी स्पर्धेला एकच मास शिल्लक होता आणि सराव करणे पुष्कळ कठीण होते. मी देवाला सतत प्रार्थना करायचो, ‘तुला माझ्याकडून जसे अपेक्षित आहे, तसे होऊ दे. मला स्थिर ठेव.’ फारसा सराव न करताही मी राष्ट्रीय स्तरावर खेळलो आणि त्या स्पर्धेत मला कांस्य पदक मिळाले.
२. बारावी आणि अभियांत्रिकी शिक्षणाची प्रवेश परीक्षा (सी.ई.टी.) या परीक्षांच्या वेळी आलेल्या अडचणी अन् त्या वेळी अनुभवलेली गुरुकृपा
२ अ. घरी अभ्यासाला पोषक वातावरण नसूनही बारावीच्या परीक्षेत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने उत्तम गुण मिळणे : मी बारावी इयत्तेत शिकत असतांना आरंभीपासून आमच्या घरात वादग्रस्त वातावरण होते. त्या वेळी माझे मन अभ्यासात लागत नसे. त्यामुळे माझ्या आईला निराशा आली होती. ते बघून मला फार काळजी वाटायची. त्या काळात घरात प्रतिदिन वाद होत असत. तेव्हा मी माझ्या मनातील प्रत्येक विचार कृष्णाला सांगत असे आणि ‘तूच माझ्याकडून आवश्यक तेवढा अभ्यास करवून घे’, अशी प्रार्थना करत असे. केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने माझा अभ्यास झाला आणि घरचे वातावरणही पालटले. ‘मी परीक्षेत उत्तीर्ण होईन कि नाही ?’, याची सगळ्यांनाच काळजी वाटत असतांना केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला १२ वीच्या परीक्षेत ९३.६ टक्के गुण मिळाले.
२ आ. डेंग्यू झाला असतांनाही देवाच्या कृपेने अभियांत्रिकी शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेला बसता येऊन अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळणे : सी.ई.टी.च्या (अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेच्या) वेळी मला डेंग्यू झाला आणि माझी शारीरिक स्थिती खालावली. मला परीक्षेला जाणे शक्य नव्हते; परंतु पुढच्या शिक्षणासाठी परीक्षा देणे महत्त्वाचे होते. आई आणि मी सतत प्रार्थना करत होतो, ‘देवा, तुला अपेक्षित असे होऊ दे.’ परीक्षेच्या आधी माझे वडील परीक्षा केंद्रावर चौकशी करण्यासाठी गेले होते. तेव्हा तेथील शिक्षकांनी परिचय नसतांनाही माझी अडचण समजून घेतली. माझे परीक्षेला बसण्याचे ठिकाण वरच्या माळ्यावर होते. शिक्षकांनी मला तळमजल्यावर जागा दिली, तसेच मला मधेच विश्रांती घेण्यासाठी एका पलंगाची सोय केली. मी परीक्षा दिली आणि देवाच्या कृपेने मला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला.
३. या वर्षभरात मी कुठेही गेलो किंवा घरी असलो, तरीही मला प्रतिदिन भावावस्था जाणवते आणि देवाप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.
४. घरी बिकट स्थिती असतांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने स्थिर रहात आल्याबद्दल साधकाने व्यक्त केलेली कृतज्ञता !
‘देवाने मला योग्य वयात साधनेचा मार्ग दाखवला’, त्याबद्दल माझ्याकडून देवाप्रती कृतज्ञता व्यक्त होते. या वर्षभरात घरी बिकट स्थिती असतांना केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आम्ही (मी, माझी लहान बहीण (कु. लक्ष्मी (वय ११ वर्षे) आणि आई) स्थिर राहू शकलो. त्यांनी आम्हाला वेळोवेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता दिली.
त्यांच्या कृपेने आमच्याकडून नामजपादी उपाय होत होते, तसेच आम्ही व्यष्टी साधनेचा आढावाही देत होतो. व्यष्टी साधनेच्या आढाव्यामुळे माझे साधनेचे प्रयत्न वाढले. ‘या कठीण परिस्थितीत आम्ही तिघेही केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेनेच साधना करत आहोत’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
५. प्रार्थना
‘यापुढेही मला अधिकाधिक साधना करण्याची संधी द्या आणि मला सतत तुमच्या चरणांशी ठेवा’, हीच गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्री.अनय पुंड, अमरावती, (जानेवारी २०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |