५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. ओजस शशांक देशमुख (वय २ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. ओजस शशांक देशमुख हा या पिढीतील एक आहे !
माघ शुक्ल पक्ष एकादशी, म्हणजे जया एकादशी (१२.२.२०२२) या दिवशी संभाजीनगर येथील चि. ओजस शशांक देशमुख (वय २ वर्षे) याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याची आई सौ. गौरी देशमुख यांना गरोदरपणात आणि ओजसच्या जन्मानंतर अन् त्याचे वडील श्री. शशांक देशमुख यांना चि. ओजसची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
चि. ओजस शशांक देशमुख याला दुसर्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी
१ अ. नाथपंथीय संत पू. शिवनगिरीकर महाराज यांचा आशीर्वाद लाभणे : ‘आम्हाला नवनाथांपैकी एक असलेले चैतन्य श्री कानिफनाथ महाराज आणि वडोद, संभाजीनगर येथील नाथपंथीय संत पू. शिवनगिरीकर महाराज यांची कृपा लाभली. पू. शिवनगिरीकर महाराज यांनी ‘आम्हाला अपत्यलाभ होईल आणि सर्वकाही व्यवस्थित पार पडेल’, असा आशीर्वाद दिला.
१ आ. श्रीकृष्णाच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर आनंद होणे आणि त्यानंतर गर्भधारणा झाल्याची आनंदवार्ता समजणे : ‘जून २०१९ मध्ये मी देवघरातील श्रीकृष्णाच्या छायाचित्राकडे दुरूनच पाहिले. त्या क्षणी ‘काही सेकंदासाठी श्रीकृष्णाने माझ्याकडे वळून पाहिले’, असे मला स्पष्टपणे जाणवले. तेव्हा मला फार आनंद जाणवत होता. त्यानंतर दोनच दिवसांनी मला गर्भधारणा झाल्याची आनंदवार्ता समजली.
१ इ. देवाने सतत सत्मध्ये ठेवणे : संपूर्ण गरोदरपणाच्या काळात देवाने मला सतत सत्मध्ये ठेवले होते. त्या काळात देवानेच माझ्याकडून नियमितपणे रामरक्षा, मारुतिस्तोत्र, गणपतिस्तोत्र, गणपति अथर्वशीर्ष, विष्णुसहस्रनाम, शाबरीकवच, षष्ठीदेवी स्तोत्र अशी विविध स्तोत्रे म्हणवून घेतली आणि नियमित अग्निहोत्रही करवून घेतले. तसेच देवाने माझ्याकडून परात्पर गुरु पांडे महाराज यांनी दिलेले मंत्रजपही म्हणून घेतले.
१ ई. मन सकारात्मक, आनंदी आणि स्थिर असणे : गरोदरपणाच्या कालावधीत माझे मन सकारात्मक आणि आनंदी असायचे. आधुनिक वैद्यांनी माझ्या प्रकृतीविषयी काही अडचणी सांगितल्या, तरीही माझे मन स्थिर असायचे. त्या वेळी माझ्यातील कृतज्ञताभाव वाढला होता.
१ उ. अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी (सनातनचे ९८ वे संत) यांनी गर्भाच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करणे : आठव्या मासात मोठे सूर्यग्रहण होते. प्रत्यक्ष ग्रहणाच्या दिवशी अधिवक्ता पू. कुलकर्णीकाकांनी (सनातनचे ९८ वे संत पू. सुरेश कुलकर्णी यांनी) बाळासाठी आवर्जून प्रार्थना केली. ते मला म्हणाले, ‘‘काही काळजी करू नकोस. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) तुझ्या समवेत आहेत.’’ गुरुदेवांच्या कृपेने संपूर्ण ग्रहण काळात देवानेच माझ्याकडून नामजप, प्रार्थना आणि आध्यात्मिक उपाय करवून घेतले.
२. गरोदर असतांना आलेल्या अनुभूती
२ अ. गर्भधारणा झाल्यापासून प्रतिदिन दुकानात एक देशी गाय येणे : मला गर्भधारणा झाल्यापासून आमच्या दुकानात प्रतिदिन ‘राधा’ नावाची एक देशी गाय यायला लागली. माझे यजमान श्री. शशांक यांनी तिला बराच वेळ गोंजारून काहीतरी खाऊ घातल्यावरच ती परत जात असे.
२ आ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला वाहिलेली फुले अकस्मात् खाली पडल्यामुळे ‘त्यांचा आशीर्वाद मिळाला’, असे वाटणे : ८.१०.२०१९ या दसर्याच्या दिवशी श्री भवानीमातेला श्रीसुक्ताची १६ आवर्तने करून कुंकूमार्चन केले. त्या वेळी प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांच्या छायाचित्राला वाहिलेली फुले अकस्मात् खाली पडली. तेव्हा ‘प्रत्यक्ष प.पू. बाबा आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले. त्या दिवशी मला घरात दिवसभर चैतन्य जाणवत होते.
२ इ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रसिद्ध झालेला लेख वाचतांना गर्भाने हालचाल करून आनंद व्यक्त करणे : २१.११.२०१९ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांची पुण्यतिथी होती. त्या दिवशी दैनिकात प.पू. बाबांचे भक्त श्री. भांड यांचा प.पू. बाबांच्या जीवनचरित्राविषयी लेख प्रसिद्ध झाला होता. मी तो लेख वाचत असतांना मला गर्भाची वेगाने हालचाल जाणवायला लागली. ‘गर्भ दोन्ही हात आणि पाय हालवून आनंदाने नाचत आहे’, असे मला जाणवत होते. संपूर्ण लेख वाचून होईपर्यंत असेच चालू होते. त्यानंतर मी गर्भाला म्हटले, ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्यामुळे तू आनंदी झाला आहेस’, हे माझ्या लक्षात आले आहे.’ मग मी ‘प.पू. भक्तराज महाराजांचा विजय असो !’, असा सलग ५ – ६ वेळा जयघोष केला. त्यानंतर गर्भाची हालचाल थांबली.
२ ई. श्री स्वामी समर्थांचे अस्तित्व जाणवणे : माझ्या माहेरी लहानपणापासून श्री स्वामी समर्थांची उपासना होते. त्यांची कृपा मी लहानपणापासूनच अनुभवत आहे. गरोदरपणातही मला श्री स्वामीं समर्थांचे अस्तित्व सतत जाणवायचे. ‘तेच माझ्या समवेत आहेत आणि मला आशीर्वाद देत आहेत अन् सर्वकाही करत आहेत’, अशी अनुभूती मला अनेक वेळा आली.
३. प्रसुतीच्या वेळी आलेल्या अनुभूती
३ अ. कोरोनाचा संसर्ग चालू होण्यापूर्वी प्रसुती झाल्याने कसलीही अडचण न येणे : माझ्या प्रसुतीचा दिनांक ५.३.२०२० होता; पण प्रत्यक्षात माझी प्रसुती १ मास आधी, म्हणजेच ५.२.२०२० या दिवशी झाली. ही माझ्यावर गुरुकृपाच होती; कारण त्यानंतर लगेच सर्वत्र कोरोनामुळे दळणवळण बंदी चालू झाली.
३ आ. अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी भेटायला आल्यावर चैतन्य मिळणे आणि त्यांनी पाठवलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र मिळाल्यावर बाळाचा जन्म होणे : गरोदरपणात अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी मला अधून मधून भेटत असत. मला प्रसुतीकळा चालू असतांना पू. कुलकर्णीकाका मला भेटायला आले. त्यांच्या माध्यमातून देवाने मला चैतन्याचा स्रोतच पाठवला होता. त्यामुळे मला उत्साह आणि शक्ती वाढल्याचे जाणवले. दुपारी पू. कुलकर्णी काकांनी ‘प.पू. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) छायाचित्र आहे का ?’, असे विचारले. ‘माझ्याजवळ गुरुदेवांचे छायाचित्र नाही’, असे कळताच त्यांनी एका साधकाच्या हस्ते माझ्यासाठी गुरुदेवांचे छायाचित्र पाठवले. प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र यजमानांच्या हातात पडताच बाळाचा जन्म झाला. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच सर्वांची गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
३ इ. शस्त्रकर्म न करता गुरुकृपेने सामान्य प्रसुती होणे : माझी प्रसुती शस्त्रकर्म करून करावी लागणार होती. आरंभापासूनच आधुनिक वैद्यांनी मला तशी कल्पनाही दिली होती; पण गुरुकृपेनेच माझी प्रसुती सामान्य झाली. ही माझ्यासाठी मोठी अनुभूती होती. याविषयी बोलतांना रुग्णालयातील इतर आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांनीही आश्चर्य व्यक्त केले.’
– सौ. गौरी देशमुख, संभाजीनगर (३०.१.२०२२)
४. संतांचे लाभलेले आशीर्वाद !
४ अ. प्रसुती झाल्यानंतर बाळाला लगेच संत सहवास मिळणे : प्रसुती झाल्यानंतर लगेच पू. कुलकर्णी भेटायला आले आणि त्यांनी बाळाला घेतले. अशा प्रकारे जन्म झाल्यावर लगेचच बाळाला संतांचा सहवास आणि चैतन्य लाभले.
४ आ. ‘बाळाचे नाव श्रीविष्णूच्या नावावरून ‘ओजस’ ठेवावे’, असे वाटणे आणि अधिवक्ता पू. सुरेश कुलकर्णी यांनीही तेच नाव सुचवणे : ‘बाळाचा जन्म एकादशीच्या दिवशी झाल्याने त्याचे नाव श्रीविष्णूच्या नावावरून ठेवावे’, असे आम्हाला वाटले. तेव्हा त्याचे नाव ‘ओजस’ असे ठेवूया का ?’, अशी आम्हा उभयतांची चर्चा झाली. त्या दिवशी अधिवक्ता पू. कुलकर्णीकाकांशी माझ्या यजमानांची भेट झाली. आमची नामकरणाविषयी झालेली चर्चा त्यांना ठाऊक नसतांनाही त्यांनी बाळाचे नाव ‘ओजस’ ठेवण्याविषयी सुचवले. तेव्हा ‘देवानेच त्याचे हे नाव ठरवले आहे’, हे जाणवून कृतज्ञता व्यक्त झाली.
या सर्वांमुळे ‘बाळाचा जन्म म्हणजे संतांचा मिळालेला कृपाप्रसादच आहे’, असे मला वाटते.
५. जन्म ते ६ मास
अ. ‘जन्मापासूनच ओजस झोपतांना हाताच्या विविध मुद्रा करतो. कधी कधी त्याचे हात नमस्काराच्या मुद्रेत जोडलेले असतात.
आ. ओजस १७ दिवसांचा असतांना मी माहेरी गेले होते. तेथील खोलीत श्री स्वामी समर्थांचे एक मोठे छायाचित्र लावलेले आहे. ओजस त्या छायाचित्राकडे एकटक पहात असे. त्याला स्वामींची पुष्कळ ओढ असल्याचे जाणवते.
इ. ओजस ३ मासांचा असतांनाच ‘ॐ’चा उच्चार करत होता.
६. वय ७ ते १२ मास
६ अ. देवाची ओढ : ओजस ८ – ९ मासांचा असल्यापासून त्याला जेवण भरवतांना विविध श्लोक किंवा देवतांच्या आरत्या म्हणाव्या लागतात. तेव्हा त्याला इतर गाणी ऐकायची नसतात. तो ९ – १० मासांचा असतांना तो खेळत असतांना मी ‘अच्युत्तम् केशवम्…’ हे भजन म्हणू लागले, तेव्हा तो खेळणे थांबवून एकाग्रतेने भजन ऐकू लागला. त्याला भावाश्रू येऊन त्याचा कंठ दाटून आला. त्याची भावजागृती झाल्याचे पाहून आमचाही भाव जागृत झाला. असे आम्ही बर्याचदा अनुभवले आणि आताही हे भजन त्याला आवडते. ओजसला झोपवतांना त्याच्यासाठी भजन म्हणावे लागते, तरच तो झोपतो.’
– सौ. गौरी शशांक देशमुख (ओजसची आई), संभाजीनगर
६ आ. सद्गुरूंचा आवाज ऐकून खळखळून हसून नमस्कार करणे : ‘सत्संग चालू असतांना सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांचा आवाज ऐकून ओजसला आनंद होतो. तो पुष्कळ खळखळून हसतो आणि नमस्कार करतो.
६ इ. शांत आणि स्थिर : ओजसला अंधाराची भीती वाटत नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यावरही तो न घाबरता शांत आणि स्थिर असतो.
७. वय १ ते २ वर्षे
७ अ. सात्त्विकतेची ओढ : ओजस दीड वर्षाचा असतांना त्याचे जावळ काढायचे होते. कोरोनाच्या वातावरणामुळे आम्ही (मी आणि यजमान) सोडून त्याचा इतर कुणाशीही संपर्क येत नव्हता. शेजारच्या व्यक्ती कधी घरात आल्या, तर त्यांना पाहूनही तो रडायचा. जावळ काढण्यासाठी साधक श्री. अमोल काकडे यांच्या मांडीवर बसून त्याचे जावळ काढायचे होते. तेव्हा ‘तो त्यांच्याकडे जाईल का ?’, अशी आम्हाला काळजी वाटत होती; पण तो सहजतेने त्यांच्याकडे गेला आणि जावळही काढू दिले. तेव्हा ‘त्याला साधकांमधील सात्त्विकता लक्षात येते’, हे आमच्या लक्षात आले.
७ आ. मंदिरात गेल्यावर पुजार्यांनी ओजसला गाभार्यात नेऊन देवाचे दर्शन घडवणे : ओजस दीड वर्षांचा असतांना आम्ही त्याला प्रथमच चैतन्य श्री कानिफनाथ महाराज, वडोद येथे दर्शनाला नेले होते. त्या वेळी मंदिरे बंद होती; पण ‘बाहेरून कळसाचे दर्शन घेऊया’, या विचाराने आम्ही तिथे गेलो. आम्ही तिथे पोचलो, तेव्हा योगायोगाने पुजार्यांनी पूजेसाठी गाभारा उघडला होता. त्यामुळे आम्हाला नाथांचे दर्शन झाले. त्यानंतर तेथील गुरुजींनी ओजसला सोेवळ्यात गाभार्यात नेले आणि त्याला नाथांचे दर्शन घडवले. तेव्हा आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटली. हा प्रसंग पू. शिवनगिरीकर महाराज यांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘ते नाथांचेच बाळ आहे. त्यामुळे त्यांनीच त्याला आतमध्ये नेऊन आशीर्वाद दिला.’’ ओजसला कोणत्याही मंदिरात गेल्यावर देवाने अशीच अनुभूती दिली आहे. तेथील अधिकारी व्यक्ती त्याला स्वतःहून गाभार्यात दर्शनाला घेऊन जातात.
७ इ. पू. शिवनगिरीकर महाराज यांच्या दर्शनाच्या वेळी ओजस वेगळ्याच आनंदात असणे : ओजस पावणेदोन वर्षांचा असतांना आम्ही त्याला पू. शिवनगिरीकर महाराज यांच्या दर्शनाला नेले होते. तिथे ‘तो वेगळाच आनंद अनुभवत आहे’, असे आम्हाला जाणवले. त्याला झालेला आनंद पाहून समवेतच्या साधकांनाही आनंद वाटत होता. ओजसने पू. शिवनगिरीकर महाराज यांना डोके टेकवून भावपूर्ण नमस्कार केला. पू. महाराजांनीही त्याला भरभरून आशीर्वाद दिला.’
– सौ. गौरी शशांक देशमुख (ओजसची आई) आणि श्री. शशांक देशमुख (ओजसचे वडील), संभाजीनगर
८. ओजसविषयी आलेल्या अनुभूती
अ. आध्यात्मिक त्रास असलेल्या ठिकाणी किंवा त्रास असलेल्या व्यक्तींकडे गेल्यावर ओजस फार रडतो. त्याला त्रासदायक स्पंदने प्रकर्षाने जाणवतात.’
आ. ‘ओजसच्या सहवासात नामजप छान होतो’, असे जाणवते. त्याच्या सहवासात त्रासदायक आवरणही अल्प होत असल्याची अनुभूती येते.
– श्री. शशांक देशमुख, संभाजीनगर
इ. ‘ओजसकडे पाहिल्यावर त्याच्यामध्ये शांतता आणि स्थिरता जाणवते.
ई. ओजसची दृष्टी एखाद्या योग्यांप्रमाणे ऊर्ध्वदृष्टी असल्याचे जाणवते.
उ. ओजसकडे पाहून पू. वामन (सनातनचे दुसरे बालसंत) यांची आठवण होते.’
– श्रीमती अनिता जोशी, संभाजीनगर
९. स्वभावदोष
हट्टीपणा
१०. कृतज्ञता
‘हे प.पू. गुरुमाऊली, आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. आपणच आम्हाला ओजसला सांभाळण्याची सेवा दिली आहे. ‘ही सेवा आम्हाला निरपेक्षपणे, त्याच्यामध्ये न अडकता आणि त्याला आमच्यामध्ये न अडकवता भावपूर्ण करता येऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणागतभावपूर्ण प्रार्थना आहे.’
– सौ. गौरी शशांक देशमुख (ओजसची आई) आणि श्री. शशांक देशमुख (ओजसचे वडील), संभाजीनगर
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |