भारतीय लोकशाहीतील हास्यास्पद निवडणुका !
‘डॉक्टर, शिक्षक, न्यायाधीश इत्यादींच्या कार्यक्षेत्रांमध्ये एखाद्याची निवड करायची असल्यास त्या त्या क्षेत्रातील अनुभवी जाणकारच त्यांची निवड करतात; कारण त्यांना त्यांच्या क्षेत्रातील कार्याची व्याप्ती आणि ते कार्य समर्थपणे पुढे नेण्यासाठी आवश्यक क्षमता अन् गुण यांची जाण असते. त्यानुसार ते त्यांच्या क्षेत्रातील समित्यांसाठी आवश्यक तो उमेदवार निवडतात.
भारतीय लोकशाहीत मात्र याच्या उलट होते. देश सांभाळणार्या अशा व्यक्तीची निवड देशातील सर्वसामान्य व्यक्ती करते, जिला देशाच्या समस्या, देशाची स्थिती यांची काहीच कल्पना नसते. सर्वसामान्य व्यक्तीला हेही माहीत नसते की, ‘देशासमोरील आव्हाने काय आहेत आणि ती हाताळण्यासाठी मी निवडून देत असणारी व्यक्ती सक्षम आहे कि नाही ?’ उमेदवाराने स्वतःचा प्रचार करतांना ‘लाच’ म्हणून ‘मी निवडून आलो, तर हे देईन, ते देईन’, अशी आश्वासने दिलेली असतात, त्यात जो उमेदवार जनतेला प्रिय असणार्या विषयांची अधिक आश्वासने देतो, तो उमेदवार सर्वसामान्य जनतेला जवळचा वाटतो आणि त्याला ते मत देतात.
थोडक्यात भारतात राज्यकर्ता निवडणे, हे एखाद्या अशिक्षिताला शुद्धलेखन पडताळण्यासाठी देण्यासारखे आहे. हे सर्व पहाता भारतीय लोकशाहीतील हा प्रकार किती हास्यास्पद आहे, हे लक्षात येते आणि याहून हास्यास्पद बाब म्हणजे, गेल्या ७४ वर्षांत हे कुणाच्याही लक्षात आलेले नाही ! यामुळेच देश परमावधीच्या अधोगतीला गेलेला आहे.
देश स्वतंत्र होतांना केवळ पाश्चात्त्यांचे अंधानुकरण म्हणून लोकशाही पद्धत स्वीकारल्यामुळे त्याचे परिणाम आपण गेले ७४ वर्षे भोगत आहोत. भारताचा इतिहास बघता, त्या काळात कधीच अशा प्रकारे स्वतःचा राज्यकर्ता निवडण्याची पद्धत नव्हती; म्हणजे आपल्या पूर्वजांना किती समज होती, ते कळते !
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.