साधकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवणारे आणि साधकांना साधना करण्यासाठी प्रोत्साहन देऊन साधनेत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्नरत असणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे !
‘मी देवद आश्रमामध्ये रहायला आल्यानंतर मला सद्गुरु राजेंद्र शिंदे (सद्गुरु राजेंद्रदादा) घेत असलेला व्यष्टी साधनेचा आढावा साधारण साडेतीन वर्षांपेक्षा अधिक काळ लाभला. मी त्यांना माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा देते, तेव्हा मला ‘इतरांचा आढावा कसा घ्यायचा ?’, हेही शिकता येते. या प्रक्रियेत असतांना मला त्यांच्यातील अनेक गुणांचे दर्शन झाले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘देवाला अपेक्षित असा आढावा देणे आणि घेणे होण्यासाठी काय करायला हवे ?’, हे मला सद्गुरु राजेंद्रदादांकडून शिकता आले. माझ्या अल्प बुद्धीला लक्षात आलेली अनमोल सूत्रे मी कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण करते.
१. आढाव्याविषयी बहिर्मुखता असणे
पूर्वी मला इतरांचा आढावा घेणे सोपे वाटायचे. त्या वेळी माझ्या मनात ‘मी आढाव्यातील साधकांना सर्व सूत्रे सांगितली आहेत; पण साधकांनी आढाव्यात सांगितल्यानुसार प्रयत्न केले नाहीत’, असे बहिर्मुखतेचे विचार असायचे.
२. सद्गुरु राजेंद्र शिंदे ‘आढाव्यातील साधक साधनेच्या पुढच्या टप्प्याला गेले नाहीत’, याचाच अर्थ आढावासेवक त्यांना साधनेत साहाय्य करायला न्यून पडले’, असे सांगून त्यांनी दायित्वाची जाणीव करून देणे
सद्गुरु राजेंद्रदादांनी मला ‘आपल्या आढाव्यातील साधक साधनेच्या पुढच्या टप्प्याला गेले नाहीत, याचाच अर्थ आढावासेवक त्यांना साहाय्य करायला न्यून पडले आहेत’, असा दृष्टीकोन दिला. त्यातून ‘व्यष्टी साधनेचा आढावा देण्यापेक्षा ‘आढावा घेणे’ अधिक कठीण आहे’, हे माझ्या लक्षात आले. आढावा घेतांना आपल्याकडे इतरांना व्यष्टी साधनेमध्ये साहाय्य करण्याचे दायित्व असते. सद्गुरु राजेंद्रदादांमुळे ‘आढावा देणे किंवा घेणे’ या दोन्हींकडे बघण्याचा दृष्टीकोन किती व्यापक असायला हवा ?’, हे माझ्या लक्षात आले.
३. सद्गुरु राजेंद्रदादांचा व्यष्टी आढावा आणि आढाव्यातील साधक यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन !
अ. सद्गुरु राजेंद्रदादांच्या मनात ‘साधकांचा आढावा घेण्याच्या माध्यमातून देवाने मला साधकांना साहाय्य करण्याची संधी दली आहे, तर ‘मी त्याला कसे साहाय्य करू ?’, असा एकच विचार असतो.
आ. ‘कुठल्याही परिस्थितीत साधक निराश होणार नाही’, याकडे ते लक्ष देतात.
इ. साधकांचे व्यष्टी साधनेच्या दृष्टीने असणारे अयोग्य विचार पालटून योग्य विचार झाले पाहिजेत. ‘साधकांना व्यष्टी साधनेची गोडी लागली पाहिजे’, याकडे त्यांचे सातत्याने लक्ष असते.
ई. ‘प्रत्येक साधकाची साधनेची स्थिती आणि क्षमता यांनुसार त्याच्यामध्ये पालट व्हायला वेळ लागणार आहे’, हे लक्षात घेऊन ते त्यांना साहाय्य करतात.
उ. ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करतांना साधकामध्ये पालट होत आहे ना ?’, याकडे लक्ष देतांना सद्गुरु दादा म्हणतात, ‘‘स्वभावदोषांमध्ये पालट होण्याची प्रक्रिया काही दिवसांची नसून अनेक जन्मांची आहे. त्यामुळे त्याकडे उतावळेपणाने न पहाता सर्व गोष्टी संबंधित साधकांना कशा शिकवता येतील ?’, याकडे लक्ष द्यायला हवे.
४. साधकांचा व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना सद्गुरु राजेंद्रदादा करत असलेले प्रयत्न !
४ अ. सद्गुरु राजेंद्रदादा साधकांना ठराविक मार्गदर्शन न करता प्रत्येकासाठी आवश्यक असे मार्गदर्शन करून साधकाच्या साधनेला दिशा देत असणे : व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतांना ‘साधक कुठे अडकला आहे ?’, याचा अभ्यास करून सद्गुरु राजेंद्रदादा त्या साधकाला नेमकेपणाने साहाय्य करतात. सर्वांना एकसारखे मार्गदर्शन न करता प्रत्येक साधकाचा अभ्यास करून ते त्याला आवश्यक असणारे साहाय्य करतात. त्यामुळे साधकांना त्यांचा आधार वाटतो.
४ आ. सद्गुरु राजेंद्रदादा साधकाला ‘चिंतनसारणीतील कुठल्या कृती करता येत नाहीत ?’, हे लक्षात घेऊन त्या करायला शिकवत असणे : ‘साधकाच्या चिंतन सारणीनुसार ते त्याला व्यष्टी साधनेच्या प्रक्रियेतील कुठल्या गोष्टी येतात ? आणि कुठल्या कृती त्याच्याकडून नियमित होत नाहीत ?’, याचा ते अभ्यास करतात आणि त्याला न येणार्या महत्त्वाच्या कृती ते प्रथम शिकवतात, उदा. चूक व्यवस्थित लिहिता न येणे, त्या चुकीमागचा स्वभावदोष किंवा अहंचा पैलू शोधता न येणे, त्यावर स्वयंसूचना बनवता न येणे इत्यादी. या गोष्टी प्राथमिक; परंतु व्यष्टी साधनेला गती येण्यासाठी आवश्यक आहेत. हेच आले नाही, तर पुढील प्रक्रिया करता येत नाही. त्यामुळे या गोष्टीला प्राधान्य देऊन ते त्या साधकाला शिकवण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ देतात.
४ इ. सद्गुरु राजेंद्रदादा साधकांना केवळ साधना सांगून न थांबता साधकाला त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी साहाय्य करत असणे
४ इ १. ‘साधक कुठल्या अडचणींमुळे थांबला आहे’, हे जाणून घेऊन सद्गुरु राजेंद्रदादा साधकांना त्या अडचणी सोडवण्यासाठी साहाय्य करत असणे : सद्गुरु राजेंद्रदादा साधकांना पुष्कळ समजून घेतात. सद्गुरु राजेंद्रदादा ‘साधकाला सेवा करतांना कौटुंबिक, आध्यात्मिक किंवा अन्य काही अडचणी आहेत का ? आणि यातील कुठल्या अडचणींमुळे साधकाला ताण आला आहे ?’, याचा शोध घेतात.
४ इ १ अ. साधकाला आध्यात्मिक त्रास असल्यास सद्गुरु राजेंद्रदादा प्रथम त्यांना नामजपादी उपाय करायला सांगत असणे आणि त्रास न्यून झाल्यावर स्वभावदोष निर्मूलनाची प्रक्रिया करायला सांगत असणे : आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांना स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करण्यामध्ये पुष्कळ अडचणी येतात. वाईट शक्ती त्यांना ही प्रक्रिया करू देत नाहीत किंवा साधकाचा त्रास वाढला असेल, तर प्रक्रियेचे प्रयत्न करतांना त्या साधकाला पुष्कळ अडचणी येतात. अशा वेळी सद्गुरु राजेंद्रदादा आधी साधकांना नामजपादी उपाय करायला सांगतात आणि वाईट शक्तींच्या त्रासाचा जोर अल्प झाल्यानंतर साधकाला पुढील प्रक्रिया करायला सांगतात. वाईट शक्तींच्या त्रासाचा जोर वाढला असेल, तर ते त्या साधकाला दोष न देता त्याला आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करतात.
४ इ १ आ. साधकाला निराशा किंवा ताण आला असल्यास सद्गुरु राजेंद्रदादा त्याचे कारण समजून घेऊन त्यातून साधकाला बाहेर पडण्यास साहाय्य करत असणे : साधक कुठल्याही कारणामुळे निराशेमध्ये असेल, तर प्रथम ‘त्याची निराशा अल्प कशी होईल ?’, याकडे सद्गुरु राजेंद्रदादा लक्ष देतात. साधकाला निराशा आली असेल, तर त्याचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न जलद गतीने होत नाहीत. त्यामुळे सद्गुरुदादा निराशेचे कारण समजून घेऊन साधकाला त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रथम साहाय्य करतात. नंतर त्यांना पुढील प्रयत्नांसाठी दिशा देतात.
४ इ १ इ. साधकाला कौटुंबिक समस्या असेल, तर सद्गुरु राजेंद्रदादा समस्येकडे पहाण्याचा योग्य दृष्टीकोन सांगून त्यातून त्याला बाहेर पडण्यास साहाय्य करून नंतर पुढील प्रक्रिया करायला सांगत असणे : काही साधकांना कौटुंबिक समस्या असतात. त्या समस्या ते आढाव्यात सर्वांसमोर सांगू शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे लक्ष स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करण्यामध्ये नसते. त्यांना त्या समस्या सांगता येत नसल्यामुळे त्यांचे दैनंदिन प्रयत्नही नीट होत नाहीत. अशा वेळी सद्गुरु राजेंद्रदादा साधकाला प्रथम ‘त्या समस्यांकडे पहाण्याचा दृष्टीकोन कसा ठेवायचा ?’, हे स्पष्ट करतात आणि त्या विचारांतून त्या साधकाला बाहेर काढतात. त्यानंतरच ते साधकाला पुढील प्रक्रिया करण्यासाठी सांगतात.
४ इ १ ई. साधकाची क्षमता अल्प असल्यास किंवा तो साधक वयस्कर असल्यास ‘त्यांना काय जमू शकेल ?’, या दृष्टीने सद्गुरु राजेंद्रदादा मार्गदर्शन करत असल्यामुळे त्यांना ताण न येता सेवेतील आनंद मिळणे : काही साधकांची बौद्धिक क्षमता अल्प असते, तसेच वयस्कर साधकांची एकूणच क्षमता अल्प झालेली असते. अशा स्थितीत ‘त्यांना काय जमते ?’ ते बघून त्यानुसार सद्गुरुदादा ‘त्यांनी कुठल्या गोष्टींवर भर दिल्यास ते ईश्वराकडे जाऊ शकतात ?’, यावर मार्गदर्शन करतात. ते सर्वांना एकसारखा नियम लावत नाहीत. त्यामुळे साधकांना प्रक्रिया करतांना ताण न येता प्रक्रियेतील आनंद मिळतो.’
(क्रमशः)
– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (७.९.२०२१)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |