बीडमध्ये हिजाबच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली फेरी
हिंदु महिलांनीही हिजाब घातला
बीड – कर्नाटक येथे शाळा-महाविद्यालयांत हिजाब वापरण्याविषयी मुसलमान विद्यार्थिनींकडून आग्रह केला जात आहे. बीडमध्ये हिजाब वापरण्याच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीच्या हेमा पिंपळे यांच्या नेतृत्वाखाली फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये हिंदु महिलांनीही हिजाब परिधान करून मुसलमान महिलांना पाठिंबा दिला. या वेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर रस्तामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही फेरी काढण्यात आली होती. (हिजाब घालून त्याचे समर्थन करण्यासाठी पुढाकार घेणार्या राष्ट्रवादीच्या हिंदु महिलांनी हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी किती वेळा पुढाकार घेतला आहे ? यावरूनच केवळ लांगूलचालनाचे राजकारण करण्यासाठी हे चालू आहे, हे लक्षात येते. – संपादक)
राष्ट्रवादीच्या अधिवक्त्या हेमा पिंपळे म्हणाल्या, ‘‘अशा प्रकारे वाद निर्माण करणे, दोन समाजांत तेढ निर्माण करणे किंवा एखाद्या समाजाकडे सतत या ना त्या विषयावरून बोट दाखवणे, असे प्रकार आर्.एस्.एस्. आणि बजरंग दलातील गुंड प्रवृत्तीचे लोक करत आहेत; मात्र प्रत्येक संस्कृतीमध्ये एक ‘लिहाजा’ आहे. प्रत्येक धर्माची आपापली एक संस्कृती आहे. ती संस्कृती प्रत्येक धर्मातील लोक पाळतात.’’